ठाणे (प्रतिनिधी) : घरगुती गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी यंदाही विशेष आणि नावीन्यपूर्ण कलाकुसरीच्या मखरांनी बाजाराला झळाळी आली आहे. वाढत्या महागाईचा परिणाम या बाजारपेठेवरही झाला असून, यंदा सर्वच मखरांच्या किंमती सरासरी १५ ते २० टक्के वाढल्या आहेत.
लाडक्या बाप्पांसाठी १८ इंच ते पाच फुटांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे मखर उपलब्ध आहेत. त्याच्या किंमती ७०० ते १५ हजार रुपयांपर्यंत आहेत. यावर्षी वॉटर फॉलच्या मखरांची मागणी जास्त असून यातही गोमुख, हत्तीसेट, सिंहसेट आणि नंदी अशा विविध प्रकारचे मखर आहेत. तर शिवमुद्रा, विठ्ठल मंदिर, केदारनाथ मंदिर, साई दरबार या देवस्थानांच्या प्रतिकृतीचे मखर उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र सरकारने थर्माकोलवर बंदी घातल्यानंतर मखरासाठी पर्यावरणपूरक फोम, हिटलॉन, हनिकॉम्ब पुठ्ठा, एमडीएफचा वापर करण्यात आला आहे. हे मखर घडी करून ठेवता येणार असल्याने ते तीन ते चार वर्षे सहज वापरता येणार आहेत. ठाण्यात राम मारुती रोड, घंटाळी रोड, नौपाडा विष्णुनगर, लालबाग, ब्राम्हण सभा हॉल, गोखले रोड अशा उच्चभ्रू भागात नाविन्यपूर्ण आणि इकोफ्रेंडली मखरांसाठी दुकाने थाटण्यात आली असून ती ग्राहकांची गर्दी खेचत आहेत.
तसेच ठाण्यातील बाजारपेठेत कृत्रिम फुलांना मागणी डेकोरेशनसाठी वेली, लॉन, माळा, प्रिटेंड कापडाचाही वापर केला जातो. हे साहित्य दोन ते तीन वर्षे वापरता येत असल्याने त्याच्या खरेदीकडे कल दिसून येत आहे. बाजारात मोगरा, झेंडू, गुलाब, मल्टी शेडेड फुल, ग्रीन पत्ती, पारपारिक आंब्याच्या पानाचे तोरण विक्रीसाठी उपलब्ध आहेत. फुलांच्या एक फुटापासून ते १० फुटांपर्यंत माळा उपलब्ध आहेत. तसेच काजू कत्री, रिंग लडी, मस्तानी माळ, मम्स वेल, अष्टर लडी, पट्टा तोरण, व्हिस्टोरीया, चेरी ब्लोसम आदी फुलांच्या माळा उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमतीतही ५ टक्के वाढ झाली आहे. मखराच्या तुलनेत याचा खर्च कमी असल्याने आणि दिसायला आकर्षक ठरतात.
बाप्पांसाठी बैलगाडीचे लाकडी आसनही उपलब्ध आहे. १ ते ५ फूट गणेश मुर्तीसाठी हे लाकडी पाट रविवार पेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मागणीनुसार ते बनवून दिले जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. प्रिंटेड कापड खरेदीकडे कल बाजारात विविध प्रकारचे प्रिंटेड कापड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. फर, वेलवेट, नेट, लायक्रा आणि जाळी कापड, प्रिटेंड कापडाला मागणी आहे. प्रिटेंडमध्ये फॉईल, बटर पेपर प्रिंटेड कापड उपलब्ध आहे. फर कापड दिसायला आकर्षक आणि किंमत कमी असल्याने यावर्षी कापडाला मागणी आहे. कापडाच्या किंमती ५ ते १० टक्के वाढल्या असल्या तरी त्यालाही मागणी आहे.