‘गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्हा बाळा’, बोल बजरंग बली की जय, असे शब्द कानावर पडले तरी दहिकाला उत्सव डोळ्यांसमोर येतो. यंदाचा उत्सव काही तासांवर येऊन ठेपला आहे. मुंबई-ठाण्यात उंच थरांच्या हंडीचा थरार हा कोरोना काळाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर पाहावयास मिळणार आहे. त्याच जोशात, उत्साहात गोविंदा पथके अधिकाधिक थर लावण्यासाठी आणि दहीहंडी फोडण्यासाठी तयार झाल्याचे चित्र मुंबई परिसरात पाहावयास मिळत आहे, तर दुसरीकडे आयोजकांकडून मोठी तयारी होत असल्याचे दिसत असून, अधिकाधिक थर लावणाऱ्या किंवा थरांचा विश्वविक्रम करणाऱ्या गोविंदा पथकांसाठी लाखोंची बक्षिसे आयोजकांनी ठेवली आहेत. त्यातून आयोजकांपासून ते गोविंदा पथकांपर्यंत सगळ्यांचाच उत्साह शिगेला पोहोचलेला दिसत आहे. या आनंदामध्ये आता नव्याने राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्याचा पहिल्यांदाच सरकार पातळीवर निर्णय झाला. गोविंदा पथकांना दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या निर्णयामुळे गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तत्पूर्वी, विमा इन्शुरन्स भाजप सुरक्षा कवच योजनेअंतर्गत मुंबई भाजपने गोविंदा पथकांच्या मंडळांचा दहा लाखांचा विमा काढला आहे. दहीहंडी उत्सवात सहभागी होणारे विविध मंडळांचे गोविंदा मानवी थर लावताना जखमी होतात. तसेच काहींच्या जीवावरही बेतू शकते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई भाजपच्या वतीने दहीहंडी उत्सवात अपघातग्रस्त गोविंदांना भाजपने विमा सुरक्षा कवच पुरवले आहे. मुंबईतील ३५० पथकांच्या गोविंदांचा विमा भाजपच्या वतीने उतरवण्यात आला आहे. हंडी फोडताना यामध्ये गोविंदा जखमी झाला असेल आणि त्यास दवाखान्यात उपचार घ्यावे लागत असतील, तर दवाखान्याचा खर्च तसेच गंभीर जखमी होऊन हात, पाय यास इजा होऊन अपंगत्व येणार असेल, तर पाच लाख रुपये आणि मृत्यू ओढावल्यास दहा लाख रुपये इतक्या रकमेचे हे विमा कवच आहे. मागील आठ वर्षांपासून मुंबई भाजपच्या वतीने गोविंदांना विमा सुरक्षा कवच पुरवले जात होते.
सध्या मुंबईतील गोविंदा पथकांची संख्या ८०० ते एक हजारांच्या आसपास आहे, तर एकूण गोविंदा दोन ते चार लाखांच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. सन २००० पासून ते २०१४ पर्यंत दहीहंडीमध्ये थरारांची स्पर्धा वाढत गेली. लाखो रुपयांच्या बक्षिसांसाठी आठ ते नऊ थरांचा सराव गोविंदा पथके करू लागले. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे मुंबईसह उपनगरांतील गोविंदा पथकांचे आर्थिक गणित कोलमडले. या आर्थिक संकटातून उभे राहत पुन्हा मानवी थर रचण्यासाठी पथकांची धावपळ सुरू आहे. टी-शर्ट, ट्रक-टेम्पोचा वाहन खर्च, जेवणाचा खर्च भागविण्यासाठी गोविंदा पथकांकडून देणगीदारांचा नेहमीच शोध सुरू असतो.
गोविंदा पथकांच्या प्रश्नासंदर्भात दहीहंडी समन्वय समितीची विशेष बैठक मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली. या बैठकीत बऱ्याच अडचणी येत असल्याकडे समन्वय समितीतर्फे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. प्रामुख्याने गोविंदा पथकांच्या विम्याचा, टी-शर्टसह इतर खर्चाचा भार हलका झाल्यास मोठी मदत होईल, याकडे लक्ष वेधण्यात आले होते. गोविंदा पथकांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करीत गोविंदा पथकाचा काही आर्थिक भार आपल्या संस्थेमार्फत उचलण्याची तयारी मुख्यमंत्री शिंदे यांनी दाखवली. त्यात राज्य सरकारच्या वतीने गोविंदा पथकांना विमा कवच देण्याचा निर्णय हा सर्व गोविंदांना सुखावणारा आहे.
मुंबई-ठाण्यातील दहिकाला उत्सव हा आता एक इव्हेंट म्हणून पाहिला जातो. देश-परदेशातील मंडळींना या गोविंदाचे आकर्षण असल्याने, उंच थरांच्या हंडी पाहण्यासाठी विदेशी पर्यटक या दिवशी येतात. अबालवृद्धांपासून समाजातील घटकांमध्ये जोश आणि होश निर्माण करणाऱ्या या उत्सवाला या आधी अपघाताच्या घटनांमध्ये गालबोट लागले आहे. अनेक गोविंदांना अपंगत्व पत्करावे लागले आहे, तर काहींना आपला जीव गमावावा लागला होता. त्यामुळे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेनंतर, उंच थरांच्या हंडींवर आपोआप निर्बंध आले. गोविंदा पथकांना खेळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी २०१२ साली विधिमंडळात मुंबईतील आमदारांकडून केली होती. उंच हंडी फोडणे हे साहसी खेळात मोडते, असे म्हणणे होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात करण्यात आलेल्या या मागणीकडे फारसे लक्ष कोणी दिले नव्हते. एखादी गोष्टी साध्य करण्यासाठी सामूहिक शक्तींचा उपयोग करताना, त्यातील एकाग्रता, संघभावना, एकजूट ही प्रकर्षाने जाणवते. उंच थरावर चढून हंडी फोडण्याचे कसब दाखवणाऱ्या गोविंदांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, याची कल्पना असते. तरीही ते धाडस, धैर्य त्या गोविंदांच्या ठायी असते. त्यांच्या साहसाला खरंच मनापासून सलाम. आता राज्य सरकार आपल्यासोबत असल्याने त्यांचा ऊर भरून आल्यावाचून राहणार नाही.