संकटांचे वादळ शमू दे, अर्नाळ्यातील कोळी बांधवांचे दर्याराजाला साकडे

विरार (प्रतिनिधी) : ‘नैसर्गिक आपत्ती, मासेमारीला न मिळालेला हमीभाव, डिझेल परतावा आणि कर्ज परतपेढीची संकटे शमू दे; आणि कोळी बांधवांच्या जाळ्यात भरपूर मासळी मिळू दे!` असे साकडे अर्नाळ्यातील कोळी बांधवांनी दर्याराजाला घातले. नारळी पौर्णिमेनिमित्त येथील कोळी बूंध-भगिनींनी पारंपरिक पद्धतीने दर्याराजाची विधिवत पूजा केली. या प्रसंगी अर्नाळा आणि परिसरातील शेकडो रहिवाशी अर्नाळा किनारी जमले होते.


अर्नाळापासून वसई पाचूबंदर या १६ किमीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोळी बांधवांची वस्ती आहे. येथील शेकडो बांधव आजही समुद्रातील मासेमारीवर उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे येथील नारळी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पारंपरिक पेहरावात येथील कोळी बांधव समुद्रकिनारी एकत्रित येऊन होडी आणि दर्याची पूजा करतात. त्यानंतर होणारा नृत्य, संगीत सोहळा पाहण्याकरता दूरदूरहून लोक येत असतात.


मागील दोन वर्षे कोरोनामुळे अन्य उत्सवांसह नारळी पौर्णिमेवरही निर्बंध आले होते. मात्र या वेळी या सणातील उत्साह आणि आनंद द्विगुणित झालेला पाहायला मिळाला. मात्र कोरोनामुळे कोळी बांधवांवर आलेले आर्थिक अरिष्ट आजही टळलेले नाही. बँकांचे कर्ज, डिझेल परतावा, मासळीला न मिळालेला हमीभाव, पर्सिसन मासेमारी इत्यादी संकटांशी येथील कोळी बांधव आजही झुंजत आहे. हे कमी की काय म्हणून नैसर्गिक संकटांनाही त्याला तोंड द्यावे लागत आहे. नुकत्याच आलेल्या वादळामुळे समुद्रात मासेमारीला गेलेल्या येथील शेकडो कोळी बांधवांना रिकामी हातीच परतावे लागले आहे. कोविड काळानंतर पहिल्यांदाच १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारी हंगामाकरता कोळी बांधव समुद्रात गेले होते. त्यामुळे किमान या वर्षी तरी भरपूर मासळी मिळेल, अशी अपेक्षा कोळी बांधवांना होती. या आशेवर पाणी फेरले गेले आहे.


या सगळ्या संकटांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नारळी पौर्णिमेचा सण साजरा झाला. मात्र या येथील कोळी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर या दु:खाचा लवलेशही नव्हता. किंबहुना दर्याराजाला हे संकट दूर कर, असे साकडे घालून या सणातील आनंद द्विगुणित करण्यासह सर्वांच्या भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.


दरम्यान, अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ फोडी स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेत सहभागी होण्याकरता वसई आणि परिसरातून लोक आले होते. अर्नाळा, पाचूबंदर, नायगाव कोळीवाडा आणि खोचिवडे परिसरात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. या निमित्ताने महिनोनमहिने मासेमारीकरता समुद्रात असलेल्या कोळी बांधवांना परिवारात, कुटुंबांत एकत्र येण्याचा आनंद मिळत असतो.

Comments
Add Comment

रिचा पाटीलच्या आत्महत्येची सखोल चौकशी करा

भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट विरार : विरार पश्चिम येथील विवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १९

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव घसरले, कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले

वाढवण बंदराविरोधातील स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

 वाढवण बंदराच्या नियोजित विकासाला स्थगिती देण्याची स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने

वसई-विरारमध्ये ऑटोरिक्षा-टॅक्सींसाठी मीटर बंधनकारक

१५ नोव्हेंबरनंतर मीटरशिवाय भाडे घेतल्यास थेट कारवाई. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; ठाणे, कल्याणसाठी

गारगाई पाणी प्रकल्पामुळे सहा गावे बाधित, तब्बल ४०० हेक्टर जमिनींचे केले जाणार सीमांकन

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदी

विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा खंडित; लोकल थांबल्याने प्रवाशांची गैरसोय

सफाळे : पश्चिम रेल्वेच्या विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने रेल्वेसेवा