साम्राज्यवादाचा धोका जगाला सतत जाणवत आहे. अमेरिका, चीन, रशिया या महासत्तांच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे आणि वाढता दहशतवाद यामुळे जग नेहमीच महायुद्धाच्या छायेत वावरत आहे. रशिया – युक्रेन यांच्यात गेले अनेक दिवस सुरू असलेल्या संघर्षामुळे जगावर युद्धाचे ढग दाटून आलेले असतानाच आता यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीवरून अमेरिका आणि चीन यांच्यात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे चीन चांगलाच संतापला आहे, तर पेलोसी यांनीदेखील चीनला नाव न घेता इशारा दिला आहे. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी त्यांच्या तैवान भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन आणि इतर खासदारांची भेट घेतली. या बैठकीपूर्वी पेलोसींनी तैवानच्या संसदेला संबोधित केले तसेच त्यांनी चीनला नाव न घेता इशाराही दिला आहे. त्या म्हणाल्या, ‘‘कितीही विरोध होऊ द्या, आता आम्ही थांबणार नाही.’’ पेलोसी यांनी तैवानच्या संसदेत भाषण करताना जगातील सर्वात स्वतंत्र समाजांपैकी एक म्हणून तैवानचे कौतुक केले. तसेच कोरोना महामारीविरुद्धच्या लढाईत तैवानने एक आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले. त्याच वेळी, तैवान-अमेरिका यांच्यातील दृढ मैत्रीचा उल्लेख करून या मैत्रीचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. तैवानला एकटे न सोडण्याचे आश्वासन देऊन अमेरिकेने चीनला डिवचले आहे. अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी आणि तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी तैपई येथील राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयामध्ये भेट घेतली. चीनचा विरोध झुगारून तैवानमध्ये नॅन्सी दाखल झाल्याने चीनने आक्रमक पवित्रा घेतला असतानाच आम्ही तैवानला एकटे सोडणार नाही, असे आश्वासन नॅन्सी पेलोसी यांनी अमेरिकेच्या वतीने दिले. तैवानसोबत असणाऱ्या मैत्रीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असेही पेलोसी यांनी म्हटले आहे.
तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी नॅन्सी पेलोसी यांनी देशाला भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. आमची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी आम्ही वाटेल ते करू, असा शब्दही वेन यांनी अमेरिकेला दिला आहे. विशेष म्हणजे चीनने नेहमीच तैवानला आपला भूभाग मानले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या म्हणण्यानुसार, आज नाही तर उद्या तैवान, चीनमध्ये सामील होईलच. त्यामुळे तैवानवर आपला अधिकार गाजवायच्या भूमिकेत असलेल्या चीनला नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे प्रचंड संताप आला आहे आणि त्यांनी तैवानभोवती डावपेचांची घोषणा केली आहे. दुसरीकडे, नॅन्सी यांनी आपल्या भेटीदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, तैवानमध्ये येण्यासाठी त्यांच्यापुढे ‘सुरक्षा, शांतता आणि सरकार’ हे तीन महत्त्वाचे मुद्दे होते. तैवानमधील लोकशाहीचे आम्ही समर्थक आहोत आणि आम्ही नेहमी तैवानच्या लोकांसोबतच आहोत. अमेरिकेला तैवानमध्ये शांतता हवी आहे. आम्हाला तैवानसोबत व्यापरउदीम वाढवायचा असून मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण करायची आहे. तैवानचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्यासाठी आपण येथे आलो आहोत व एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी मार्ग शोधावा लागणार आहे.
तर दुसरीकडे, नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीवरून भडकलेल्या चीनच्या लष्कराने अमेरिकेला थेट इशाराच दिला आहे. आम्ही अमेरिकेच्या कोणत्याही चिथावणीला तोंड देण्यासाठी तयार आहोत आणि आमच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासही सक्षम आहोत, असा इशारा दिला आहे. ही आमची दुर्भावनापूर्ण तैवानच्या प्रवाशांसाठी चेतावणी आहे. किंबहुना, चीन तैवानला आपला भाग मानतो, त्यामुळे तैवानने इतर कोणत्याही देशाशी जवळीक साधण्यासही आमचा तितकाच विरोध आहे. या दोन देशांमधील वाद खूप जुना आहे. १९४९ पासून कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही भाग स्वतःला एकच देश मानतात. चीन अजूनही तैवानला आपला भाग मानतो, तर तैवान स्वतंत्र देश असल्याचे सांगतो. या देशांमधील वाद दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाला. १९४०मध्ये माओ झेडोंग यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाने कुओमिंतांग पक्षाचा पराभव केला. त्यानंतर कुओमिंतांगचे लोक तैवानमध्ये स्थायिक झाले. आता पेलोसी यांच्या भेटीमुळे अमेरिकेने विश्वास तोडल्याचा आरोप चीनने केला आहे. त्यामुळे पुढचे काही तास जगासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. रशिया आणि यूक्रेन युद्धाची झळ संपूर्ण जगाला विविध माध्यमांतून बसलेली आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील अद्याप युद्ध संपलेले नसताना जगावर आणखी एका युद्धाचे सावट निर्माण झाले आहे.
अमेरिका आणि चीनमध्ये आर्थिक महासत्ता होण्याची स्पर्धा सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्याने नेमके काय घडणार? हा चिंता वाढवणारा प्रश्न निर्माण झाला आहे. चीनने अमेरिकेला तैवानकडे लक्ष देऊ नका, असे सुनावले होते. नॅन्सी पेलोसी या तैवानमध्ये पोहोचल्याने चीन भडकला आहे. अमेरिकेने परिणामांना तयार राहावे, अशी धमकी चीनने दिली आहे. चीनने हाँगकाँग, तैवान आणि तिबेटच्या प्रश्नावर अणवस्त्र वापर करण्याचा इशारादेखील दिला आहे. या पार्श्वभूमीवर जगावर आणखी एका युद्धाचे सावट निर्माण झाले आहे. चीनने तैवानचे विमानतळ उडवून देण्याची धमकी दिली होती. चीनने तैवानच्या सीमेवर सैन्य तैनात करत ताकद दाखवून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आगामी काही काळ आशिया आणि संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडणार का? हे पाहावे लागणार आहे. आधीच युक्रेन आणि रशियात सुरू असलेल्या संघर्षांमुळे जग पोळले असताना चीन आणि अमेरिकेत वाढता तणाव आशिया खंडासाठी नवी युद्धचिंता घेऊन आला आहे.