Friday, July 19, 2024
Homeमहत्वाची बातमीवेध ६जी तंत्रज्ञानाचे...

वेध ६जी तंत्रज्ञानाचे…

डॉ. दीपक शिकारपूर

भारतात ५जी चर्चा सुरू असताना चीनमध्ये ६जी चे प्रयोग सुरू आहेत. ६जी हा विस्तारित आणि मिश्रित वास्तविकता मोबाइलच्या सहाव्या पिढीचा भाग असेल. ६जी १०० गेगाहर्ट्झच्या आसपासच्या फ्रिक्वेन्सीवर ऑपरेट करतं. हे संवेदनांचं इंटरनेट आहे, भौतिक आणि आभासी जगाचं संमिश्रण हे ६जी चे वैशिष्ट्य आहे. पुढील दशकात स्मार्ट उपकरणं, आयओटीमुळे सर्वत्र इंटरनेट बँडविड्थ लागताच ६जी कामी येईल.

देश-वंश-वर्ण-राहणीमान या क्षुद्र भेदांच्या पलीकडे जाऊन आज जगात सर्वांच्या जीवनाचा या ना त्या प्रकारे हिस्सा बनलेली वस्तू म्हणजे मोबाइल फोन! मग तो हँडसेट ४०० रुपयांचा जुना, रोगट पिवळ्या रंगाच्या स्क्रीनचा सेकंडहँड असो की एखाद्या प्रख्यात ‘फॅशन-हाऊस’मधला, हिरे जडवलेला आणि सर्व सुविधायुक्त तीन लाख रुपयांचा असो! सर्व सेलफोनधारकांना परस्परांच्या संपर्कात ठेवण्याचं मूलभूत काम फोन कंपन्या, सेवा-पुरवठादार आणि हँडसेटमधल्या तांत्रिक करामतींद्वारे निरंतर केलं जात आहे. पूर्वी घराबाहेर पडताना पैशाचं पाकीट, घड्याळ, चाव्या इत्यादी गोष्टी बरोबर घेतल्या का याची खातरजमा करून घेतली जात असे. आता फक्त मोबाइल फोन बरोबर बाळगला की सर्व टेन्शन दूर… जगातला पहिला मोबाइल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपरने १९७३ मध्ये विकसित केला. इलेक्ट्रॉनिक युगाच्या सुरुवातीपासून (सुमारे १९७०) गेल्या ४० वर्षांमध्ये सर्वाधिक वेगाने बदलत आणि विकसित होत गेलेलं उपकरण म्हणजे सेलफोन. या बाबतीत त्याने संगणकाला केव्हाच मागे टाकलं आहे. किंबहुना, आता हँडसेटमध्येच परिपूर्ण संगणक समाविष्ट झाला आहे. आता सेलफोन हवा असण्याच्या गरजेचं रूपांतर वेडामध्ये म्हणजे ‘अॅडिक्शन’मध्ये झालं आहे. इतकं की रोटी-कपडा-मकानसारख्या जीवनावश्यक गोष्टींमध्ये लोक आता सेलफोनचाही समावेश करू लागले आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये मोबाइल फोनच्या हँडसेटचं स्वरूप किती बदललं आहे, हे सांगायला नकोच. हँडसेट लहान आणि हलके बनले व मुख्य म्हणजे त्याद्वारे मिळणाऱ्या सुविधांमध्ये आश्चर्यकारक वेगाने वाढ झाली.

