Sunday, March 23, 2025
Homeअध्यात्मसमाधान ही परमेश्वराची खरी देणगी

समाधान ही परमेश्वराची खरी देणगी

प्रत्येकाला असे वाटते की, मी कुणाची निंदा करीत नाही, धर्माने वागतो, तरी मी दुःखी, आणि वाईट माणसे सुखात वावरताना दिसतात, हे कसे काय? अगदी कितीही सात्विक मनुष्य असला, तरी त्याच्या हे मनात आल्यावाचून रहात नाही. नामाचा विटाळ ज्याने मानला तो सुखी दिसावा, आणि नाम ज्याने कंठी धरले त्याला दुःख व्हावे, यावरून भगवंताला न्यायी कसे म्हणावे, अशीही पुष्कळांना शंका येते. खरोखर, याचे मर्म जर आपण पाहिले, तर आपल्याला असे आढळून येईल की, बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडलेले असतात. विषय त्यांना पुष्कळ मिळाले, पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग! दोन रस्ते लागले, त्यातला एक चांगला दिसला. पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता आणि दुसरा खडकाळ आणि काट्याकुट्यांचा होता. पण तो आपल्या गावाला नेणारा होता, तर कोणता रस्ता आपण धरायचा? भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमधे दोन वर्ग सांगितले आहेत; एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी. ज्यांची स्वभावतःच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियांवर ताबा चालतो, जे जन्मापासून तयार असतात, ते सांख्यमार्गी होत. ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात. पण ज्यांना भगवंत असावा असेही वाटते, म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन, ते कर्मयोगी होत.

सांख्यांचा साधनमार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो. आपला मार्ग जड, सोपा आणि सुखकारक असतो. सांख्य हा भगवंताकडे चटदिशी पोहोचतो, पण आपण क्रमाक्रमाने जातो. सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता? तो मार्ग असा – वासना आहे, तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा. पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांचे फळ ईश्वरावर अवलंबून आहे, हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावे. दहा माणसांना त्यांच्या असमाधानाचे कारण विचारले, तर ती माणसे दहा निरनिराळी कारणे सांगतील. यावरून असे दिसते की, जगातील कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही. समाधानाचे शास्त्र निराळेच आहे.

ते प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडे आहे. त्याच्यापासून तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत. प्रत्येकाला काही तरी कमी असणारच. पण मजा अशी की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की, आपल्याजवळ जे कमी आहे. त्यामध्ये समाधान आहे; म्हणून त्याचे दुःख कायम राहते. भगवंतावाचून असणारे वैभव आणि ऐश्वर्य हे कधीच सुखसमाधान देऊ शकत नाहीत. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे, ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय. २३५. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे.

– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -