सन १९७३ मधील घटना. आम्ही श्रीदेव रवळनाथ मंदिरामध्ये मोठा उत्सव केला होता. त्या उत्सवाला प. पू. राऊळ महाराज, प. पू. भालचंद्र महाराज उपस्थित राहणार होते; परंतु राऊळ महाराज त्याचवेळी हजर राहतील याचा भरवसा नव्हता. कारण राऊळ महाराज मुंबईला जातो म्हणून सांगून गेले. ते उत्सवा दिवशीपर्यंत हजरच नव्हते. खूप मोठी यात्रा झाली होती. दुपारची २ ची वेळा होती.
ठरलेल्या वेळेप्रमाणे प. पू. भालचंद्र महाराज आले. त्यांची मिरवणूक समाधीकडून रवळनाथ मंदिरपर्यंत मोठ्या थाटात, वाजत- गाजत भक्तिभावाने नेली. भालचंद्र महाराजांना देवळामध्ये आसनावर स्थानापन्न केले आणि दहा मिनिटांनी त्यांच्या दर्शनासाठी भक्तमंडळींना आत सोडले. प्रथम मी त्यांना नमस्कार केला. जे बसले होते तसेच माझ्या गळ्यात हात घालून दोन मिनिटेपर्यंत तसेच राहिले. नंतर हात सोडून जसे बसले. दुपारी तीन वाजल्यापासून रात्रौ ९ वाजेपर्यंत तसेच होते. हे सर्व काय ते तेच जाणत होते.
हा संपूर्ण सोहळा मीच आयोजित केला होता. सदर सोहळ्या दिवशी महाराज हजर नव्हते. लोकतर आतुरतेने वाट पाहत होते. तुफान गर्दी जमली होती. दुपारचे साडेचार वाजले आणि काय आश्चर्य राऊळ महाराज अचानक देवळात उपस्थित झाले. मग काय आपल्या पहाडी आणि धीरगंभीर आवाजात अभंग म्हणत संपूर्ण देऊळ दणाणून सोडले. तो महिमा काय वर्णावा. भालचंद्र महाराजांचे आमच्या गावात ग्रामदेवतेकडे येणे आणि मला पहिले दर्शन देणे हा योगायोग सांगून सुद्धा येणार नाही. धन्य ते महाराज आणि धन्य तो दिवस!
– समर्थ राऊळ महाराज