Wednesday, April 23, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यमिठाई घेताय... सावधान!

मिठाई घेताय… सावधान!

ज्योती मोडक

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. आपण आता अमृत काळात प्रवेश करते झालो आहोत. आपला इतिहास पाहाल, तर आपला ऊर भरून येतो. इतिहासाचा, स्वातंत्र्याचा त्याचा आपल्याला सार्थ अभिमानही आहे. हे झाले भावनिक पातळीच्या जगात. ग्राहकांच्या जगात मात्र फसवेगिरी, बनवाबनवी, अन्नधान्यातील भेसळ काही पुसली जात नाही. गणपती बाप्पांचे लवकरच आगमन होईल. असे सणासुदीचे दिवस आले की, प्रत्येकाचा कल मिठाई घेण्याकडे असतो. अशा वेळी मिठाई बनविण्यासाठी लागणाऱ्या घटक पदार्थांचा तुटवडा निर्माण झाला, तर अवास्तव मागणी पुरी करण्यासाठी उत्पादक अयोग्य (भेसळयुक्त) मार्गांचा अवलंब करून मिठाई बनवितो आणि त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होऊन दुर्घटना होते. अशा तऱ्हेच्या बातम्या आपण वर्तमानपत्रांतून वारंवार वाचत असतो. मिठाईमध्ये प्रामुख्याने माव्याचा वापर केला जातो. दुधापासून बनविलेला मावा नाशिवंत असल्यामुळे लवकर खराब होतो. असा खराब मावा मिठाई बनविताना वापरला, तर आरोग्यावर दुष्परिणाम होतो आणि मावा घालून बनवलेली मिठाई फार काळ विक्रीस ठेवली तरीही नाशिवंत माव्यामुळे ती मिठाई खराबच होते. ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेची काळजी होणारा असा नवा कायदा अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने २५ सप्टेंबर २०२० रोजी जारी केला; ज्याद्वारे मिठाईच्या दुकानात non-Packed/loose असलेल्या कंटेनरमध्ये आणि ट्रेमध्ये ठेवलेल्या मिठायांवर `Best Before date’ टाकणे/घालणे बंधनकारक केले आणि १ ऑक्टोबर २०२० पासून याची संपूर्ण देशभर अंमलबजावणी जारी केली.

नव्या कायद्यानुसार उत्पादकांना अन्नपदार्थांवर कालमर्यादेचा उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मिठाईमध्ये असलेल्या खव्यामुळे (खराब) अन्नातून विषबाधा होऊ शकते, ही बाब ध्यानात घेऊन या कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. या कायद्यानुसार कालमर्यादेचा उल्लेख नसल्यास संबंधित उत्पादकाला/व्यापाऱ्याला एक लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. Best before Use यामध्ये उत्पादनाची तारीख असणे हे जरी ऐच्छिक ठेवले असले तरी सुरक्षित असेपर्यंतची (वापरायची) तारीख असणे मात्र बंधनकारक करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्या काही सूचना

१. (FBO)/अन्न व्यावसायिकांनी त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक परिस्थितीनुरूप आणि पदार्थातील स्वरूपानुसार (Nature) नुसार Best before Use अथवा खाण्यास सुरक्षित/योग्य तारखेपर्यंत ही तारीख निश्चित करावी. याचे मुख्य कारण हवामान वर्षभर सारखेच नसते. उन्हाळ्यात व पावसाळ्यात पदार्थ कमी टिकतो तर हिवाळ्यात जास्त दिवस टिकू शकतो. कोरड्या हवेत पदार्थ चांगला राहतो तर समुद्रालगतच्या प्रदेशात हवेतील आर्द्रतेमुळे लवकर खराब होतो.

२. FBOकडून निश्चित करण्यात आलेल्या या तारखांबाबत संबंधित आयुक्त खात्री करून घेतील.

३. सदर मिठाई/बर्फी अशा गोड पदार्थांची यादी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI च्या) वेबसाइटवर (FBO) ना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

४. सदर लेबल्स (Date & Manufacturing/Best Before Use) ही अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या मानकांनुसारच (Packaging & Labelling Regulation 2011) असायला हवीत.

ग्राहकांसाठी खरोखरच खूप उपयुक्त असा हा नवीन बदल आहे हे स्वागतार्ह आहे.

या मिठाईच्या बाबतीत खरेदी करताना घ्यायची आणखी एक खबरदारी म्हणजे त्यावर लावण्यात येणारा हा वर्ख चांदीचा असल्याचा दावा करण्यात येतो. हा दावा पूर्णपणे खोटा असतो असे म्हणता येणार नाही. तरी चांदीचा सध्या असलेला भाव पाहता सर्रास चांदी वापरली जाते का? हा प्रश्न मनात नक्की उपस्थित होतो. चांदी ऐवजी अल्युमिनियम या धातूचा पातळ पत्रा जो चांदीच्या वर्खाप्रमाणे पातळ बनतो तो वापरला जातो. हा पातळ पत्रा बनविण्याची पद्धतही अगदी अघोरी आहे. चरबीच्या दोन थरांमध्ये चांदी ऐवजी अॅल्युमिनियमचा पत्रा ठेवून त्यावर धोपटले जाते व अति पातळ पत्रा बनविण्यात येतो. हीसुद्धा भेसळच आहे. अॅल्युमिनियमचे बारीक कण आतड्यांना चिकटून राहतात. त्याचे विघटन होत नाही आणि सातत्याने अॅल्युमिनियम पोटात गेल्यास अल्सर आणि नंतर कॅन्सरसारखे दुर्धर आजार उद्भवतात. चांदीच्या वर्ख ओळखण्यासाठी जर चिमटीमध्ये वर्ख धरला आणि कुस्करला तर त्याची पावडर होते, तर अल्युमिनियमचा पातळ पत्रा चिमटीमध्ये धरला आणि कुस्करला तर त्याची टणक गोळी बनते.

मिठाईवर खूप वेळा केशराचे मोठे तंतू लावलेले दिसतात. मक्याच्या कणसाचे तंतू मेटॅनिल यलो या अखाद्य रंगामध्ये बुडवून ते वाळवून वापरले जातात. मेटॅनिल यलोसारख्या अखाद्य रंगामुळे शरीरास अपाय होतो, अपंगत्व येते. याबरोबरच वनस्पती तेल, मिल्क पावडर आणि साखरेचे मिश्रण यापासून बनवला गेलेला, पूर्णपणे नकली मावा बाजारात स्वस्तात उपलब्ध होतो. त्याची खबरदारी घ्यायला हवी. मंडळी, अशा संभाव्य धोक्यांमुळे जागरूकपणे खरेदी करायला हवी. त्यासाठी खालील गोष्टींची खबरदारी घेतली गेली पाहिजे.

१. शक्यतो अनोळख्या ठिकाणाहून मिठाईची खरेदी करूच नये.

२. मिठाईऐवजी फळे, ड्रायफ्रुटस्, खाऊ/प्रसाद म्हणून खरेदी करावा.

३. पिवळ्या रंगाची आणि त्यावर वर्ख असलेली मिठाई खरेदी करणे टाळावे.

४. २ वर्षांखालील मुलांसाठी माव्याचे पदार्थ खरेदी करू नयेत. त्यांना हे पदार्थ शक्यतो देऊ नयेत.

५. मिठाई घेताना खोक्याचे स्वतंत्र वजन दुकानदार करतो आहे ना? हे पाहावे.

६. मिठाई खरेदी केल्यावर ती जास्त काळ खोक्यामध्ये ठेवू नये.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -