देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र जनतेच्या देशभक्तीच्या भावना उचंबळून आल्या आहेत. दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र दिन साजरा होता. दरवर्षी देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्यदिनाला राजधानीतील लालकिल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करतात. पण यंदाचा स्वातंत्र्य दिन देशभर अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. यंदा उत्साह व सहभाग मोठा आहे. देशाचा उत्सव म्हणून तो साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरघर तिरंगा अशी घोषणा दिली आणि देशवासीयांमध्ये चेतना फुलवली गेली. महानगरातील उत्तुंग टॉवर्सपासून ते झोपडपट्ट्यांपर्यंत, हौसिंग सोसायट्यांपासून ते चाळींपर्यंत, लहान-मोठ्या, उद्योग-व्यापारी समूहांपासन ते छोट्या दुकानदारांपर्यंत, केंद्र व राज्य सरकारच्या सरकारी, निमसरकारी अस्थापना, खासगी कार्यालये, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे, अगदी रस्त्यावरील पानटपरीच्या दुकानांपासून ते चहाच्या ठेल्यापर्यंत सर्वंत्र भारताचा तिरंगा अभिमानाने फडकताना दिसतो आहे. गणेशोत्सव किंवा दिवाळीच्या सणासुदीच्या काळात जशी विद्युत रोषणाई सर्वत्र इमारतींवर असते, तशीच तिरंग्याची रोषणाई बघायला मिळत आहे.
१३, १४ आणि १५ ऑगस्ट रोजी तिरंगा घरोघरी फडकविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले व त्याला जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. जात, पात, धर्म, पंथ यांच्या भिंती तोडून देशवासीयांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एकजुटीचे प्रदर्शन घडवले हीच भारताची मोठी शक्ती आहे. गुलामीच्या शृखंला तुटून पंचाहत्तर वर्षे पार पडली. भारताच्या तिरंग्याला मानवंदना देताना या देशाचे आम्ही रक्षण करू, देशाची प्रगती करू आणि देशाला वैभवशाली मार्गावर नेऊ, अशी प्रतिज्ञा प्रत्येक भारतीय नागरिक करीत असतो. ही एकजूट, ऐक्य आणि निश्चय हीच भारताची ताकद आहे. गेल्या पंचाहत्तर वर्षांत राज्यांमध्ये आणि केंद्रात वेगवेगळ्या पक्षांची सरकारे आली. कोणालाही देशात मक्तेदारी निर्माण करता आली नाही. काँग्रेसने केंद्रात सहा दशकांहून अधिक काळ सत्ता उपभोगली, पण काँग्रेसला जनतेने विरोधी पक्षात बसवले. वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष केंद्रात व राज्यात सत्तेवर येऊनही पंचाहत्तर वर्षांत देशाच्या अखंडेला व सार्वभौमत्वाला तडा गेला नाही, याचे कारण देशाचे संविधान आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने देश बांधलेला आहे. या देशातील जनतेचा तिरंग्यावर दृढविश्वास आहे. दीडशे वर्षे पारतंत्र्यात काढलेला भारत हा काही सहजा-सहजी स्वतंत्र झाला नाही. त्यासाठी हजारो क्रांतिकारांनी, स्वातंत्र्यवीरांनी बलिदान केले, त्याग केला, रक्त सांडले. त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्य लढ्यातूनच १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. भारताने ७५ वर्षांत विविध क्षेत्रांत लक्षणीय झेप घेतली. विज्ञान-तंत्रज्ञानात वेगाने प्रगती केली. देशाने अंतराळात झेप घेतली. देश अण्वस्त्र संपन्न झाला. एअर कंडिशन्ड लोकल्स धावू लागल्या. नजीकच्या काळात बुलेट ट्रेन येणार आहे. गरिबांच्या घरोघरी घरगुती गॅस पोहोचला. देशभर रेल्वेचे जाळे निर्माण झाले. जम्मू- काश्मीरमधेही रेल्वेचे जाळे निर्माण होऊ लागले आहे. खासगी क्षेत्राने प्रवेश केल्यापासून देशभर विमान सेवा व प्रवाशांची गर्दी वाढली आहे. संगणकाचा वापर आता शालेय स्तरावर सर्वत्र सुरू झाला आहे. विविध सेवांचे अॅप ही अत्यावश्यक बाब बनली आहे. गेल्या पंचाहत्तर वर्षांत देशाला भ्रष्टाचाराची कीड लागली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाची सूत्रे आल्यापासून शेकडो भ्रष्टाचारी नेते व दलाल यांची चौकशी सुरू झाली आहे किंवा त्यांची जेलमध्ये रवानगी झाली आहे. विरोधी पक्ष महागाई विरोधात बोलतो, पण मोदींनी काश्मीरमधील दहशतवाद नियंत्रणाखाली आणला किंवा देशात गेल्या आठ वर्षांत मोठा दहशतवाद घडला नाही, याविषयी बोलत नाही. जातीपातीच्या व्होट बँक राजकारणातून विरोधी पक्ष बाहेर पडत नाहीत. अनेक पक्ष तर अशा व्होट बँकेवरच आपल्या भाकऱ्या शेकून घेत असतात. देशात साक्षरता वाढली, पण गुणवत्ता वाढली पाहिजे. आजही उच्च शिक्षणासाठी आणि चांगल्या जॉबसाठी मध्यमवर्गीयांची मुले युरोप, अमेरिकेत जात आहेत. कारण आपल्याकडे त्यांना पाहिजे तशी संधी मिळत नाही. जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द करण्याची हिम्मत मोदी सरकारने दाखवली. राम मंदिराच्या उभारणीतील सर्व अडथळे दूर करून त्याच्या उभारणीला सुरुवात मोदी यांच्याच कारकिर्दीत सुरू झाली. मुस्लीम महिलांना जाचक ठरलेला तिहेरी तलाख कायदा रद्द करून त्यांना दिलासा देण्याचे काम मोदींनीच करून दाखवले. मोदी सरकारने केलेली ही तीन कामे ऐतिहासिक आहेत. ३७० कलम रद्द करणे, राम मंदिराच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात किवा तिहेरी तलाख रद्द करणे याचा विचारही अन्य राजकीय पक्षांच्या मनाला कधी शिवला नव्हता. भारतीय जनतेचे मन आणि भावना जाणणारा नेता देशाला मिळाला आहे, म्हणूनच आम्ही हिंदू आहोत असे भारतीय गर्वाने म्हणू लागला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षातील ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. गेल्या ७५ वर्षांत पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या शेजारी राष्ट्रांची काय अवस्था झाली, कोविड काळात जगातील अनेक देशांना कसे हाल- अपेष्टांना सामोरे जावे लागले, पण भारताने आपला समतोल कधी ढळू दिला नाही. दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित करतात. यावर्षी पंतप्रधान कोणती नवी घोषणा करतात, याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. लोकसंख्या नियंत्रण, गोहत्या बंदीसाठी कठोर कायदा, देशद्रोही प्रवृत्तींवर लगाम ठेवण्यासाठी कठोर उपाय, काश्मीर खोऱ्यात अधूनमधून डोकावणारा दहशतवाद, राजकारणातील भ्रष्टाचार, निवडणुकीत मतदारांना दाखविली जाणारी मोफत अामिषे इत्यादी विषय ज्वलंत आहेत. देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशासाठी काय केले, हे सांगण्याचा आणि आत्मचिंतन करण्याचा आजचा दिवस आहे.