सतीश पाटणकर
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज हजारांच्या घरात कातळशिल्प आहेत. देश विदेशातल्या पर्यटकांना खेचून आणण्याची ताकद आहे. गोवा शासनाचे सेवानिवृत्त पुरातत्त्व संचालक पी. पी. शिरोडकर यांनी गोव्यातील उसगाळीमळ येथील कातळशिल्पे प्रकाशात आणल्यावर त्या सरकारने ती लगेचच संरक्षित जाहीर केली. पर्यटन स्थळांमध्ये त्या जागेचा समावेश करून पर्यटकांना तेथे नेले जाते. कोकणात आदिम संस्कृतीच्या खुणा सांगणारी अनेक कातळशिल्पंही आहेत. हजारो देशी-विदेशी पर्यटक आणण्याची क्षमता असणाऱ्या या काताळशिल्पांकडे पर्यटन महामंडळ, लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नयनरम्य समुद्रकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा आणि कोकणी मेवा यापलीकडे कोकणात आदिम संस्कृतीच्या खुणा सांगणारी अनेक कातळशिल्पंही आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ही देखणी कातळशिल्पे आवर्जून पाहावी अशीच आहेत. आपली भटकंती डोळस असेल तर नक्कीच आपलं पर्यटन समृद्ध होईल. कोकण म्हणजे नुसते समुद्रावर भटकणे, आंबे, फणस, काजू खाणे आणि माशावर ताव मारणे असं नाहीये. किल्ले, जुनी मंदिरे यांच्यासोबतच काही गूढ,चमत्कारिक आणि आश्चर्यकारक निसर्गनवल देखील या प्रदेशात विखुरलेले आहे. गरम पाण्याचे झरे, बारमाही धबधबे याचसोबत सड्यावर लांबच लांब परिसरात पसरलेल्या कातळावर खोदलेली कातळशिल्पे. इंग्रजीमध्ये याला पेट्रोग्लीथ असा शब्द आहे. आपल्या भटकंतीमध्ये ही कातळशिल्पे वेळ काढून पहिली पाहिजेत. पर्यटकांबरोबरच पुरातत्त्व आणि इतिहासाच्या अभ्यासकांना सुद्धा कोकणाची भुरळ पडली. ही अभ्यासक मंडळी जसजसे शोध घेऊ लागली तसतसे एकेक निसर्गनवल समोर येऊ लागले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ही कातळशिल्पे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत.
पुरातत्वशास्त्रासाठी कोकण सध्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कोकण त्यांना अनेक जुन्या प्रश्नांच्या उत्तरांसोबत काळाच्या उदरातल्या अनेक नव्या पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी मदत करणार आहे. त्याची कारण आहेत, कातळशिल्पं. किनारपट्टीलगत गेल्या काही वर्षांमध्ये सापडलेली कातळशिल्पं मानवी संस्कृतीच्या प्रवासातले नवे टप्पे समोर घेऊन येणार आहे. कोकणतल्या रत्नागिरी-राजापूर पट्ट्यात अचानक जमिनीतून वर यावीत तशी ही कातळशिल्पं गेल्या काही वर्षांत समोर आली आहेत. याअगोदर त्यांच्याकडे कोणा पुरातत्त्वशास्त्रज्ञाचं लक्ष का गेलं नाही, हे एक कोडंच आहे. पण, काही स्थानिक देवदेवतांचं स्वरूप घेऊन, तर बहुतांश सड्यांवरच्या मातीखाली दबली गेली होती. त्यांची संख्या किती होती याचा कोणालाच अंदाज नव्हता. पण, गेल्या चार-पाच वर्षांत शोधकार्य सुरू झाल्यापासून हजारांच्या घरात त्यांचा आकडा पोहोचला आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञांची नजर उंचावली गेली. कर्नाटकातील बदामी येथे ” रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया “या संस्थेची सतरावी राष्ट्रीय काँग्रेस संपन्न झाली. राष्ट्रीय स्तरावरील या परिषदेमध्ये, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांनी एका शोध निबंधाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील हिवाळे आणि कुडोपी येथील कातळ शिल्पांच्या सविस्तर माहितीचे छायाचित्रांसह सादरीकरण केले. स्वतः लळीत हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवासी आहेत. या कातळशिल्पांमध्ये मानवाकृती, मासे, विविध प्रकारची वर्तुळे, पक्षी, चित्रविचित्र आकृती मोठ्या प्रमाणात असून ती इसवी सनपूर्व चार ते सात हजार वर्षांपूर्वीची असावीत. एवढ्या मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी अशी कातळशिल्पे आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ठिकाणी असलेले मातृदेवतेचे शिल्प विशेष उल्लेखनीय आहे. हिवाळे येथील सड्यावरही अशाच कातळशिल्पांचा शोध लळीत व त्यांचे बंधू प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी २००२ मध्ये लावला होता. पश्चिम किनारपट्टीवर गोव्यातील उसगाळीमळ, महाराष्ट्र – गोवा सीमेवरील विर्डी, हिवाळे, कुडोपी, खानवली (राजापूर), निवळी (रत्नागिरी ) अशा अनेक ठिकाणी ही कातळशिल्पे आढळली असून त्यामध्ये काही परस्परसंबंध (लिनिएज) असण्याची शक्यता लळीत यांनी आपल्या सादरीकरणाच्या वेळी व्यक्त केली.
राजापूर, रत्नागिरी व लांजा तालुक्यात ४२ गावांमधून ८५० कातळशिल्पे सापडली आहेत. राजापूरजवळच्या गोवळ या गावातही मानवी संस्कृतीच्या प्रागेतिहास काळातील कातळशिल्पे आहेत. शोधकर्ते सुरेंद्र ठाकुरदेसाई, धनंजय मराठे आणि सुधीर रिसबूड या शोधकर्त्यांनी चार वर्षांपासून ही मोहीम सुरू केली आहे. कोकणातल्या सड्यांवर, म्हणजे खडकाळ भूभागांवर, कोरलेली ही चित्रं आहेत. ती अनेक प्रकारची आहेत. त्यात प्राणी आहेत, पक्षी आहेत, मानवी आकृत्या आहेत, भौमितिक रचना आहेत, नुसतेच आकार आहेत. या चित्रांवरून लगेचच समजतं की अप्रगत मानवानं अगदी प्राथमिक टप्प्यात कोरलेली ही चित्रं आहेत. मानवी संस्कृतीच्या विकासाच्या प्रवासात अशा प्रकारची कोरलेली चित्रं जगाच्या अनेक प्रदेशांत सापडतात.
रत्नागिरीत सापडणारी चित्रं बघतांनाच समजतं की, इथं राहणारा माणूस हा नुकताच त्याच्या अवती-भवती असणारा निसर्ग रेखाटायला लागला होता. जे तो पाहत होता, ते नोंद करून ठेवण्याची त्याच्यातली प्रेरणा जन्म घेत होती. पण त्यामुळे पहिला प्रश्न कोणालाही हा पडतो की, नेमक्या कोणत्या काळातली, किती हजार वर्षांपूर्वीची ही चित्रं आहेत? कोणत्या युगामध्ये त्यांचा समावेश होतो? मात्र त्याचं नेमकं उत्तर अद्याप पुरातत्त्वशास्त्रज्ञांकडे नाही. कारण त्यासाठी ज्या दगडी हत्यारांनी ही चित्रं खोदली गेली, ती सापडावी लागतील आणि मग कार्बन डेटिंगनं त्यांचं नेमकं वय समजू शकेल. काही मोजक्या ठिकाणी
ही हत्यारं सापडायला सुरुवात झाली आहेत, पण त्यांचा प्रगत अभ्यास नुकताच सुरू झाला आहे. पण या कातळशिल्पांच्या दर्शनी अभ्यासावरून आणि आजवर जगभरात इतर झालेल्या अभ्यासाच्या आधारे कोकणातल्या चित्रांच्या कालखंडाचा कयास करता येतो. महाराष्ट्राच्या पुरातत्त्व खात्याचे संचालक तेजस गर्गे सांगतात. भारतातल्या पुराव्याचा विचार केला, तर अशा प्रकारची कातळशिल्पं रत्नागिरी, गोवा आणि मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवरच्या टेकड्यांमधून आपल्याला माहिती आहेत. आणि ही प्रामुख्यानं ज्याला आपण उत्तर पुराश्मयुगाचा शेवटचा भाग मानतो, कोकणातल्या परिस्थितीचा अभ्यास केला तर सर्वसाधारणत: ही १० हजार वर्षांपूर्वीची असावीत असा एक प्राथमिक अंदाज आहे. कमीत कमी जरी म्हणायचं झालं तर ७०० वर्षांचा, म्हणजे इसवी सन पूर्व ३०० ते इसवीसनपूर्व १० हजार, कमीत कमी ७०० वर्षांचा आणि काही ठिकाणी ४० हजार वर्षं इतका मागे जायचीही शक्यता आहे.
अर्थात प्रत्येक साइटवरून कसे पुरावे आपल्याला मिळताहेत त्याच्यावर हे अवलंबून आहे. कोकणातल्या सड्यांवरच्या या कातळशिल्पांमध्ये प्राण्यांसोबत अनेक अगम्य आकार किंवा भौमितिक रचनाही पाहायला मिळतात. यातल्या काही चित्रांचे आकारही अवाढव्य आहेत. काही चित्रं तर अगदी ५० फुटांहूनही अधिक लांबीची आहेत आणि काहींमध्ये असलेलं भौमितिक प्रमाणही तोंडात बोटं घालायला लावतं. म्हणजे या माणसाला भूमितीची जाण असावी का? काही चित्रं अगदी प्राथमिक वाटत असली, तरी काही मात्र एखाद्या कलाकारानं काढलेली असावी अशी सुरेख आहेत. काही रचना क्लिष्ट आहेत. मग शेकडो वर्षांच्या मोठ्या कालखंडात अनेक पिढ्यांमध्ये ही कातळशिल्पांची कला विकसित होत गेली असावी का? या चित्रांच्या शैलींवरून काय वाटतं? सिंधुदुर्गप्रमाणे कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या अन्य जिल्ह्यातही विविध ठिकाणी जांभा पाषाणावर कोरलेली लक्षणीय अशी चित्रे, नकाशे, काष्ठ शिल्पे, गुहा, लेणी, मंदिरे आढळून येतात. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंब्याच्या पुढे निवळी तिठ्याजवळ जांभा दगडावर कोरलेले चित्र प्राचीन संस्कृतीचा परिचय देतात. आश्चर्याची गोष्ट ही की या कातळशिल्पांमध्ये दिसणारे गेंडा, पाणघोडा यांच्यासारखे काही प्राणी हे कोकणात आढळतही नाहीत. मग या माणसानं ते पाहिले तरी कुठे? तो स्थलांतरित होता की त्या काळात हे प्राणी कोकण भागात होते? असे अनेक प्रश्न अभ्यासानंतर सुटणार आहेत. गोवा शासनाचे सेवानिवृत्त पुरातत्त्व संचालक पी. पी. शिरोडकर यांनी गोव्यातील उसगाळीमळ येथील कातळशिल्पे प्रकाशात आणल्यावर त्या सरकारने ती लगेचच संरक्षित जाहीर केली. पर्यटन स्थळांमध्ये त्या जागेचा समावेश करून पर्यटकांना तेथे नेले जाते. तिथे आठ-दहाच कातळशिल्पे आहेत. तर कुडोपीत ५० हून अधिक कातळशिल्पे पाहायला मिळतात. विर्डी येथील कातळशिल्प धरणात गडप झाली. कुडोपीच्याही अमूल्य ठेव्याची अशी वाताहत होण्यास वेळ लागणार नाही. हजारो देशी-विदेशी पर्यटक आणण्याची क्षमता असणाऱ्या या कातळशिल्पांकडे पर्यटन महामंडळ, जिल्हा प्रशासन लक्ष देईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…