Sunday, July 6, 2025

झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघात शाहबाजला संधी

झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघात शाहबाजला संधी

हरारे (वृत्तसंस्था) : भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून गुरुवार १८ ऑगस्टपासून उभय संघांमध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान भारतीय संघात संधी मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदरला दुखापतीमुळे मालिकेला मुकावे लागले आहे. त्याच्या ऐवजी युवा खेळाडू शाहबाज अहमदला संघात संधी देण्यात आली आहे.


अष्टपैलू शाहबाज अहमदचा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. तो जखमी खेळाडू वॉशिंग्टन सुंदरची जागा घेणार आहे. कौंटी सामन्यादरम्यान वॉशिंग्टन सुंदरच्या खांद्याला दुखापत झाली होती. शाहबाज हा डावखुरा फिरकी गोलंदाज तसेच पॉवर हिटर आहे.


हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शाहबाज टीम इंडियाचा भाग असेल, असे बीसीसीआयने सांगितले. शाहबाजच्या समावेशामुळे टीम इंडियात आता २ डावखुरे फिरकी अष्टपैलू खेळाडू झाले आहेत. कारण, अक्षर पटेल आधीच संघाचा एक भाग आहे.


दरम्यान भारतीय संघ झिम्बाब्वेला पोहोचला असून तेथे कसून सराव करत आहे. नुकतेच बीसीसीआयने भारतीय खेळाडू सराव करतानाचे फोटो पोस्ट केले होते.

Comments
Add Comment