Share

प्रा. देवबा पाटील

जामनगर या गावात सुहास व विकास ही दोन मुले राहत होती. ती खूप खूप हुशार व अभ्यासू होती. एकदा ते असेच पावसाळ्याच्या दिवसांत सुट्टीच्या दिवशी सकाळी त्यांच्या शाळेच्या मैदानावर फिरायला गेले. तेथे त्यांना त्यांचे गुरुजीसुद्धा फिरायला आलेले दिसले. त्यांनी गुरुजींजवळ जाऊन त्यांना नमस्कार केला आणि नम्रतेने ते गुरुजींसोबत बोलायला लागले.

“गुरुजी, तुम्ही मागे शिकवलेली श्रावणमास ही कविता म्हणावयास आम्ही आता सुरुवात करणार होतो.” सुहास म्हणाला.
“तुम्हाला येते का ती कविता?”, गुरुजींनी विचारले.
“होय गुरुजी,” दोघांनीही एकसाथ उत्तर दिले.
“सुहास, म्हण पाहू तू प्रथम कडवे.” गुरुजी म्हणाले.
“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे। क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे।।” सुहासने आपल्या गोड आवाजात तालबद्धतेने पहिले कडवे म्हटले.

“गुरुजी, शिरवे म्हणजे काय हो?” मध्येच विकासने विचारले.
“शिरवे म्हणजे पावसाच्या सरी.” गुरुजी म्हणाले.
“पावसाच्या सरीवर सरी कशा काय पडतात गुरुजी?” विकासने विचारले.

गुरुजी सांगू लागले, “सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते. वाफेपासून ढग बनतात. ढगांपासून थंडाव्याने पाऊस पडतो. पावसाचे थेंब खूप उंचावरून एकामागे एक ओळीने खाली येत असल्याने ते थोडेसे लांबतात व त्यांच्या तुटक तुटक सरी बनतात. पाऊस पडताना असणाऱ्या वाऱ्याने या सरी तिरप्या पडतात; परंतु वारा नसल्यास मात्र पाऊस सरळच पडतो.”

सुहास विचारू लागला, “पाण्याच्या वाफेपासून ढग बनतात असे म्हणतात; परंतु ती वाफ तर वर जाताना आपणास कधीच दिसत नाही. याचे कारण काय गुरुजी?”

गुरुजी म्हणाले, “बाष्प म्हणजे वाफ. पाण्याची वाफ होण्याच्या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. ही बाष्पीभवनाची क्रिया अतिशय मंद असून ती कोणत्याही तापमानात होत असल्यामुळे त्यात निर्माण होणारी वाफ डोळ्यांना दिसू शकत नाही. पण वाफेपासून हे ढग कसे काय बनतात गुरुजी?” सुहासने विचारले.

गुरुजी सांगू लागले, “त्याचं असं आहे. पाण्याची वाफ हवेत साठून राहते. ही बाष्पयुक्त हवा गरम व हलकी झाल्याने वर जाते. जसजसे उंचावर जावे तसतशी हवा थंड होते व त्याचबरोबर हवेतील वाफही थंड होते. ही वाफ धूलिकणांवर बसून पाण्याचे सूक्ष्म कण, जलबिंदू तयार होतात. असे असंख्य कण एकत्र आले म्हणजे त्यापासून ढग बनतो.”

“गुरुजी आपणास ढगांचा गडगडाट इतक्या दुरूनही कसा काय ऐकू येतो?” विकासने विचारले.
गुरुजी म्हणाले, “ढगांमधील असंख्य जलबिंदू हे खूप वेगाने वर खाली, स्वत:भोवती व एकमेकांभोवती फिरतात. त्यामुळे त्यांच्यात व हवेच्या कणांमध्ये घर्षण होऊन काही ढगांवर धन विद्युत प्रभार, तर काही ढगांवर ऋण विद्युत प्रभार निर्माण होतो. हे विद्युत प्रभारित ढग हवेसोबत वाहताना एकमेकांवर आदळतात व त्यांच्या एकमेकांवर आपटल्याने प्रचंड मोठा गडगड असा आवाज निर्माण होतो.”
“मग विजा कशा काय चमकतात गुरुजी?” सुहासने आपली शंका विचारली.

“दोन विरुद्ध विद्युत प्रभारित ढग एकमेकांजवळ आले, तर त्यांच्यातील विभवांतरामुळे म्हणजेच विद्युत प्रभाराच्या फरकामुळे तेथेसुद्धा विद्युत निर्माण होते म्हणजेच त्यांच्या आकर्षण घर्षणाने तेज:पुंज ठिणगी पडून वीज निर्माण होते. तीच वीज तेजस्वी प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर पडते व आपणास विजेचा प्रकाश चमकताना दिसतो.” गुरुजी म्हणाले.
“गुरुजी आपणास वीज आधी चमकताना दिसते व ढगांचा गडगडाट नंतर का ऐकू येतो?” विकासने प्रश्न केला.
“विजेचा चमचमाट व ढगांचा गडगडाट हे एकाच वेळी घडतात; परंतु प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा खूप जास्त असल्याने आपणास आधी वीज चमकताना दिसते आणि थोड्या उशिराने ढगांचा गडगडाट ऐकू येतो.” गुरुजींनी सांगितले.

“गुरुजी पुष्कळ वेळा गारांचा वर्षाव होण्याचे कारण काय असावे?” सुहासने शंका काढली.
“हे ढग हवेबरोबर वाहवत जातात. त्यातील वाफेचे पाणी होण्यास वातावरणातील पुरेसा थंडावा मिळाला म्हणजे पाऊस पडतो. बरेच वेळा हे ढग अति उंचावर व अति थंड भागात जातात. त्या अति थंड भागात सापडलेले पावसाचे थेंब गोठतात व त्यांच्या गारा बनतात, किंवा बऱ्याच वेळा बर्फ बनते. म्हणून बऱ्याच वेळा गारांचा पाऊस पडतो किंवा हिमवर्षाव होतो.” गुरुजींनी नीट समजावून सांगितले.

एवढ्यात आकाशात पावसाचे काळे ढग जमा होत असलेले त्यांना दिसले. ते बघून गुरुजी म्हणाले, “मुलांनो, आता आकाशात पावसाचे काळे घनगर्द ढग जमू लागले आहेत. त्यामुळे पावसाच्या सरी येण्याची दाट शक्यता आहे. तरी मला वाटते आता आपण घराकडे परतू या.” गुरुजींनी असे म्हटले नि सुहास, विकास व गुरुजी घराकडे चालू लागले.

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

32 minutes ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

57 minutes ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

2 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

3 hours ago