Thursday, March 20, 2025
Homeमहत्वाची बातमीभाषा : संवादाचा पूल

भाषा : संवादाचा पूल

डॉ. वीणा सानेकर

तुला शोभत नाही ही भाषा…
भाषा जपून वापरा राव…
ही काय भाषा आहे तुमची..
भाषा बघा आपली…!
ही असली भाषा?
हिंमत कशी होते ही भाषा वापरायची?
तोंडाला येईल ते कसे
बोलताय तुम्ही?

अशी वाक्ये दैनंदिन जीवनात कानावर पडतात. ही वाक्ये दोन माणसांमधला विसंवाद सूचित करतात. बोलता-बोलता अचानक विसंवादाचे एक टोक गाठले जाते नि मग अपशब्द वापरले जातात. बोलताना तोल ढळतो नि आवाज अनपेक्षितपणे चढतो. मग लोक हमरीतुमरीवर येतात. एकमेकांचा अपमान करतात. असे प्रसंग खूपदा घडतात.

केवळ गुंड-मवाल्यांच्याच तोंडी शिव्या असतात असे नव्हे, तर भले भले शिव्यांची लाखोली येता – जाता वाहतात. शिव्यांचा कोश प्रकाशित होण्याइतके भांडार आपल्याकडे आहे, असे म्हणून तर म्हटले पाहिजे.

स्त्रीला अपमानजनक वागणूक देताना प्रतिष्ठित घरातही शिव्यांची फुले उधळली जातात. घरातल्या या शिव्यासंस्कारांचे दुष्परिणाम बालमनांवर होतात आणि मुलांच्या खेळांमध्येही शिव्यांचा शिरकाव होतो.

तिरकस बोलणे हा भाषेचा आणखी एक पैलू. टोमणे मारणे, टोचून बोलणे याही जोडूनच आलेल्या शब्दछटा. सासू – सुना, नणंद – भावजय या नात्यांमध्ये या शब्दछटांचे अप्रूप फार, असे आपण ऐकत आलो आहोत. मालिका याच गृहितकावर उभ्या राहून ‘टीआरपी’ कमावतात.

जिव्हारी लागेल असे बोलणे, मन दुखावणे, काळजाला घरे पडतील असे शब्द या छटा पुन्हा आणखी वेगळ्या! घालून-पाडून बोलणे, हाही एक विसंवादाचा पैलू. त्याचेही प्रताप अनंत!

मुळात समाजव्यवहाराच्या सर्वच क्षेत्रांच्या आरोग्यासाठी संवाद महत्त्वाचा पण तसे घडताना दिसत नाही. घरात तो जितका महत्त्वाचा तितकाच घराबाहेरही. घरात समंजस भाषा हवी, तशी ती कार्यालयीन कामकाजाच्या क्षेत्रातदेखील हवी. घर म्हणजे केवळ त्याची सजावट नाही, तर माणसांच्या ऊबदार व परिपक्व संवादाने घराचे वातावरण विणलेले असले पाहिजे. पण तसे नेहमीच घडत नाही. कुठेतरी ठिणगी पडते आणि अवघे घरच त्यात सापडते.

संस्था आणि आस्थापनांच्या कार्यालयांमध्ये ठिकठिकाणी काय दिसते? ज्येष्ठ-कनिष्ठ, जाती-पाती अशा विविध भेदाभेदांचे मुद्दे डोकी वर काढत राहतात. त्यावरून लोक एकमेकांशी डाव खेळतात आणि सबंध कार्यालय त्यात भरडले जाते. खरे पाहता घरापेक्षा जास्त काळ माणसे नोकरीच्या ठिकाणी असतात. मग अशा वेळी सौहार्दपूर्ण वातावरण असले, तर सर्वांनाच ते पूरक ठरते. वास्तविक एकमेकांचा आदर राखणे ही फार कठीण गोष्ट नाही, पण ती लोक अवघड करून ठेवतात. एकमेकांमध्ये गैरसमजांचे तण पसरवण्यात काही लोकांना इतका आनंद मिळतो की, परिणामांची तमा न बाळगता ते आपली कुटिल नीती वापरत राहतात.

मानवी संबंधांमध्ये एकदा का परकेपणा आला की दूरस्थपणाचे वाळवंट पसरत जाते. हे वाळवंट ओलांडणे मग सोपे राहत नाही. प्रत्येकालाच समंजस संवादाची कला साधते असे नाही; परंतु किमान आपल्या बोलण्याने दुसरा माणूस दुखावला जाऊ नये इतके तरी निश्चित करता येते. पण तितकीही परस्पर संवादाची बूज माणसांना राखता येत नाही. उलट मुद्दाम कुरापती करण्याकडे काहींचा कल असतो. जुन्या कटू खपल्या काढण्यात वा आपल्या शब्दांनी इतरांना ओरबाडून काढण्यात असा काय आनंद मिळतो?

शब्दांनी केलेल्या जखमा चिघळत राहतात आणि माणसे दुरावत जातात.आपल्या शब्दांमुळे जर का कुणाच्या जखमेवर फुंकर घालता येत नसेल, तर मौन काय वाईट?

शब्दांमुळे अशा भिंती उभ्या राहू शकतात, जिथे माणसांची एकमेकांकरिता अनुकूल बनण्याची क्षमताच खुंटते. पण शब्दच पूलही बनतात. भाषेतली अशी अंतस्थ शक्ती आपल्याला उमजेल का? सरळ – साधीच वाक्ये, पण माणसाला बळ देण्याची ताकद त्यांच्यात असते.

तुझं मन मला कळतंय…
तू नको काळजी करूस, मी आहे…
आपण ठरवलं, तर हे काम पूर्ण होईलच ना!
तू किती सहज समजून
घेतलंस मला…

ही वाक्य वरवर पाहता साधी सोपी वाटतात. पण ती संवादाचा भक्कम पूल बांधू शकतात. आपण यात किती भर घालू शकतो, हे शोधत राहण्यात सर्वांचे हित आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -