Categories: मनोरंजन

पिया का घर प्यारा लगे!

Share

श्रीनिवास बेलसरे

गुजराथी कादंबरीकार गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी यांच्या ‘सरस्वतीचंद्र’ नावाच्या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा सिनेमा आला होता १९६८ साली. नूतन आणि ‘मनीष’ (मूळचे बंगाली नाट्यकलाकार अशीमकुमार) यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही शोकांतिका दिग्दर्शित केली होती गोविंद सरैयांनी! सुरुवातीला ते कुमुदच्या भूमिकेसाठी निम्मीचा विचार करत होते, तर सरस्वतीचंद्रसाठी चक्क दिलीपकुमार आणि राजेंद्रकुमारचाही विचार झाला होता. हा सिनेमा आजही अनेकांच्या लक्षात असण्याचे मुख्य कारण त्यातली शामलाल बाबू राय ऊर्फ ‘इंदीवर’ यांची भावमधुर गाणी! इंदीवर आणि कल्याणजी-आनंदजी यांनी ती अजरामर केली आहेत. मात्र गंमत म्हणजे सुरुवातीला गीतकार म्हणून गोविंद सुरैयांच्या मनात होते पंडित ओमकारनाथ ठाकूर. पण दुर्दैवाने त्यांचे १९६७ला निधन झाले.

सिनेमात रमेश देव, सीमा, सुलोचना हे मराठी कलाकारही होते. सरस्वतीचंद्रने चार पुरस्कारही पटकावले! राष्ट्रीय फिल्म पुरस्कार (१९६९) शिवाय सर्वश्रेष्ठ छायांकनासाठीचा पुरस्कार नरिमन इराणी यांना, तर सर्वश्रेष्ठ संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार कल्याणजी-आनंदजीना मिळाला! शिवाय १९६९चा फिल्मफेयरचा संवादलेखनाचा पुरस्कार मिळाला अली रजा यांना!

सरस्वतीचंद्र ही एक तरल पण अपयशी ठरलेल्या प्रेमाची कहाणी होती. यात इंदीवर यांना त्यांच्या खास शैलीत भावविव्हळ कविता लिहिण्याची जणू पर्वणीच मिळाली! मुकेश आणि लतादीदींनी एकेकदा गायलेले – ‘चंदनसा बदन चंचल चितवन, धीरेसे तेरा ये मुसकाना, असो किंवा मुकेशच्या नितळ आवाजाने अस्वस्थ करणारे ‘हमने अपना सबकुछ खोया प्यार तेरा पानेको’ असो किंवा मुकेश आणि दीदीचे द्वंद्वगीत ‘फुल तुम्हे भेजा हैं खतमें, फुल नहीं मेरा दिल हैं’ असो. ही गाणी मनाला आतून-बाहेरून मोहरून टाकत.

असेच एक गाणे होते दीदींच्या निरागस आवाजातले – “मैं तो भूल चली बाबुलका देस, पिया का घर प्यारा लगे.” कल्याणजी-आनंदजींचे संगीत, विशेषत: चाल इतकी जबरदस्त आहे की, १९६८ पासून आजतागायत हे गाणे गरब्याच्या प्रत्येक कार्यक्रमात वाजतेच वाजते! गंमत म्हणजे गाण्यातील प्रत्येक ओळ साफ खोटी आहे.

नायिका कुमुद (नूतन) आपल्या सासरचे असे वर्णन करते आहे की, ऐकणाऱ्याला वाटावे मुलगी सासरी अतिशय सुखाने नांदते आहे. तिला माहेरची आठवणही येत नाही. ती ‘बाबुलका देस’ पूर्णपणे विसरून गेली आहे. सिनेमात परिस्थिती अगदी वेगळी आहे.

कुमुदला सासरी तिळमात्र सुख नाही. तिचा पती असलेला प्रमाद (रमेश देव) हा दारूडा, बाहेरख्याली आहे. त्याला कसलीच लाज वाटत नाही. तो पत्नीला आपल्या व्यसनाविषयी सांगून हे सगळे मुकाट चालवून घे, असे म्हणतो. पत्नीचा सन्मान हे शब्द त्याच्या शब्दकोशातच नाहीत. तरीही कुमुद आपला संसार छान चालला आहे, असे भासवण्यासाठी हे गाणे गाते. सासरी सगळे अगदी स्वप्नवत सुंदर आहे, असे भासवताना ती म्हणते –

“मैं तो भूल चली बाबुलका देस,
पिया का घर प्यारा लगे,
कोई मैके को दे दो संदेस,
पियाका घर प्यारा लगे…!”