मानवी संस्कृतीच्या उदयाला ५० हजार वर्षं उलटून गेली आहेत. सुरुवातीच्या काळात संवादासाठी मानवाने विविध प्रकारच्या आवाजाचा वापर केला. कालांतराने भाषा अस्तित्वात आली. संवादासाठी भाषेचा वापर सुरू झाला. मानवाने माध्यम म्हणून प्राणी आणि पक्ष्यांचा वापर केला. पुढे दूत अस्तित्वात आला आणि आधुनिक काळात त्याला पोस्टमन ही ओळख मिळाली. पहिल्या विश्वयुद्धात संपर्कासाठी टेलिग्रामचा वापर करण्यात आला, तर दुसऱ्या विश्वयुद्धात टेलिफोन अस्तित्वात आला. त्यावेळी रेडिओ टेलिफोनचा वापर करण्यात आला होता. १९४०च्या दशकात वाहनातल्या फोनची सुविधा उपलब्ध झाली. पुढची तीन दशकं यावर बरंच संशोधन झालं. १९५०च्या दशकात फक्त नागरी सेवांसाठी म्हणजेच सैन्य दलासाठी फोन वापरले जात होते. १९७३ पासून ते सामान्य माणसासाठी उपलब्ध होत गेले. मार्टिन कूपर एक अमेरिकन अभियंता होते. त्यांनी ३ एप्रिल १९७३ रोजी जगाला पहिला मोबाइल फोन दिला. हा फोन सर्वसामान्यांसाठी होता. त्याचं वजन सुमारे दोन किलो होतं. हे आपल्याला विचित्र वाटेल. पण पूर्वी एवढ्या वजनाचे मोबाइल फोन असायचे. आजच्या युगानुसार ते खूपच जड होते; परंतु ८०च्या दशकाच्या सुरुवातीला असा फोन जवळ असणं हे आनंदाचं प्रतीक मानलं जात असे. मार्टिन कूपरने आजच्या आघाडीच्या मोबाइल कंपनी मोटोरोलाच्या सहकार्याने हा मोबाइल फोन तयार केला. नंतर तो या कंपनीचा सी.ई.ओ. झाला. यासाठी २०१३ मध्ये त्यांना मार्कोनी पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. हा पुरस्कार संवादाच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात आला होता.

संगणकाचा अवतार ज्या गतीने बदलत गेला त्यापेक्षाही वेगाने, गेल्या पाच वर्षांमध्ये, सेलफोनचं रूप आणि अंतरंग बदलले आहेत. किंबहुना, सेलफोनच्या हँडसेटचं अधिकाधिक संगणकीकरण झाल्यामुळे हे झालं आहे, असं म्हणता येईल. ट्रांझिस्टर्स, मायक्रोचिप्स यासारख्या इलेक्ट्रॉनिक घटकांचा कमी होणारा आकार आणि त्यांच्या जुळणीमध्ये यांत्रिक हातांच्या वापरामुळे आलेली विलक्षण सफाई ऊर्फ रिफाइनमेंट यामुळे कमी जागेत जास्तीत जास्त सुविधा पुरवणं शक्य होत आहे. हँडसेटमध्येच आता परिपूर्ण संगणक समाविष्ट झाला आहे. आजचं युग पूर्णपणे डिजिटल झालंय. प्रत्येक वस्तू, उपकरण ‘स्मार्ट’ असणं ही आज चैन नसून गरज होत चालली आहे. शक्तिशाली इंटरनेट हाच तंत्रावलंबी जीवनपद्धतीचा पाया आणि गृहितक आहे. ते नसेल तर ‘डिजिटल इंडिया’ कसा होणार? उच्च इंटरनेट बँडविड्थ ‘एक्स्प्रेस वे’ इतकंच आवश्यक आहे. इंटरनेटने भूगोल इतिहासजमा केला आणि आता सर्व वयाचे लोक कोरोना लॉकडाऊनच्या काळात तंत्रस्नेही झाले. इंटरनेट हे एकमेकांना कनेक्ट केलेल्या सर्व संगणकांचं एक जागतिक नेटवर्क आहे. नॉर्वेसारख्या विकसित देशात इंटरनेट हा मानवी हक्क म्हणून गणला आहे. हेच लोण २०२५ नंतर भारतातही येईल. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच वीज आणि इंटरनेट देणं सरकारवर बंधनकारक असेल. इंटरनेट हे हवेसारखं असेल. माहिती-तंत्रज्ञानातली क्रांती, तिचा सर्वदूर प्रसार आणि परवडणाऱ्या किमतीत मिळणारी विविध स्मार्ट उपकरणं यामुळे गेल्या दहा-एक वर्षांमध्ये आपल्या सर्वांना इंटरनेट, वेब, ब्रॉडबॅँड, वायफाय इ. शब्दप्रयोग चांगलेच माहीत झाले. ‘रेंज’, वीज आणि स्मार्टफोन असलेल्या सर्वच शहरी आणि बहुतेक निमशहरी भागांमध्ये इंटरनेटवर आधारित विविध व्यवहारांची संख्याही लक्षणीय आहे. मागणी वाढली तरी त्या प्रमाणात ‘पुरवठा’ न वाढल्याने ब्रॉडबॅँड असूनही स्पीड मिळत नाही, नेट स्लो झालं आहे, लवकर डाऊनलोड होत नाहीये, अशा तक्रारीही ऐकू येत असतात आणि मग ‘आमचंच नेट फास्ट आहे’ हे दाखवण्यासाठी बऱ्याच संबंधित कंपन्या तशा जाहिरातीही करत असतात. अतिवेगवान उच्च इंटरनेट बँडविड्थ देण्यासाठी आज अनेक उद्योग प्रयत्नशील आहेत. गुगल, इऑन मस्क यांची ‘स्टारलिंक’ ही नावं त्यात आघाडीवर आहेत. शहरी भागात अतिवेगवान इंटरनेट सेवा देण्याबरोबरच देशाच्या अतिदुर्गम, पहाडी भागात हाय स्पीड सेवा देण्याचं काम गुगलच्या ‘तारा’ प्रोजेक्टमार्फत केलं जाणार आहे. यात लाइट बीमच्या वापराने टेलिकास्ट कनेक्टिव्हिटी आणि हायस्पीड इंटरनेटसाठी सुपर टेक्नॉलोजीचा वापर केला जात आहे. याद्वारे अतिशय बारीक म्हणजे जवळजवळ अदृश्य बीमच्या सहाय्याने हवेत सुपर हाय स्पीड डेटा ट्रान्समीट केला जातो. विशेष म्हणजे यासाठी केबलची गरज नाही. आता मोठमोठ्या इमारती किंवा कोणत्याही दुर्गम, अडचणीच्या भागात सर्व्हर ट्रान्समीटर आणि रिसिव्हरमध्ये रेडीओ वेबऐवजी लाइट बीम पाठवले जातात. हे नेटवर्क बिना केबल असल्याने टॉवरवरील भार कमी होणार आहे.

