अभयकुमार दांडगे
जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या आठ महिन्यांच्या कालावधीत मराठवाड्यातील ५६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कधी अतिवृष्टी, तर कधी अवृष्टी यामुळे शेतकऱ्यांना आपली जीवनयात्रा संपवावी लागत आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा आकडा लक्षात घेता थरकाप उडतो. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंब मात्र अद्यापही मरणयातना सहन करतात. मराठवाड्यातील हे चित्र खूप भयानक आहे. या आठ महिन्यांच्या कालावधीत मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केलेल्या आहेत.
मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या महिन्यांत ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दरबारी आहे, तर जालना जिल्ह्यातील ६७ शेतकऱ्यांनी या कालावधीत आत्महत्या केलेल्या आहेत. त्यापाठोपाठ परभणी जिल्ह्यातही ४४ शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. नांदेड जिल्ह्यातील ८९ शेतकऱ्यांनी या आठ महिन्यांत आत्महत्या केलेली आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच १५५ शेतकऱ्यांनी या आठ महिन्यांत आत्महत्या केली आहे. लातूर जिल्ह्यात ३६ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा तसेच शेतात झालेले नुकसान यामुळे आपले जीवन संपविले, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर तसेच नांदेड जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त आहे. कोरडवाहू पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला उत्पन्न कमी मिळते. ज्वारी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस अशा प्रकारची पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळत नाही; परंतु अशा प्रकारची पिके मराठवाड्यात जास्त प्रमाणात घेतली जातात. यासाठी बी-बियाणे खरेदी करण्यासाठीही अनेक शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. त्यामुळे शेतकऱ्याला खासगी सावकाराच्या दारात जावे लागते किंवा बँकेचे कर्ज घेऊन पेरणी उरकून घ्यावी लागते. शेतात काही पिकेल या आशेवर शेतकरी घाम गाळून मेहनत घेतो; परंतु शेतात काही पिकले नाही किंवा पिकल्यानंतर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले तर त्याच्या खिशात एक रुपया देखील पडत नाही. मग शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले असतात.शेतीच्या बाबतीत तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत मराठवाडा हा शापित भाग आहे. निसर्ग हा कधी, कुठे कसे नुकसान करेल याचा काहीही अंदाज नाही. मागील महिन्यात जुलैमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. तसे पाहिले तर मागच्या महिन्यात पाऊस संपूर्ण राज्यातच झाला; परंतु मराठवाड्याला त्याचा अधिक फटका बसला. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतातील पिकांचे होत्याचे नव्हते झाले. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यातील शेतीचे झाले. नांदेड जिल्ह्यातील ४ लाख ९७ हजार हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. कधी अतिवृष्टी, तर कधी अवृष्टी यामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान होते, याचा अनुभव वारंवार राज्यातील शेतकऱ्यांना येतो. कालपर्यंत डोळ्यांसमोर उभे असलेले पीक आज अचानक नाहीसे झाले, तर शेतकऱ्यांची काय अवस्था होईल याचा विचारसुद्धा कोणी करू शकत नाही. अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक भुईसपाट झाले, असे चित्र मागील महिन्यात मराठवाड्यात पाहावयास मिळाले.
नांदेड जिल्ह्यात या वर्षी आठ महिन्यांत ८९ शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. त्यापैकी ५८ शेतकरी कुटुंबीयांना शासनाकडून मदत देण्यात आली. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील ४ लाख ९७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील पिकांना देखील अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या ८ महिन्यांच्या कालावधीत मराठवाड्यात शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केलेल्या आहेत तो आकडा पाहिला तर अंगावर शहारे उभे टाकतात. कधी शेतात काहीही पिकले नाही तर कधी अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक आडवे झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे आर्थिक मदत करण्यात येते; परंतु जीवानिशी गेलेला कर्ता-धरता शेतकरी त्या कुटुंबीयांना पुन्हा भेटत नाही. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे.
धर्माबाद, उमरी व देगलूर तालुक्यात मात्र एकाही शेतकऱ्याने या वर्षी आत्महत्या केल्याची नोंद नाही. जुलै महिन्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे संपूर्ण मराठवाड्यात शेतातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतात अक्षरशः १०-१२ दिवस पाय ठेवता येणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती जुलै महिन्यातील पावसामुळे निर्माण झाली होती. प्रचंड चिखल, गुडघाभर पाणी अशा स्थितीत पिकांचे काय हाल होणार? या चिंतेत जुलै व ऑगस्ट महिन्यांत अनेक शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. जुलै महिन्यातील पाऊस व शेतातील पिकांचे झालेले असह्य नुकसान लक्षात घेऊन मागील महिन्यात तसेच ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर यापैकी ऑगस्ट महिन्यात २० तारखेपर्यंत २२ शेतकऱ्यांनी नांदेड जिल्ह्यात आत्महत्त्या केल्याची नोंद आहे. पिकांची अवस्था पाहून काहीही उत्पन्न येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांना कुठलाही आधार दिसत नाही. घरातील खर्च कसा भागवायचा, मुलींची लग्ने कशी पार पाडावीत, या चिंतेतही शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे दिसून येत आहे.
नांदेड जिल्ह्यात जानेवारी २०२२ मध्ये ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर दुसऱ्याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये ६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. मार्च महिन्यात फेब्रुवारीच्या तुलनेत तीन पट अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. म्हणजेच मार्च महिन्यात १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात मार्च महिन्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा आकडा हा जास्त आहे. नांदेड जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात प्रत्येकी १० शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद शासकीय दप्तरी आहे. जून महिन्यात ११, तर जुलै महिन्यात ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ऑगस्ट महिन्यात २२ शेतकऱ्यांनी याच मार्गाने स्वतःला संपविले.
मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकत्यांच्या कुटुंबीयांना या आठ महिन्यांच्या कालावधीत शासनातर्फे लाखो रुपयांची मदत करण्यात आलेली आहे. आत्महत्या केलेल्या प्रकरणांची रितसर चौकशी केली जाते, यापैकी मराठवाड्यातील ७१ आत्महत्येची नोंद अपात्र ठरविण्यात आलेली आहे, तर ४२० प्रकरणातील शेतकरी कुटुंबीयांना मदत देण्यात आलेली आहे. उर्वरित ५६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळाली, तर त्यामधून मार्ग काढता येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य शासन शेतकऱ्यांना जाहीर केल्याप्रमाणे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत करणार आहे का? असा सवाल चिंतेत असलेला शेतकरी उपस्थित करत आहे.