शिबानी जोशी
अमरावती जिल्ह्यातील संघ कार्यकर्ते विविध सामाजिक काम करत होते. सामाजिक कामं करायची असतील तर एखादी संस्था उभी करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन या कार्यकर्त्यांनी २००३ साली प्रज्ञा प्रबोधिनी या नावाने एक न्यास सुरू केला. सुरुवातीला वंचित लोकांसाठी त्यांची गरज लक्षात घेऊन काहीतरी काम करू या असं ठरवून ही संस्था स्थापन झाली. त्याचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शिक्षणाची गरज लक्षात आल्यामुळे सहा वस्त्यांमध्ये प्रथम सरस्वती शिशू मंदिर सुरू करण्यात आले. ५-६ वर्षे तेजस आणि श्रेयस अशा दोन इयत्तांमध्ये शिशुवर्ग चालवले; परंतु त्याच दरम्यान शासनाच्या अंगणवाड्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या. त्या ठिकाणी विनामूल्य आहार आणि शिक्षण मिळू लागल्यामुळे या वर्गात येणाऱ्या मुलांची संख्या कमी होऊ लागली.
त्याच सुमारास कार्यकर्त्यांना २००४ साली अमरावती जिल्ह्यातील पारधी समाज नजरेस पडला. त्यानुसार एका पारधी पाड्यात जाणं सुरू झालं. त्यांचं जीवन, राहणी, त्यांची भाषा, चालीरीती, आहार, संस्कार यांची पाहणी, सर्वेक्षण करण्यात बरात काळ गेला. सुरुवातीला एका वस्तीमध्ये संस्कार शिबीर, वर्ग, प्रौढ साक्षरता, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला भारत माता पूजन, राखी पौर्णिमा, दिवाळी मीलन, हनुमान जयंती असे कार्यक्रम सुरू केले. हे काम करताना लक्षात आलं की, त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूळ गरजा भागल्या नाहीत, तर या कामाला काही अर्थ नाही म्हणून एखाद्याला भाजीपाला स्टॉल लावून दिला, एखाद्याला छोटा स्टॉल काढून दिला. प्रथम उपचार किटस दिले. असं छोटं-मोठं काम हाती घेतलं. त्यानंतर आणखी काही वस्त्यांचं सर्वेक्षण केलं. त्यांच्यातील काहीजण लहान-मोठे शेती करायचे; परंतु सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकत असत. ते लक्षात आल्यावर नानाजी देशमुख यांच्या नावाने एक योजना सुरू केली. या योजनेमार्फत त्यांना बी बियाणं, कीटकनाशक विनामूल्य द्यायला सुरुवात केली.
पारधी समाजामध्ये आरोग्यविषयक अनास्था होती, अंधश्रद्धेचा विळखा होता. त्यामुळे आरोग्य रक्षक योजना आणखी वाढवण्यात आली. प्रथमोपचार तिथेच देणं, गंभीर आजाऱ्याला अमरावती इथल्या रुग्णालयात नेऊन विनामूल्य उपचार देणे, गर्भवती महिलांना रुग्णालयात येऊन बाळंतपण करावं यासाठी त्यांचं कौन्सिलिंग करणे अशी कामं संस्थेने सुरू केली. २००६ साली परमपूज्य माधव गोळवलकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त “माधव आरोग्य रक्षक योजना” पारध्यांसाठी सुरू करण्यात आली. विनामूल्य औषधांचे वाटप, आरोग्य शिबीर, प्रथमोपचार पेटी वाटप, आरोग्य रक्षकांना प्रशिक्षण असे उपक्रम या योजनेद्वारे अथकपणे सुरू आहेत. महिलाही आर्थिक सक्षम व्हाव्यात यासाठी काही ठिकाणी महिलांचे बचत गट सुरू केले. त्यांना संस्था स्वतः दोन टक्के व्याज देऊन खर्च उपलब्ध करून देते. यानंतर आणखी एक गोष्ट कार्यकर्त्यांच्या लक्षात आली ती म्हणजे पाड्या वस्त्यांमध्ये तितकसं दर्जेदार शिक्षण मिळत नव्हतं. शिवाय अनेक मुलं शाळा सोडून पळून जायची. अशा मुलांना अमरावती शहरांमध्ये निवासी व्यवस्था करून शिक्षणाची सोय करावी, अशा इराद्याने सुरुवातीला एका भाड्याच्या खोलीमध्ये विवेकानंद छात्रावास सुरू करण्यात आलं. सुरुवातीला केवळ ९ पारधी मुलं या छत्रावासात निवासाला आली होती, त्यातीलही दोन मुलं पळून गेली होती. पण संस्थेने केलेली सोय पाहून मुलांची संख्या हळूहळू वाढू लागली. आता जवळजवळ ३३ मुलं या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. त्यांना अमरावती शहरातील चांगल्या शाळेत घालणं, निवास भोजनाची, पुस्तकांची संपूर्ण व्यवस्था प्रबोधिनी करत असते. भाड्याच्या खोलीत सुरू झालेले छत्रावास स्वतःच्या वास्तूत तीन वर्षांपूर्वी स्थिरावलं आहे. आतापर्यंत या छात्रावासातून अनेक मुलं दहावी, बारावीपर्यंत शिकली आहेत. एक मुलगा तर पदव्युत्तर पदवीपर्यंत शिकला आहे. या मुलांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी केली जाते तसंच छात्राबासात गणपती उत्सव, दिवाळी उत्सव, संक्रांत हळदीकुंकू साजरे केले जातात. शैक्षणिक सहलींचे आयोजन केलं जाते.
मुलांचे अक्षर सुधारावे म्हणून “अक्षर सुधार कार्यशाळा” घेतली जाते. त्याशिवाय गणेश मूर्ती घडवणे, आकाश कंदील बनवणे, वारली पेंटिंग प्रशिक्षण याच्या कार्यशाळा घेऊन मुलांचा सांस्कृतिक विकास व्हावा याकडेही लक्ष दिलं जाते. योगा प्रशिक्षण, विविध क्रीडा स्पर्धा मुलांसाठी आयोजित केल्या जातात. पारधी समाजासाठी अशा प्रकारे सर्वांगीण विकासाची काम केल्यामुळे आता त्या समाजामध्ये संस्थेबद्दल विश्वासही निर्माण झाला आहे. विविध पारधी वस्त्यात कार्यकर्त्यांचे पारधी कुटुंबाशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या विविध अडचणीत हे सर्वजण सहभागी होतात. यामुळे पाड्यावर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात संस्थेला लक्षणीय यश मिळत आहे. हे काम खूप कठीण आहे, पण “हा समाज आपला” ही भावना उरी ठेवून कार्यकर्ते जिद्दीने काम करत आहेत. संस्थेच्या अविरत प्रयत्नाने समाजाचाही या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. यांचा पूर्वीचा इतिहास पाहता जुगारी, लुटारू, चोरी, शिकार करणारे, अस्वच्छ ही बिरूदे यांच्यावर लावण्यात आली होती. आता जवळपास हे सर्व बंद झाले आहे. भरपूर परिवर्तन झाले आहे. हिंदू समाजाचा अभिन्न घटक, धर्मावर प्रगाढ श्रद्धा असणारा हा समाज आहे. आपण बदलावं असं आता त्यांच्या नवीन पिढीला वाटू लागलं आहे. यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. एक पारधी दाम्पत्य विवेकानंद छात्रावासात सहपर्यवेक्षक म्हणून अल्प मानधनावर समर्पण भावनेने काम करत आहे. ही मुले संस्कृत शिकत आहेत, रामरक्षा म्हणत आहेत. अनेकांनी संघाचे प्राथमिक संघशिक्षा वर्ग केलेत. तिनं जणांनी प्रथम शिक्षा वर्ग केला आहे.
आज संस्थेमध्ये १५ जणांची कार्यकारिणी अतिशय निरलस, निष्ठेन कार्य करत आहे. २३ वस्ती प्रमुख, २० आरोग्य रक्षक सेवा देत आहेत. पारधी समाजासाठी इतकं सर्वांगीण विकास कार्य केल्यानंतर त्याची दखल घेतली जाणे क्रमप्राप्तच आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा शाहू, फुले, आंबेडकर समाजभूषण पुरस्कार संस्थेला प्राप्त झाला आहे. यापुढेही अधिकाधिक विकास करण्यासाठी चालू योजनांचा विस्तार तसेच नवीन योजना राबवण्याची संस्थेची इच्छा आहे. महिला बचत गटांचे, आरोग्य रक्षक योजनेचे, आरोग्य निदान शिबिरांचे विस्तारीकरण, पारधी विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देणे, सेंद्रिय शेती करण्यासाठी पारधी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे यासाठी उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस आहे, असं संस्थेच्या स्थापनेपासून अथकपणे काम करणारे आणि सध्याचे अध्यक्ष अविनाश देशपांडे यांनी सांगितले. “सेवा, शिक्षण, संस्कार” हे ब्रीदवाक्य संस्था प्रत्यक्षात आचरणात आणत आहे. कोणत्याही सामाजिक संस्थेला विस्तारण्यासाठी १९ वर्षांचा कालावधी हा खरं तर खूपच कमी म्हणायला हवा तरीही २००३ साली स्थापन झालेल्या या संस्थेने कार्यकर्त्यांच्या उत्साही प्रतिसादामुळे पारधी समाजाच्या विकासासाठी विविध क्षेत्रात चांगलीच घोडदौड सुरू केली आहे, असं म्हणायला हरकत नाही.