अशोक राणे
आपल्या देशात क्रांती दिन ९ ते १५ ऑगस्ट हा सप्ताह देशभक्ती पर्व म्हणून साजरा केला जातो. शासकीय तथा खासगी पातळीवर अनेक संघटना विशेष कार्यक्रम राबवत असतात. शाळा, कॉलेजमध्ये देशभक्तीचे मेळावे सुद्धा आयोजित केले जातात. देशभक्ती पर्व म्हणून सप्ताह साजरा केला जातो. या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून घर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. समाजसुद्धा घर घर तिरंगा अभियानमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे. पण देशात देशभक्तीचे वातावरण असताना दिल्लीमधील राहुल गांधींपासून गल्लीतील काही संघ विरोधक, समाज विरोधी मंडळी राजकीय चष्म्यामधून घर घर तिरंगाकडे पाहत राजकारण करीत आहेत व त्यांच्या जळफळाटामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या विविध संघटनेच्या नावाने शिमगा साजरा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संघाचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता, संघ कार्यालयावर तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण झाले नाही, असे निरर्थक प्रश्न उपस्थित करून कांगावा करीत आहेत. तसेच काँग्रेस संस्कृतीच्या छत्रछायेत मोठे झालेले पत्रकार, साहित्यिक, सेक्युलर मंडळी संघाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नाकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. दर वर्षी ९ ऑगस्ट क्रांतिदिन ते १५ ऑगस्ट या काळात ही मंडळी पोपटपंची करीत असतात. पण समाजाने बोलघेवड्या भाट मंडळींची साधी दखल सुद्धा घेतलेली नाही. काँग्रेस म्हणजे स्वतंत्रता आंदोलन होते. आता नाही हिंदुस्तानला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याची काँग्रेस अर्थात राष्ट्रीय महासभेच्या नेतृत्वात वेगवेगळे अभियान चळवळी झालेल्या आहेत. देशातील सर्व संघटना या चळवळीत सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्राचा विचार केल्यास गुरुदेव सेवा मंडळ, सर्वोदयी, समाजवादी, संघाचे कार्यकर्ते सहभागी होते झाले होते. सर्व अभियान, आंदोलनाचे, चळवळी काँग्रेसच्या नेतृत्वात झालेल्या आहेत. काँग्रेस त्यावेळेस राजकीय पक्ष नव्हता. ती सर्व समाज व संघटनांची प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीयसभा म्हणून कार्यरत होती व काँग्रेस म्हणजे स्वतंत्रता आंदोलन होते. देशाला स्वतंत्र करण्याचे सर्वाचे ध्येय समान होते. पण या स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळात काँग्रेस राजकीय पक्षाकडून स्वतंत्रता लढ्याचे सर्व श्रेय आपल्या पदरी पाडून घेऊन इतरांचे योगदान नाकारण्याचा सतत प्रयत्न केला आहे. सशस्त्र क्रांतिकारकांचे तथा देशासाठी फासावर गेलेल्या योद्ध्यांचे बलिदानसुद्धा विस्मृतीत गेले.️
स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या तीन चळवळी – भारतीय स्वातंत्र्यलढा १८५७ पासून सुरू झालेला असून स्वतंत्रता लढा वेगवेगळ्या मोर्चावर वेगवेगळ्या भागात लढला गेला आहे. लढ्यातील योद्धेही वेगवेगळे होते. सशस्त्र क्रांतिकारी गटसुद्धा कार्यरत होता. काँग्रेसच्या स्थापनेनंतर देशात काँग्रेसचे वलय निर्माण होऊन जनसमर्थन मिळाले होते. १९२० मध्ये लो. टिळकांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेतृत्व म. गांधींकडे येऊन तीन चळवळी झाल्या. असहकार आंदोलन ज्यामध्ये खिलाफत चळवळ, सविनय कायदेभंग, मिठाचा सत्याग्रह व चले जाव चळवळ ही तीन प्रामुख्याने आंदोलने झालेली आहेत. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार कट्टर देशभक्त होते. त्यांनी काँग्रेसच्या असहकार व जंगल सत्यग्रहाच्या आंदोलनात भाग घेतला होता. सन १९२१ मध्ये असहकार आंदोलन झाले. ज्यामध्ये डॉ. हेडगेवार यांनी असहकार आंदोलनात भाग घेतल्यामुळे ब्रिटिशांनी राजद्रोहाचा खटला भरून १९ ऑगस्ट १९२१ रोजी त्यांना एक वर्षाची शिक्षा दिली होती. शिक्षा संपल्यानंतर नागपुरात १२ जुलै १९२२ रोजी डॉ. हेडगेवार यांचा सन्मान करण्यात आला. त्या कार्यक्रमाला प. मोतीलाल नेहरू उपस्थित होते. सन १९३० मध्ये देशात सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. म. गांधींच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला त्यावेळेस विदर्भात मिठागरे नसल्यामुळे जंगल सत्याग्रह झाला. डॉ. हेडगेवार यांनी आपले सरसंघचालक दायित्व
डॉ. परांजपे यांच्याकडे सोपवून सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेऊन यवतमाळ-पुसद भागातील लोहारा येथे २१ जुलै १९३० रोजी जंगल सत्याग्रहात आपल्या हजारो सहकाऱ्यांसोबत सत्याग्रह केला. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्याविरुद्ध पुन्हा राजद्रोहाचा खटला भरून त्यांना नऊ महिन्यांची शिक्षा ठोठावून अकोला येथील तुरुंगात डांबले होते. अशा प्रकारे संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांची काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनातील महत्त्वाची भूमिका, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळीअंतर्गत जंगल सत्याग्रहामध्ये भोगलेला तुरुंगवास लक्षात घेता संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग अधोरेखित होतो.
️चलेजाव चळवळ व संघ कार्यकर्त्यांचे योगदान हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीत १९४२ ची चलेजाव चळवळ महत्त्वाची मानली जाते. यामध्ये संपूर्ण हिंदुस्तान एकसोबत लढलेला आहे. देशातील सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या. ८ ऑगस्टला मुंबईतील गोवालिया टँक येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले आणि म. गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध चले जावची घोषणा केली. त्याचे पडसाद देशात आंदोलनाने उमटले. सारा देश ब्रिटिशांविरुद्ध उभा ठाकला. त्यावेळेस चिमूर, जि. चंद्रपूरचे आंदोलन देशात फार गाजले. संघाचे स्वयंसेवक काँग्रेस कार्यकर्ते व गुरुदेव सेवा मंडळ यांनी हे आंदोलन उभे केले होते. आंदोलन एवढे प्रभावी होते, त्याची दखल बर्लिन नभोवाणीने घेतली. काँग्रेसचे उद्धवराव कोरेकर, संघ शाखेचे मुख्य शिक्षक माधवराव कठाळे यांच्या नेतृत्वात चिमूरचा स्वातंत्र संग्राम लढला गेला. विदर्भात ब्रिटिशांच्या बंदुकीची पहिली गोळी आपल्या छातीवर झेलणारा हुतात्मा बालाजी रायपूरकर हा संघाचा कार्यकर्ता होता. याच आंदोलनात ब्रिटिश अधिकाऱ्यांचा वध सुद्धा झालेला आहे. ब्रिटिशांनी चिडून जवळपास १२५ निपराध नागरिकांना तुरुंगात डांबले. ज्यामध्ये असंख्य संघाचे कार्यकर्ते होते. चिमूरच्या स्वातंत्र्य रणसंग्रामात संघाच्या स्वयंसेवकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. तसेच देशात संघाचे प्रचारक वसंतराव ओक, जयदेव पाठक, दत्तात्रेय कस्तुरे, वर्धा येथे आप्पाजी जोशी, आष्टीत डॉक्टर अण्णासाहेब देशपांडे यांनी, तर हिन्दी पट्ट्यामध्ये प्रो. राजेंद्र सिंह, प. दीनदयाल उपाध्याय यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. दिल्लीचे संघचालक लाला हंसराज यांनी भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांना मदत केली आहे. ज्यामध्ये अरुणा असफ अली यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. हिंदुस्तान स्वतंत्र झाल्यावर गोवा, दादरा नगर हवेली हे पारतंत्र्यात होते तेव्हा पोर्तुगीजांसोबत संघर्ष करून गोवामुक्ती संग्राममध्ये, हैदराबाद रझाकरांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी संघ स्वयंसेवक आघाडीवर होते. दादरा नगर हवेली मुक्ती संग्राममध्ये सुद्धा संघाचे कार्यकर्ते सहभागी होते. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीतील संघ स्वयंसेवकांचे योगदान असून ते मान्यच करावे लागेल.
️ संघाचे योगदान नाकारणे कितपत योग्य
देशातील स्वातंत्र्य चळवळीच्या काळात काँग्रेस मोठी संघटना होती. राजकीय पक्ष नव्हता, तर ते एक स्वतंत्र आंदोलन होते. आता परिस्थिती बदलली असून काँग्रेस आता आंदोलन न राहता सत्तापिपासू संस्था झालेली आहे. संघ स्थापनेपासूनच सामाजिक, संस्कृतिक संघटना होती. संघाने कधी कोणती निवडणूक लढली नाही व काँग्रेसने कोणतीच निवडणूक सोडली नाही. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस नेतृत्वात सर्व संघटनांचा सहभाग होता. पं. मदनमोहन मालवीय हे हिंदू महासभेचे पदाधिकारी होते. सोबतच काँग्रेस अध्यक्ष सुद्धा होते. त्यामुळे काँग्रेस व इतर संघटनांत समन्वय असल्याचे अधोरेखित. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसने स्वातंत्र्यलढ्याचे श्रेय घेऊन इतरांचे योगदान नाकारले व सत्तेचा मनमुराद आनंद घेतला आहे व पुढे सत्तेच्या जोरावर व प्रचारमाध्यमे आपल्याजवळ असल्यामुळे इतरांवर अन्याय करून स्वातंत्र्यलढ्याचे संपूर्ण श्रेय आपल्या पदरात घेतले. त्यामुळेच पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे शेणकिडे आपल्या घाणीच्या साम्राज्यात वळवळ करतात, त्याचप्रमाणे संघ विरोधक ९ आॅगस्ट क्रांती दिन ते १५ ऑगस्ट काळात संघविरोधी वक्तव्ये करून संघाचा स्वातंत्र्य चळवळीसोबत संबंध नाही, अशी मल्लिनाथी करून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. पण समाज आता सजग झाला असून खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही, एवढे मात्र निश्चित.