नाशिक (प्रतिनिधी) : शहर व परिसरात नागा साधूंनी धुमाकूळ घातला असून, रस्ता विचारण्याचा बहाणा करून रस्त्याने जाणाऱ्या दोन वृद्धांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याजवळील सोन्याच्या चेन या साधूंनी हातचलाखीने लंपास केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, शहरात यापूर्वी पत्ता विचारण्याचा, पाणी पिण्याचा बहाणा, दागिने चमकवून देण्याच्या बहाण्याने महिलांसह वृद्धांना बोलण्यात गुंतवून व वृद्धांच्या गळ्यांतील दागिने हातोहात लांबविल्याच्या घटना ताज्या असताना आता चक्क नागा साधूंनी दागिने लंपास केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चोरीचा पहिला प्रकार किशोर सूर्यवंशी मार्ग येथे घडला. फिर्यादी भगीरथ रामचंद्र शेलार (वय ६९, रा. वैभव निवास, शिवाजीनगर, म्हसरूळ) सकाळी सव्वासहाच्या सुमारास दिंडोरी रोडवरील सूर्यवंशी मार्ग, ओम्कारनगर येथे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून चार इसम आले. त्यापैकी चालकाने शेलार यांना त्र्यंबकेश्वर व पंचवटीकडे जाणारा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडी थांबविली. गाडीत असलेल्या नागा साधूंनी शेलार यांना शंभर रुपये व रुद्राक्षाचा मणी दिला. त्यांना आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून गाडीतील नागा साधूंनी शेलार यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची बारा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन बळजबरीने ओढून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तीन नागा साधू व कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
चोरी व फसवणुकीची दुसरी घटना गोविंदनगर येथे घडली. फिर्यादी उत्तम रामचंद्र परदेशी (वय ७५, रा. पीस स्क्वेअर अपार्टमेंट, गोविंदनगर लिंक रोड) सकाळी पावणेसात वाजता मॉर्निंग वॉकसाठी पायी जात होते. परदेशी हे गोविंदनगर येथील आरडी सर्कलजवळ आले असता, त्यांच्याजवळ एक पांढऱ्या रंगाची कार येऊन थांबली. या गाडीतील ४० ते ५० वयोगटातील अनोळखी नागा साधू, त्याचा एक साथीदार व एक महिला या तिघांनी आपसात संगनमत करून फिर्यादी परदेशी यांना जवळ बोलावले. पंचवटी येथे जाण्यासाठी रस्ता विचारण्याचा बहाणा केला व बोलण्यात गुंतविले. तसेच “तुमच्या गळ्यातील चेनमध्ये रुद्राक्ष लावून देतो,” असे सांगून व “तुमचे कल्याण होईल,” असे म्हणून नागा साधूंनी परदेशी यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन काढून घेत इंदिरानगर बोगद्याच्या दिशेने पलायन केले. नागा साधू निघून गेल्यानंतर परदेशी यांना गळ्यातील चेन काढून घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर परदेशी यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात नागा साधूंविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.