रवींद्र तांबे
शहरामध्ये आपल्या जीवाची मजा करण्यासाठी श्रीमंत लोक जरी सोसायटीतील रहिवाशांना त्रास झाला तरी कुत्रा, मांजर, पोपट, कबुतर व चिमण्या पाळतात. मात्र खेडेगावातील गरीब शेतकरी यांचा विचार करता जमीन नांगरणीसाठी बैल किंवा रेड्यांची जोडी असते. त्याच्या जोडीला गाय व म्हशी दूध-दुभत्यासाठी पाळल्या जातात. तरीपण गरीब शेतकरी आपल्या बैलांना सांभाळत असताना त्याच्या जोडीला तीन ते चार महिने राखणीसाठी बैलसुद्धा सांभाळले जातात. कारण शेतीला हा पूरक जोडधंदा म्हणावा लागेल. तेवढेच एक उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे आर्थिक आधार गरीब शेतकऱ्यांना होतो. सध्या हा आर्थिक आधार दुरावत चालला आहे. मुख्य म्हणजे पाणीटंचाई, दिवसेंदिवस सुपीक जमिनीवर वाढणारी सिमेंटची जंगले आणि वाढती महागाई त्यामुळे शेतकऱ्यांना गुरे पाळणेसुद्धा कठीण झाले आहे. असे असले तरी राखणीतील बैलांमुळे थोडा का होईना त्यांना आर्थिक आधार मिळतो. सध्या तो कमी होत आहे, हे शेतीप्रधान देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल. अर्थात शेतीकडे दुर्लक्ष होत आहे, हे मात्र निश्चित.
बैलांना चरायला जागा नसल्यामुळे काही शेतकरी आसपासच्या गावामध्ये अथवा ओळखीच्या व्यक्तीकडे पावसाळ्यात भातलावणी झाली की, बैल राखणीला घालतात. काही शेतकरी आपले बैल सांभाळताना दुसऱ्याचे बैलसुद्धा सांभाळत असतात. आम्हीपण राखनितले बैल सांभाळत असू त्यावेळी एका जोडीला चारशे रुपये द्यायचे. त्यामुळे काही शेतकरी दादांना आर्थिक आधार व्हायचा. त्यासाठी स्वत:ची जागा किंवा माळरान मोकळा असावा लागतो. जमीनदारांनी आपल्या स्वत:च्या जागेत आता जरी आंबे व काजू लावून जमिनीच्या चारी बाजूने कुंपण घातले असले तरी त्यावेळी माळरान मोकळे होते. कोणाच्याही जमिनीमध्ये गुरे चरविण्यासाठी घेऊन गेलो तरी कोण काहीही बोलत नसत.
उलट आपल्या पडीक जमिनीमध्ये गुरे चरताना पाहून जमीनमालकाला आनंद होत असे. तसेच काही शेतकरी राखणीसाठी बैल घेण्यासाठी वाडा मोठा बांधत असत. सकाळीच शेतकरी उठून त्यांना रानात घेऊन जात असतात. सप्टेंबर महिन्यापर्यंत दिवसभर रानात बैल ठेवायचे संध्याकाळी घरी घेऊन यायचे. त्यानंतर रात्री आठ साडेआठच्या सुमारास चार घालत असतात. असा दिनक्रम गुरे पाळणाऱ्या गुराख्याचा असतो.
राखनितले बैल आल्यानंतर गुराख्याला धीर येईपर्यंत जवळजवळ एक आठवडा जातो. बऱ्याच वेळा मालक नवका व परकी जागा असल्यामुळे बैलाने लाथ मारणे, धावत अंगावर येणे किंवा मान ताठ करून उभे रहाणे त्यामुळे त्यांच्या सवयी समजायला वेळ जात असतो. मात्र हाडाचा शेतकरी असल्यामुळे बऱ्याच वेळा बैल बघून त्याचे गुण काय आहेत हे पटकन ओळखणारा हा शेतकरी असतो. शिक्षण जरी अपुरे असले तरी अनुभवाच्या जोरावर पारख करणारा पटाईत असतो. सध्या राखणीसाठी बैल पण भेटत नाहीत. त्यामुळे चार महिने का होईना त्यांच्या हातचा एक आधार गेल्याचे दु:ख त्यांना होते. बैलांचा मालक राखणीचे बैल ज्यावेळी घेऊन येतात त्यावेळी काही रक्कम बैलमालक त्यांना देतो. जेव्हा परत बैल घेऊन जाण्यासाठी बैलांचा मालक येतो, तेव्हा बैल सांभाळण्याचे जे पैसे ठरलेले असतील ते बैल मालक राखणदाराला देत असतात. काही वेळा बैलांना बघण्यासाठी बैलमालक अधून-मधूनसुद्धा येतात; परंतु बैलांची उत्तम प्रकारे काळजी घेतल्यामुळे बैलमालक स्वखुशीने कुळीथ, उडीद, भुईमुगाच्या शेंगा तसेच हातरुमाल व टॉवेलसुद्धा राखणदाराला देतात. म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांचे आर्थिक साधन म्हणता येईल. मात्र अलीकडे लोक जनावरे पाळणे टाळत आहेत.
ज्यावेळी त्यांचा मालक बैलांच्या गळ्यात दाव्या बांधतो. त्यावेळी नेहमी गळ्यातील दाव्या सोडल्यावर वाड्याच्या बाहेर येणारा बैल वाड्याच्या बाहेर यायला मागत नाही. जाग्यावरच उभा राहतो. त्याला माहीत होते की, उद्यापासून आपले मुक्काम या ठिकाणी नाही. त्याच्यासमोर जरी त्याचा मालक उभा असला तरी तो आपली राखण केलेल्या मालकाकडे पाहून त्याच्या डोळ्यांत पाणी येतं. तसे राखणदाराच्या सुद्धा. मात्र जड अंत:करणाने तो त्या बैलांना म्हणतो, ‘अरे चला तुमच्या गावी जायचे आहे. तुम्ही नांगरणी केलेल्या जमिनीतले पीक मालकांनी कापले आहे. आता तुम्हाला बागडायला जागा मोकळी झाली.’ बैलांचा मालक गोठ्याच्या बाहेर येतो. आपली पिशवी खाकेला लावतो, हातात चीव्याचा बांबू व लींगडीची काठी घेऊन तो पुढे लागतो. राखणदार शेतकरी आपल्या दबक्या आवाजात बैलांना सांगतो की, ‘चला आपला मालक पुढे लागला आहे, त्याच्यामागून चला. वर्ष केव्हाच जाईल. शेतीची कामे झाली की, पुन्हा याच ठिकाणी यायचे आहे तुम्हाला.’ तसे बैल गोठ्यातून बाहेर पडतात आणि आपल्या मालकाच्या मागून मार्गस्थ होतात.
बैल जरी मुके असले, तरी ते भावना बरोबर ओळखत असतात. त्याची जाणीव केवळ राज्यातील नव्हे, तर देशातील प्रत्येक शेतकऱ्यांना असते. आता जरी शासनाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला तरी राखणीतल्या बैलांमुळे आर्थिक हातभार यापुढे लाभणार नाही, याचे दु:ख गरीब शेतकरीदादांना होत आहे.