नितीन सप्रे
इंग्रजी सत्तेच्या दास्यशृंखला च्छिन्न-भिन्न करून १५ ऑगस्ट, १९४७ ला भारतभूच्या क्षितिजावर दिव्य स्वातंत्र्यरवी तळपला. देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झालीत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लाखो लोकांनी अमूल्य योगदान दिलं. कित्येकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे आणि अविरत ७५ वर्षांत देशानं केलेल्या प्रगतीचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. लाखो देशभक्तांच्या असीम त्यागामुळेच आज नभांगणात तिरंगा मोठ्या गौरवानं फडकत आहे. त्या सर्वांना शतश: नमन.
देशात लोकसेवा प्रसारकाची भूमिका समर्थपणे सांभाळणारी सार्वजनिक प्रसारण सेवा म्हणजे दूरदर्शन. ही वाहिनीदेखील ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियानात सशक्त योगदान देत आहे. ‘नए भारत का नया दूरदर्शन’, ही संकल्पना मूर्त स्वरूपात साकारण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन दूरदर्शननेही आपल्या कार्यक्रमात नवं चैतन्य प्रवाहित केलं आहे. ‘स्वराज – भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ हे त्यापैकीच एक पाऊल. हा एक मेगा ऐतिहासिक डॉक्यू ड्रामा आहे. जो पंधराव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा निडर, गौरवशाली इतिहास दूरदर्शनच्या पडद्यावर आपल्यासमोर जिवंत करणार आहे.
या धारावाहिकेत केवळ इंग्रजी सत्तेविरोधातील उठावांबद्दलच नाही, तर पोर्तुगीज, डच, फ्रांस या वसाहतवादी सत्तांनी भारताच्या विपुल संपत्तीची जी लूट केली आणि ज्या देशभक्त नायकांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवला, त्यांच्या आजवर फारश्या उजेडात न आलेल्या संघर्षकथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहेत.
एकूण ७५ भागांच्या या मालिकेत देशाच्या इतिहासाचे ज्ञात-अज्ञात पैलू तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रचलित-अप्रचलित संघर्षकथा, गौरवगाथा अधोरेखित करण्यात येणार आहेत. यात राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपे, मादाम कामा, गणेश तथा विनायक सावरकर, नानासाहेब तथा बाजीराव पेशवा यांच्यासारख्या ज्ञात स्वातंत्र्यसैनिकांबरोबरच राणी अबाक्का, बक्षी जगबंधू, यू. टिरोत सिंह, सिद्धो कान्हो मुर्मू, शिवप्पा नायक, कान्होजी आंग्रे, राणी गैदिनलिऊ, तिलका मांझी यांच्यासारख्या काही प्रमाणात कमी ज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या समरकथा सुद्धा प्रसारित केल्या जातील. ह्या मालिकेसाठी ४के/एच.डी सारखी उच्च तंत्र गुणवत्ता आणि गहन शोधकार्य सुनिश्चित करण्यात आलं आहे. साहजिकच ऐतिहासिक दृष्टीनंदेखील ही मालिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लोकप्रिय चित्रपट अभिनेता, मनोज जोशी यांनी या मालिकेत सूत्रधाराची भूमिका साकारली आहे. ‘स्वराज’ दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर १४ ऑगस्ट, २०२२ पासून प्रत्येक रविवारी रात्री ९ ते १० दरम्यान प्रसारित केली जाईल. तत्पश्चात इंग्रजी आणि तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, मराठी, गुजराती, बंगाली, उडिया तसेच असमिया अशा ९ प्रादेशिक भाषांमध्येही २० ऑगस्ट पासून रात्री ८ ते ९ या वेळेत प्रादेशिक केंद्रांवरून ही मालिका प्रसारित केली जाईल. आठवड्यात मालिकेच्या भागाचं पुनःप्रसारणही करण्यात येईल.
शुभारंभ व स्पेशल स्क्रीनिंग
अलीकडेच ५ ऑगस्टला या मालिकेचा पहिला भाग मनोज जोशी, गजेंद्र चौहान आणि मालिकेतील काही कलाकारांच्या समवेत आकाशवाणी दिल्लीच्या रंगभवन सभागृहात पाहण्याचा योग आला. ‘स्वराज’च्या शुभारंभ आणि स्पेशल स्क्रिनिंग साठी मुख्य अतिथी म्हणून भारताचे गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. ‘स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी, जनमानसातील प्रत्येक हीन भावना समूळ उपटून त्यांच्या मनात गौरवभावना प्रस्थापित करणं, हेच ‘स्वराज’ धारावाहिकेचे उद्दिष्ट्य असले पाहिजे, तरच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं सार्थक झालं असं म्हणता येईल’, असं यावेळी केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. लोकसेवा प्रसारण माध्यमांची विशेष प्रशंसा करताना ते म्हणाले की, ‘भारतीयत्वाचा भावनेची अभिव्यक्ति, केवळ आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमातूनच होऊ शकते. या दोन्ही माध्यमांनी अनेक कार्यक्रमांद्वारे वेळोवेळी देशातील जनतेला खडबडून जागं करून, संस्कारित करून, भावना चेतवून त्या प्रवाहित करून अंततोगत्वा सृजनशक्तीचा संग्रह करण्याचं मोठं कार्य केलं आहे.’ भारतीय स्वराज्याची संकल्पना विषद करताना अमित शहा म्हणाले की, ‘भारतात स्वराज शब्दचा अर्थ स्वशासन इतकाच मर्यादित नाही, तर स्वराज म्हणजे स्वतंत्र भारताचा कारभार स्वपद्धतीनं चालवणं असा आहे.’ स्वराज्याच्या संकल्पनेत स्वभाषा, स्वधर्म, स्वसंस्कृती आणि आपल्या कलांचाही अंतर्भाव आहे. स्वराज्याच्या संकल्पनेशी योग्य भावनेने जोपर्यंत आपण जोडले जाणार नाहीम तोपर्यंत भारत खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला असे म्हणता येणार नाही.
अमृत महोत्सवानंतर ज्यावेळी शताब्दी साजरी केली जाईल, त्यावेळी आपण आपल्या भाषांना जर वाचवू शकलो नाही, येणाऱ्या पिढ्यांना गौरवशाली इतिहास सांगू शकलो नाही आणि हजारो वर्षांपासून चालत आलेली संस्कृती टिकवून ठेवू शकलो नाही, तर स्वराज्य प्राप्त केलं असं म्हणता येईल? या अानुषंगाने स्वराज धारावाहिक औचित्यपूर्ण ठरेल, असा विश्वास गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.
‘स्वराज’ करणार प्रेक्षकांवर राज्य
शुभारंभाचा भाग बघितल्यावर मनात हा विश्वास निर्माण झाला की, हम लोग, खानदान, बुनियाद, रामायण, महाभारत, मालगुडी डेज, नुक्कड, फौजी, गुल गुलशन गुलफाम, चाणक्य, मुंगेरीलाल के हसीन सपने यांसारख्या विभिन्न विषयांवरच्या मालिकांद्वारे प्रेक्षकांना मोहीत करणारी दूरदर्शन वाहिनी आता ‘स्वराज’ मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सिद्ध झाली आहे.