Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीतैवानच्या कोंडीची जगाला भीती

तैवानच्या कोंडीची जगाला भीती

अजय तिवारी

अमेरिकन संसदेच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीनमध्ये नाराजी आहे. चीनने तैवानला चारही बाजूंनी घेरून लष्करी कवायती सुरू केल्या आहेत. या कवायतीद्वारे चीन केवळ तैवानलाच नाही तर अमेरिकेलाही धमकावत आहे; मात्र तैवान आपल्या खास रणनीतीमुळे चीनसारख्या बलाढ्य देशाला घाबरत नाही. असं असलं तरी चीनने तैवानची कोंडी केली, तर अवघ्या जगाला परिणाम भोगावे लागतील.

अमेरिकन संसदेच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यापासून चीन संतापला आहे. अमेरिकेच्या या कारवाईमुळे चीनने लष्करी सराव सुरू केला आहे. तैवानजवळून उड्डाण करताना अनेक चिनी क्षेपणास्त्रांनी समुद्रात त्यांच्या लक्ष्यांवर धडक दिली. या कवायतीमुळे चीन केवळ तैवानलाच नाही तर अमेरिका आणि जपानलाही इशारा देत आहे. तसं पाहिलं तर तैवान चीनसमोर अगदीच लहान देश आहे. त्याचं लष्करी दल चीनच्या तुलनेत अगदीच कमी आहे; पण असं असूनही चीनच्या धमक्यांचा तैवानवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. तैवानने चीनविरुद्ध ‘पार्कअपिन’ (पोर्क्युपिन) रणनीती आखली आहे. ज्याप्रमाणे ‘पार्क्युपिन’च्या अंगावर तीक्ष्ण काट्यासारखे केस असतात आणि धोका असतो तेव्हा हा प्राणी आपल्या संरक्षणासाठी काटे पसरतो, त्याप्रमाणे तैवाननेही आपल्या सुरक्षेसाठी खास रणनीती अवलंबली आहे. अनेक देश तैवानसाठी सुरक्षा वर्तुळ बनवत आहेत. चीनला स्वतःच्या किनाऱ्यावर घेरून त्यावर हल्ला करण्याची तैवानची रणनीती आहे. तैवानकडे ‘पॅक-३’ हवाई संरक्षण प्रणालीसारखी शस्त्रं आहेत, जी चीनची क्षेपणास्त्रं तसंच त्याची लढाऊ विमानं आणि ड्रोन पाडण्यास सक्षम आहेत. याशिवाय तैवानकडे मोठ्या प्रमाणात ‘पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टिम स्ट्रिंगर्स’ आणि ‘अँटी-टँक जेव्हलिन मिसाइल्स’ आहेत. तैवानकडे असलेली अमेरिकन हार्पून क्षेपणास्त्रं चिनी युद्धनौकांना पाडू शकतात. याशिवाय तैवानकडे अमेरिकेने दिलेली अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्रं आणि शस्त्रं आहेत.

तैवान हा आपला भाग असल्याचा दावा चीन करत असला तरी तैवान १९४९ पासून स्वतंत्र आहे. त्याचं स्वतःचं संविधान आहे, स्वतःचं सैन्य आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्य राष्ट्रांपैकी १४ देशांनी तैवानला मान्यता दिली आहे. अशा परिस्थितीत तैवानला इतर अनेक देशांचा पाठिंबा मिळाला आहे. तैवानवर थेट हल्ला करणं चीनसाठी सोपं नाही. चीनने तैवानवर हल्ला केला तरी या छोट्याशा देशाला जिंकणं त्याच्यासाठी सहज सोपं नाही. याचं कारण म्हणजे तैवानची भौगोलिक स्थिती. तैवान चारही बाजूंनी समुद्रानं वेढलेला आहे. तिथले पर्वत आणि तळडाली समुद्रकिनारे अत्यंत धोकादायक आहेत. चिनी रणगाड्यांना या भागातून तैवानमध्ये प्रवेश करणं सोपं नाही. चीन फार तर त्याच्या भूमीलगत असलेल्या दहा-बारा किलोमीटरच्या मात्सु आणि क्वेम बंदरावर हल्ला करू शकतो. शंभर किलोमीटर आत असलेल्या तैवानच्या भूमीवर हल्ला करण्याचं धाडस चीन करणार नाही.

चीनच्या तैवानबाबतच्या आक्रमक भूमिकेमुळे जगाची चिंता वाढली आहे. चीनचा तैवानवर हल्ला झाला तर संपूर्ण जगावर त्याचे गंभीर परिणाम होतील. कार ते स्मार्टफोन, लॅपटॉप यांसारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह वॉशिंग मशीन, फ्रीज अशा अनेक वस्तूंच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. तैवानबाबत चीनच्या आक्रमक भूमिकेमुळे जगभरात सेमीकंडक्टर आणि चिप्सचं संकट ओढवलं आहे. कोरोनाच्या काळात पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानंतर जगभर सेमीकंडक्टरची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे जगभरातच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध होत नव्हत्या आणि या वस्तूंच्या किंमती महागल्या. विविध अहवालांनुसार तैवान जगातल्या ६४ टक्के चिप्सचा पुरवठा करतो, त्यात ‘तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’(टीएसएमसी)चा वाटा निम्म्याहून अधिक आहे. तैवानवर चीनचा हल्ला वाढला तर वॉशिंग मशीन, फ्रीज यांसारख्या अनेक वस्तूंच्या उत्पादनावर परिणाम होईल तसंच कार, स्मार्टफोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनावर परिणाम होईल. कारण या इलेक्ट्रानिक्स वस्तूंमध्ये चिप्स वापरल्या जातात. गेल्या दोन वर्षांच्या सेमीकंडक्टरच्या टंचाईच्या संकटातून जग अजूनही बाहेर आलेलं नाही. त्यामुळे कार कंपन्या अजूनही क्षमतेपेक्षा कमी उत्पादन करत आहेत. भारत पूर्णपणे चिप्सच्या आयातीवर अवलंबून आहे. भारत प्रामुख्याने तैवान, हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया, सिंगापूर या देशांमधून चिप्स आयात करतो.

चीनची ताजी भूमिका पाहता, चिपचं उत्पादन करणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या ‘टीएसएमसी’ या कंपनीचे अध्यक्ष मार्क लिऊ यांनीही तैवानवर हल्ला झाल्यास चिप्सच्या उत्पादनात मोठ्या अडचणी येतील, असं स्पष्ट केलं आहे. संपूर्ण उद्योगधंद्यांना याचा फटका बसणार आहे. औद्योगिक संघटना ‘सीआयआय’च्या ‘आसीटीई मॅन्युफॅक्चरिंग नॅशनल कमिटी’चे अध्यक्ष विनोद शर्मा यांनी सांगितलं की, तैवानवरील हल्ला संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरेल. कारण चिप्सची पुरवठा साखळी आधीच गुंतागुंतीची आहे. चिप्सच्या उत्पादनाशी संबंधित फॅब तयार करण्यासाठी दोन वर्षं लागतात. अशा परिस्थितीत हल्ला झाल्यास संपूर्ण उद्योगावर परिणाम होईल. ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’ (एफएडीए)च्या म्हणण्यानुसार चीन आणि तैवान यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सेमीकंडक्टर टंचाईचा धोका पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. भारतालाही याचा फटका बसेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तैवान अडचणीत आल्यास भारतातल्या सेमीकंडक्टर उत्पादन कार्यक्रमालाही विलंब होऊ शकतो.

सेमीकंडक्टर उत्पादनासाठी दोन्ही देशांमध्ये आगाऊ चर्चा झाली असून लवकरच औपचारिक करारावर स्वाक्षरी होऊ शकते; पण हल्ला झाल्यास हा करार टळू शकतो. भारतही तैवानवर अवलंबून आहे. भारत तैवानमधून सेमीकंडक्टर्स तसंच इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आयात करतो आणि या वर्षी मे महिन्यात तैवानमधून झालेल्या आयातीत गेल्या वर्षीच्या मेच्या तुलनेत १०९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चीन तैवानवर हल्ला करणार नाही. कारण चीन स्वतः सेमीकंडक्टरसाठी तैवानवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अॅप्पल फोनपासून इतर अनेक फोन निर्माते चीनमध्ये काम करत आहेत. चीनने तैवानवर हल्ला केल्यास चीनस्थित कंपन्यांचं उत्पादनही ठप्प होईल. चीन तैवानवर अवलंबून आहे. चीन स्वतःही चिप्स बनवतो; परंतु मर्यादित प्रमाणात आणि चिप्सशी संबंधित अनेक वस्तूंसाठी तैवानवर अवलंबून आहे. दुसरीकडे, ‘टीएसएमसी’ ही अमेरिकेत पाच नॅनोमीटरचा अर्धसंवाहक कारखाना उभारत असून हे कारखाने २०२४ पर्यंत कार्यान्वित होतील. हे नॅनोमीटर सेमीकंडक्टर गुणवत्तेच्या बाबतीत सध्या तैवानमध्ये बनवल्या जात असलेल्या सेमी कंडक्टर्सना मागे टाकतील.

नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीन हादरला आहे. चीन आणि तैवानमधला तणाव वाढला आहे. तसंच या भेटीचा संपूर्ण जगावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तैवानच्या प्रत्येक हालचालींवर चीन लक्ष ठेवून आहे. तैवान आणि चीनमधला तणाव वाढला तर त्याचे जगावर काय परिणाम होतील, याचा अंदाज आता जगभरातील तज्ज्ञ लावत आहेत. या तणावाचा भारतासह अन्य देशांच्या तंत्रज्ञान क्षेत्रावर सगळ्यात जास्त परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. चीन-तैवान दरम्यानचा वाढता तणाव बघता भारतावर सगळ्यात जास्त परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधी रशिया-युक्रेनच्या युद्धाचे परिणाम भोगावे लागले आणि आता चीन-तैवानमध्ये संघर्ष झडण्याची शक्यता व्यक्त होत असल्यानं संपूर्ण जगावरच भीतीचं सावट आहे. असं झालं आणि चीनबरोबरचा तणाव वाढला तर तैवानच्या चिप निर्मात्यांना ‘नॉन ऑपरेट’ केलं जाईल. ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन’द्वारा जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सध्याच्या परिस्थितीत ही घसरण सातत्यानं पाहायला मिळत आहे. आता पेलॉसी यांच्या या दौऱ्यामुळे संतापलेला चीन तैवानची समस्या कशी हाताळतो हे पाहणं आपल्यासाठीही महत्त्वाचं आहे.

चीनने तैवानवर हल्ला केला तर सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत अन्य देशांचं होईल तितकंच चीनचंही नुकसान होणार आहे. तैवानमधून सेमीकंडक्टर्सची कमतरता निर्माण झाली तर संपूर्ण उद्योग क्षेत्रच ठप्प होऊ शकतं. पल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या नामांकित टेक कंपन्याही सेमीकंडक्टर्ससाठी तैवानवरच अवलंबून आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभरात गव्हासारख्या धान्य आणि अन्य वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला होता. आता तैवान आणि चीनमधला संघर्ष वाढला तर तांत्रिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. वाहन आणि इलेक्ट्रानिक्स उद्योग अगोदरच अडचणीत असताना या नव्या संकटाची धास्ती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -