देशातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना अजून जवळपास पावणेदोन वर्षांचा कालावधी बाकी असला तरी सत्ताधारी भाजपने मात्र एप्रिल २०२४ मध्ये होणाऱ्या या निवडणुकांची गेल्या काही महिन्यांपासूनच जय्यत तयारी सुरू केलेली आहे. लोकसभेच्या ४८ जागा महाराष्ट्रात आहेत. दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील भाजपच्या नेतेमंडळींकडून शतप्रतिशत भाजपचा नारा पुन्हा जोरदारपणे आळवीला जाऊ लागला आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागा जिंकण्याचा दावा काही नेत्यांकडून, तर काही नेत्यांकडून ४५ जागा जिंकण्याचा दावा जाहीरपणे केला जाऊ लागला आहे. अर्थात शतप्रतिशत घोषणा ही भाजपच्या राजकीय रणनीतीचा भाग असून कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्साह निर्माण करण्याचीही ती खेळी असू शकते. पण भाजप जे बोलते, ते करून दाखवते. ते देशाच्या राजकारणात विविध राज्यातील राजकीय घडामोडीदरम्यान पाहावयास मिळालेले आहे. महाराष्ट्रात जून २०२२ मध्ये सत्तांतर होऊन भाजप सत्तेत येणार असल्याचा दावा काही महिन्यापूर्वीच भाजपच्या मातब्बर नेतेमंडळींकडून करण्यात येत होता. एकनाथ शिंदे प्रकरणातून भाजपने ते खरेही करून दाखविले आहे. २०१४ साली लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही घोषणा करण्यात आली होती. आज भारत काँग्रेसमुक्त झाला नसला तरी आठ वर्षांच्या कालावधीत काँग्रेस पूर्णपणे खिळखिळी झालेली असून अस्तिवासाठी संघर्ष करताना पाहावयास मिळालेली आहे. केंद्रात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला लोकसभेत साधे विरोधी पक्षनेते पद मिळविण्याइतकेही संख्याबळ गाठता आलेले नाही, ही काँग्रेसची शोकांतिका आहे. इतकेच नाही, तर त्यांचा पोलादी समजला जाणारा अमेठीसारखा भक्कम बालेकिल्लाही २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसकडून हिसकावून घेतला. भाजपची रणरागिणी असणाऱ्या स्मृती इराणींकडून काँग्रेसच्या राहुल गांधींचा दणदणीत पराभव झाला. नशीब केरळमधून त्यांनी आणखी एका जागेवरून निवडणूक लढविल्याने त्यांना लोकसभेत जाता आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप एका वेगळ्याच रंगांत, जोशात दिसत आहे. तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून ते सर्वोच्च पातळीवर कार्यरत असणाऱ्या नेतेमंडळींमध्ये कमालीचा आक्रमकपणा व एक दृढ विश्वास पाहावयास मिळत आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने एक वेगळीच कात टाकली आहे. अडवाणी-वाजपेयींच्या काळातील भाजप आणि नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या काळातील भाजप यात नक्कीच जमीन आस्मानचा फरक दिसत आहे. अडवाणी-वाजपेयींच्या काळातील भाजपला सत्ता मिळविण्यासाठी, जनाधार वळविण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, तर नरेंद्र मोदी-अमित शहांच्या काळातील भाजपला केंद्रातील सत्ता निश्चित असताना शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती आखावी लागत आहे. मोदी-शहांच्या काळातील ग्रामपंचायतीपासून स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा ते लोकसभा या प्रवाहात भाजपचे कमळ उमललेले पाहावयास मिळत आहे.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आयेंगे’, ‘अब की बार-मोदी सरकार’ या दोनच घोषणांनी काँग्रेसचे जनसामान्यांमध्ये पानिपत झाले. देशाची निर्विवादपणे सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसला आज रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत आहे. ज्या ज्या ठिकाणी भाजपचे अस्तित्वही पाहावयास मिळत नव्हते, आज त्या त्या ठिकाणी भाजपचे प्रभुत्व पाहावयास मिळत आहे. पश्चिम बंगालसारख्या ठिकाणी भाजपने मारलेली मुसंडी राजकीय समीक्षकांनाही संभ्रमात टाकणारी आाहे. आज राजस्थानचा अपवाद वगळता कोठेही काँग्रेसची सत्ता नाही. मोदी पर्वातील आठ वर्षांच्या कालावधीत केवळ काँग्रेसमधीलच नाही तर अनेक राजकीय पक्षसंघटनांमधील मातब्बर नेतेमंडळी भाजपमय झाली आहेत. आजही ओघ सुरूच आहे. हेच चित्र कायम राहिल्यास विरोधी पक्षांचे या देशातील अस्तित्वच संशोधनाचा विषय बनण्याची भीती आहे. अर्थात कोणाही एका पक्षाच्या हाती सर्वोच्च सुकाणू असणे, विरोधी पक्ष हतबल होणे हे लोकशाहीसाठी सुखावह चित्र नाही; परंतु नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे ते शक्य झाले आहे आणि भाजपने ते करून दाखविले आहे, आजही लोकसभा निवडणुका लागल्या आणि ५२५ जागांवर नरेंद्र मोदी उभे राहिले, तर किमान ४०० जागांवर ते निवडून येतील, असे खुद्द विरोधकांकडूनच सांगण्यात येत आहे. राज्याराज्यांत भाजप मुसंडी मारू लागली आहे.
अनेक पक्षांचे आमदार-खासदार त्यांचा पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल होऊ लागले आहेत. दक्षिण भारतातील राज्यांवर भाजपची नजर आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तेलंगणामध्ये ठेवली होती. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील आले होते. आज निवडणुका झाल्यास केसीआर याचे नुकसान होईल, असे चित्र आहे. केसीआर यांना २०१९ मध्ये ४२ टक्के मत मिळाली होती. आता ती ३४ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. भाजपला २०१९ मध्ये २० टक्के मते मिळाली होती, ती आता ३९ टक्क्यांवर जातील. गुजरात काँग्रेसचे नेतेही भाजपमध्ये आल्याने गुजरातेत आता भाजपला विरोधकच राहिलेला नाही. शिंदे गटाच्या निर्मितीमुळे शिवसेना खिळखिळी झालेली असल्याने भाजपच्या लोकसभेच्या महाराष्ट्रात जागा वाढतील. लोकसभेच्या ५१२ जागांसाठीचा ओपिनियन पोल काही दिवसांपूर्वीच आला आहे. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर भाजपला पुन्हा एकदा सत्ता मिळेल असा अंदाज ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. भाजपसोबत जर एनडीएच्या जागा जोडल्या, तर लोकसभेत जागांची संख्या आणखी वाढेल. नुकत्याच झालेल्या ताज्या ओपिनियन पोलनुसार भाजपला ३२६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधील घटक पक्षांच्या जागा जोडल्यास ही संख्या ३५०च्या पुढे जाते. २०१४ साली भाजपला २९२, तर २०१९ साली ३०३ जागा मिळाल्या होत्या. मात्र आज निवडणुका झाल्यास भाजप या आधीचे सर्व विक्रम मागे टाकू शकते. उत्तर भारतातील अनेक राज्यांत भाजपची जादू कायम असल्याचे चित्र दिसते. अनेक राज्यात २०१९ मध्ये भाजपला चांगली कामगिरी करता आली होती. त्याचबरोबर दक्षिणेतील तेलंगणा आणि कर्नाटकात भाजपला यावेळी अधिक जागा मिळतील, असे पोलमध्ये म्हटले आहे. याशिवाय संपूर्ण भारतात भाजपला फायदा मिळेल, असे आजचे भाजपचे चित्र आहे. त्यामुळे न येणाऱ्या लोकसभा जागांवर भाजपने आतापासूनच मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपची तयारी, रणनीती पाहता देशामध्ये लगेच शक्य नसले तरी अनेक राज्यांमध्ये शतप्रतिशत भाजपचा प्रयोग यशस्वी झाल्याचे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पाहावयास मिळेल.