इऑन मस्क यांच्या स्पेस एक्स्प्लोरेशन टेक्नॉलॉजी या कंपनीने ‘स्टारलिंक’साठी एकाच वेळी एक-दोन नव्हे, तर तब्बल ६० उपग्रहांचं प्रक्षेपण केलं. आतापर्यंत स्पेस एक्स्प्लोरेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनने १००० हून अधिक सॅटेलाइट प्रक्षेपित केले आहेत. ही कंपनी अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामध्ये सेवा देत आहे. स्पेसेक्स लवकरच भारतातही इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या तयारीला लागली आहे. आपल्या देशात ५जी चर्चा सुरू आहे. पण इतर देश त्यापुढचा विचार करत आहेत. चीनमध्ये ६जी चे प्रयोगही सुरू झाले आहेत. ६जी ही वायरलेस तंत्रज्ञानाची सहावी पिढी आहे. विस्तारित वास्तविकता आणि मिश्रित वास्तविकता मोबाइलच्या सहाव्या पिढीचा भाग असेल. १०० गेगाहर्ट्झच्या आसपासच्या फ्रिक्वेन्सीवर ६जी ऑपरेट करतं. हे संवेदनांचं इंटरनेट आहे, भौतिक आणि आभासी जगाचं संमिश्रण हे ६जी चं वैशिष्ट्य आहे. पुढील दशकात स्मार्ट उपकरणं, आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) या तंत्रामुळे सर्वत्र इंटरनेट बँडविड्थ लागेल. इथेच ६जी कामाला येईल. यामुळे मोबाइल कॉल्स वेगळे असतील. आता आपण द्विमिती व्हीडिओ जमान्यात आहोत. ६जी मुळे मोठ्या आकाराचं ३ डी होलोग्राम प्रदर्शन शक्य होतं. आपण संपर्क साधत असलेल्या व्यक्ती रिअल टाइममध्ये (जशा आहेत तशा; प्रोफाइल चित्र नव्हे) आपल्याजवळ प्रगट होतात. अनेक पौराणिक टीव्ही सिरिअल्समध्ये देवदेवता मानवासमोर प्रगट झाल्याचं दाखवतात. ६जी होलोग्राम तंत्रामुळे हेच तंत्र सर्वसामान्यांना उपलब्ध होईल. यामुळे दळण-वळण क्षेत्रात क्रांती होईल. २०२६च्या मध्यास हे प्रायोगिक तत्त्वावर सुरू होईल आणि २०३० पर्यंत सर्वत्र उपलब्ध होईल. त्यामुळे पारंपरिक द्विमिती मोबाइल फोनचा अस्त होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -