भीमाजी पाटील नावाचे श्रीमंत गृहस्थ राहत होते. ते प्रेमळ आणि उदार होते. त्यांच्या घरे येणाऱ्या-जाणाऱ्याचा नेहमी राबता असे. ते सर्वांचे आदरातिथ्य करायचे. १९०९ साली त्यांना क्षयरोग झाला. त्यामुळे ते अंथरुणाला खिळले. वारंवार येणारी खोकल्याची उबळ, सतत येणारा ताप आणि इतर त्रासांमुळे ते खंगून गेले होते. त्यांच्या घरच्या मंडळींनी नामांकित वैद्य, डॉक्टर केले. देवादिकांना नवस केले. पण व्यर्थ! काहीही उपयोग झाला नाही. दुखणे वाढतच गेले. कुटुंबीयांनी त्यांच्या जगण्याची अशाच सोडली होती. पाटीलही आजाराला कंटाळले होते. ते देवाकडे मरण मागत होते. पण तेही येत नव्हते. ते पुरते खचून गेले होते. एके दिवशी त्यांना नानासाहेब चांदोरकरांची आठवण झाली. त्यांनी चांदोरकरांना पत्र पाठविले. त्यात त्यांनी आपला दुर्धर व्याधीबद्दल लिहिले आणि त्यांच्या भेटीची इच्छाही व्यक्त केली. पत्र वाचून नानासाहेबांना खूप वाईट वाटले. त्यांनी पाटलांना पत्राचे उत्तर पाठविले. त्यात त्यांनी श्रीसाईबाबांच्या लीला वर्णन करून पाटलांना श्रींच्या दर्शनास शिरडीस जाण्याचा सल्ला दिला.
नानासाहेबांचे पत्र वाचल्यावर पाटलांना थोडा धीर आला. आपल्या आजारावर काहीतरी चांगला उपचार मिळेल, याची त्यांना आशा वाटू लागली. श्रीबाबांच्या लीलांचे वर्णन ऐकून त्यांना कधी एकदा बाबांना भेटतो, असे झाले होते. त्यांनी घरातील मंडळीना शिर्डीला जाण्याची तयारी करण्यास सांगितले. बरोबर विश्वासू मंडळी घेऊन पाटील शिर्डीस आले. त्यांनी गाडी मशिदीच्या चौकाजवळ थांबली. दोघा-चौघांनी त्यांना उचलून बाबांसमोर आणले. त्या वेळी नानासाहेब व माधवराव तेथेच होते. पाटील थोडा वेळ साईच्या संगतीत होते, पण त्या अवधीत श्रींच्या कृपेने त्यांना वारंवार येणाऱ्या रक्ताच्या उलट्या थांबल्या. बाबांच्या सांगण्यावरून ते भीमाबाईंच्या घरी राहिले. काही दिवसांनी पूर्ण बरे होऊन ते जुन्नरला परतले. ते बाबांचे भक्त झाले. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य साईनामातच घालविले.
विलास खानोलकर