Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेकेडीएमसीच्या जैवविविधता उद्यानाची राष्ट्रीय स्तरावर दखल

केडीएमसीच्या जैवविविधता उद्यानाची राष्ट्रीय स्तरावर दखल

कल्याण (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या जैवविविधता उद्यानाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून इंदोर येथे जैवविविधता जतन या विषयावर संपन्न झालेल्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये कल्याण डोंबिवलीमधील आंबिवलीत गत तीन वर्षांच्या कालावधीत तयार झालेल्या जैवविविधता उद्यानाबाबत महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी देवलपल्ली यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अनुज्ञेने सादरीकरण केले.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रिंग रोडमुळे बाधित होणाऱ्या सुमारे १२०० झाडांच्या बदल्यात महानगरपालिकेने एमएमआरडीएच्या सहकार्याने कल्याणमधील आंबिवलीच्या ४० एकर परिसरात सुमारे १५ हजार वृक्षांची लागवड करण्याचे ठरविले आणि ही वृक्ष लागवड मोहीम जुलै २०१८ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर, एमएमआरडीएचे प्रतिनिधी आणि वनविभागाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली. वन विभागाने आंबिवली येथील टेकडी परिसरात महापालिकेत वृक्ष लागवडीसाठी दिलेल्या जागेवर आतापर्यंत करंजा, बहावा, जांभुळ, बदाम आंबे, निलगिरी, गुलमोहर, पिंपळ, कडुलिंब, बकुळ, फणस, अर्जुन, कदंब, कैलास पती, वड, उंबर अशा विविध प्रकारच्या भारतीय आणि दुर्मीळ झाडांनी आता आंबिवलीची टेकडी हिरवीगार झाली आहे.

तसेच आय नेचर फाउंडेशनच्या सहकार्याने फुलपाखरू उद्यान, बी पार्क, बॅट पार्क, पक्षी पार्क, नक्षत्र उद्यान, मेडिसिनल पार्क उभारण्यात आली आहेत. आजमितीस या ठिकाणी ३६ प्रकारचे पक्षी, ७ प्रकारचे सरपटणारे प्राणी, ३५ प्रकारचे कीटक आणि ४ प्रकारचे सस्तन प्राणी आढळून आले आहेत. माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याच्या प्रेरणेतून आणि महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे वृक्ष अधिकारी संजय जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने साकारलेल्या जैवविविधता उद्यानाची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील इंदोर येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी जैवविविधता जतन या विषयावर संपन्न झालेल्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये कल्याण डोंबिवलीमधील आंबिवलीत गत तीन वर्षाच्या कालावधीत तयार झालेल्या जैवविविधता उद्यानाबाबत महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी देवलपल्ली यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अनुज्ञेने सादरीकरण केले. या सादरीकरणाची सर्व स्तरावर प्रशंसा झाली. महापालिकेच्या जैवविविधता उद्यानाबाबतचा लेखही या परिषदेत प्रकाशित करण्यात आलेल्या सेमिनार मध्ये प्रसिद्ध झाला आहे. महानगरपालिकेचा निधी खर्च न करता शहरी भागात साकारलेल्या या जैवविविधता उद्यानाची या परिषदेतील उपस्थितांनी दखल घेऊन कौतुक केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -