महाराज आमच्या घरी असले की बरीच भक्त-मंडळी त्यांच्या दर्शनाला येत असत. त्यामध्ये माझे जीवलग मित्र आना नवार हे सुद्धा येत असत. ते उभादांडा येथे राहात होते. त्यांची पत्नी पण फार प्रेमळ. ती उभयता महाराजांच्या दर्शनासाठी आपला व्यवसाय टाकून धावत-पळत येत असत. काही वेळा आपल्या मुलांना घेऊनही ते महाराजांच्या दर्शनास येत. त्यामुळे मुलांनाही महाराजांच्या दर्शनाचे वेड लागले होते. आपली शाळा चुकवूनही मुले आई-वडिलांबरोबर येत असत. त्यांची मोठी मुलगी बाया हिला महाराजांच्या आशीर्वादाने नवरा तसेच सासरही चांगले मिळाले. तिचे पती आंदुर्लेकर यांच्याबरोबर ती सुखाने संसार करत आहे. मुंबईला नोकरीधंदा करून संतांच्या सेवेत ही मंडळी सुखी आहेत. मुलगा घरी व्यवसाय करून सुखांत आहे. असे हे परम भक्तांच्या म्हणजेच आना नवार यांच्या घरी प. पू. राऊळ महाराज एकदा आले व साक्षात आपल्यावरच्या श्रद्धेची-भक्तीची कसोटी त्यांनी घेतली. त्यांच्या घरात संपूर्ण लाकडे पेटऊन होम केला. एवढी मोठी आग पेटत होती की वाटावे आता त्यांचे संपूर्ण घर अग्नीमध्ये जळून भस्म होणार; परंतु त्या नवार उभयतांच्या मनांत कोणताही वाईट विचार आला नाही. ती उभयता तेथे बसून होती. राऊळ महाराजांनी त्यांना विचारले, तुम्हाला काय पाहिजे ते मागा; परंतु तेही पूर्ण कसोटीला उतरले. त्या उभयतांनी महाराजांना सांगितले की काही नको. फक्त तुमचे चरण आम्हाला मिळाले की झाले आणि काय चमत्कार की त्या अग्नीमधून साक्षात भगवान विष्णू प्रकट झाले व त्या उभयतांनी त्यांचे दर्शन घेतले. केवढी अचाट शक्ती होती त्यांच्या योग सामर्थ्यांमध्ये. महाराजांनी जे द्यायचे ते आम्हाला दिले. आम्ही त्यांची आज्ञा कधीच मोडली नाही. सौ. नवार यांना शेवटी डोळ्यांनी दिसत नव्हते; परंतु ऑपरेशन करू नको असे बाबांनी सांगितल्यामुळे डोळ्यांचे ऑपरेशन केले नाही. त्यांचे अनुभव लिहावे तेवढे कमीच आहेत. त्यांच्या चरणी सेवा जन्मोजन्मी घडावी हीच प्रार्थना.
समर्थ राऊळ महाराज