Wednesday, July 9, 2025

साईनाथांचा संदेश

साईनाथांचा संदेश

विलास खानोलकर


साईनाथांनी एका वेळी भक्तांना ऐकविलेल्या निजबोधाने अध्यात्म मार्गातला प्रवासी खऱ्या अर्थाने सावध झाला पाहिजे. ते म्हणाले,' लहानपणी मी कलाकुसरीच्या कामाला राहिलो. त्यात मनोभावे काम करत असल्यामुळे माझा मालक माझ्यावर बेहद्द खूश होऊन सवलतींचा वर्षाव करू लागला. मला खूश ठेवू लागला. नवे कपडेही आणून दिले. माझ्या कामगिरीवर खूश झालेला मालक इतरांहून अधिक देत असेल, तर जगाच्या मालकासमोर आपण चांगले राहिलो, तर तो आपल्याला किती देईल! त्यामुळे परमेश्वराचा अधिकार किती आहे तो लक्षात घ्या. देव जितके तुम्हाला देऊ शकतो याची सर कोण्याही मानवाच्या दातृत्वाला नाही. त्याला मर्यादाच राहणार. म्हणून अमर्याद परमेश्वराला शरण जा. माझ्या ते जेव्हा लक्षात आले तेव्हा एका परमेश्वरावाचून मी कोणावरही विसंबलो नाही. माझ्या या वचनाचा अर्थ कुणालाही कळत नाही. कारण कुणी समजून घ्यायला तयार नाही. त्यांना व्यवहारी जगाचे महत्त्व वाटत राहते. माझ्याकडे जो येतो तो प्रत्येक जण भिक्षाच मागायला येतो. खरं तर परमेश्वराजवळ केवढे ज्ञानभांडार भरलेले आहे. दोन्ही हातांनी उपसत बसला तरी अनेक जन्मात घेता येणार नाही. इतके अपरंपार ज्ञान विश्वातच जागोजागी भरले आहे. पण कोणाला त्याकडे बघायला वेळ नाही. त्या भगवंताची ती जादूई शक्ती अफाट सामर्थ्य, अद्वितीय कौशल्य तुम्हाला दाखूवन देणे हेच माझे खरे कौशल्य आहे'


'पाहा बरे! मी कोण आहे? वरकरणी जो दिसतो आहे तो देह नश्वर आहे. देह मातीत मिसळून जाईल. पंचप्राण वायूने मिळून जातील. पण गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. मी आज येथे आहे. उद्या कुठे दुसरीकडे निघून जाईन. मायेच्या शृंखला सर्वांनाच आहेत. त्या मलाही बंधनकारक आहेत. या मानवी जन्मात तुम्ही सातत्याने सत्कृत्य करत राहा. मी आध्यातिक भांडार तुमच्यासमोर खुले करण्यासाठी बसलो आहे. ते मिळविण्याचा प्रयत्न करा. 'अल्लाह' तुमचे भले करेल.

Comments
Add Comment