सदगुरू वामनराव पै
परमेश्वराचे स्वरूप हे अगम्य आहे तसे त्याचे दृश्य रूप सुद्धा अगम्य आहे. त्याचाही पत्ता लागत नाही. पूर्वी सूर्य एक आहे असे म्हटले जायचे. आता सांगतात आपल्या सूर्यासारखे हजारो सूर्य आकात आहेत. हळूहळू सांगू लागले आहेत की मोजता येणार नाहीत इतके सूर्य आकांत आहेत. ग्रह किती आहेत ते आपल्याला कुठे माहीत आहेत व जे माहीत आहेत ते अगदी थोडे आहेत. मोजता येणार नाहीत इतके ग्रह आहेत. दृश्य रूप सुद्धा इतके अनंत इतके अगम्य आहे. अर्जुन ते दृश्यरूप बघता बघता घाबरला. अर्जुनाला देवाने दिव्य दृष्टी दिली होती तरी तो म्हणतो देवा हे मला बघवत नाही. तुझ्या तोंडातून माणसे येतात काय, जातात काय हे सगळे अगम्य आहे. हे तुझे विश्वरूप बघताना माझे डोके भणभणून गेले आहे. तू ते बंद कर आणि तुझ्या मूळ रूपावर ये.” एक गोष्ट लक्षात ठेवायची की, जर कुणी मी परमेश्वर पाहिला असे म्हणत असेल तर तो खोटे बोलतो आहे. काही लोक सांगतात देव माझ्या टेलिफोनवर बोलतो. मी शंकराला फोन लावला तो माझ्या बोलतो. हे लोकांना ते खरे वाटते व त्यांच्याकडे रांग लागते. परमेश्वर माझ्या बोलतो हे जो सांगतो तो खोटे बोलतो आहे हे लक्षांत ठेवायचे व त्याच्या वाट्याला उभे राहू नका. आपल्या जीवनात परमेश्वर हा महत्त्वाचा सूर आहे तो जर सांभाळायचा असेल तर तो व्यवस्थित लावता आला पाहिजे. सा रे ग म प ध नि हे सूर लावण्याची पद्धत आहे. काही लोकांना हे सूर लावता येत नाहीत व त्यांचे गाणे हे ओरडणे होते. परमेश्वर हा स्वर महत्त्वाचा आहे म्हणूनच तो नीट सांभाळता आला पाहिजे. हा परमेश्वर अगम्य आहे. जसा आहे तसा परमेश्वर कुणाला ओळखता आलेला नाही. आजपर्यंत तो कुणाला ओळखता आलेला नाही. भविष्यांत तो कुणाला ओळखता येणे शक्य नाही हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. परमेश्वराबद्दल लोक जे काही सांगतात ते खरे किती व खोटे किती हे तुम्हाला समजावे म्हणून तुम्हाला मी हे सांगते आहे. परमेश्वर हा निर्गुण आहे तसाच तो निराकार आहे. त्याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात “अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथूनी चराचर त्यासी भजे” जेथून अनंत कोटी ब्रम्हांडे उदयाला येतात, स्थितीला राहतात, लयाला जातात व पुन्हा उदयाला येतात त्याचे तू भजन कर. भजन कर म्हणजे काय? तो अगम्य आहे तर मग त्याचे भजन कसे करायचे? जीवनविद्या सांगते “हृदयातील भगवंताचे भक्तिभावाने भान घेणे म्हणजे भजन”