खरे तर त्या काळी ही घराघरांतलीच कहाणी होती. विवाहित महिला सासरचे मनमोहक चित्र उभे करून गरीब आई-वडिलांना मानसिक त्रास होऊ नये म्हणून अनेकदा खोटेच बोलत. समाजात अनेक कुप्रथा रूढ असल्याने कुणाही स्त्रीचे सासर असे असणे जवळजवळ अशक्य होते. याला अपवाद नेहमीच असतात तसे तेव्हाही होते. मात्र सर्वसाधारण चित्र हे गाण्यात वर्णन केलेल्या परिस्थितीच्या नेमके उलटे असायचे.

नणंद म्हणजे पतीची बहीण आपल्याला बॉसिंग करायला एक हक्काचे पात्र मिळाल्यासारखे वहिनीला वागवे. तिच्याबद्दल तक्रारी करणे हे जणू आपले कर्तव्य आहे असे तिला वाटे. दुसऱ्या कुटुंबातून आलेल्या, नव्या घरात बावरलेल्या या मुलीने अंतर्ज्ञानाने आपले मन ओळखून आपल्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, आपली सेवा करावी अशीच सासू आणि नणंद नावाच्या दुसऱ्या स्त्रियांची अपेक्षा असे!

फारशा स्त्रिया नोकरी करत नसल्याने त्यांना २४ तास घरातच राहावे लागे. सर्वांची सेवा, आज्ञापालन, भरपूर शारीरिक कष्टाची कामे हा त्यांचा दिनक्रम असे. घरात सदस्यसंख्याही मोठी असल्याने पतीची एकट्याची भेटसुद्धा क्वचित होई. अनेकदा तर त्यालाही पुरुषी अहंकाराने घेरलेले असे. तो स्वत:ला पत्नीचा मालकच समजे. गीतकार इंदीवर यांनी समाजमनाच्या फळ्यावर असलेले हे सर्वसाधारण चित्र ओल्या फडक्याने पुसून भिजवलेल्या खडूने एक सुंदर स्वप्नचित्र उभे केले होते –

ननदीमें देखी हैं बहना की सूरत,
सासूजी मेरी हैं ममता की मूरत,
पिता जैसा, ससुरजी का भेस…

कुमुद म्हणते, माझा दिवसही खूप सुखात जातो आणि रात्रही आनंदात जाते. कारण माझा पती मला अतिशय प्रिय आहे. माझे मन आणि त्याचे मन इतके एकरूप झाले आहे की, त्याच्या मनातली गोष्ट मला नुसते त्याच्या डोळ्यांकडे बघूनही कळते…

चँदा भी प्यारा हैं सूरज भी प्यारा
पर सबसे प्यारा हैं सजना हमारा
आँखें समझे जियाका संदेस, पिया…

पतीला मी इतकी आवडते की, ते सतत डोळ्यांत डोळे घालून एकटक मलाच पाहत बसतात. त्यांना माझा सहवास सतत हवा असतो, मला क्षणभरही एकटे सोडत नाहीत. खरेच माझ्या जीवाला सासरी काहीही त्रास नाहीये. मी माहेर पूर्णपणे विसरून गेलेले आहे –

बैठा रहे सैयां नैनोंको जोड़े
इक पल वो मुझको अकेला ना छोड़े
नहीं जियां को कोई क्लेश,
पिया का घर प्यारा लगे…

आज परिस्थिती बदलली आहे. अनेक घरात तर चक्क स्त्रीराज्यही अवतरले आहे. पण कधी कधी जुन्या आठवणी प्रियच वाटतात. इंदीवरजी, आपका लिखा हुआ ‘पिया का घर, आज भी बडा प्यारा लगे!’

Recent Posts

RCB vs RR, IPL 2025: आरसीबीचे राजस्थानला २०६ धावांचे आव्हान

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…

8 minutes ago

Simla Agreement: भारताने सिंधू नदीचे पाणी थांबवले तर पाकिस्तानकडून शिमला करार स्थगित करण्याची दर्पोक्ती! काय आहे हा शिमला करार?

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…

17 minutes ago

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…

39 minutes ago

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…

1 hour ago

Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…

2 hours ago

INS सूरतवरुन यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…

2 hours ago