मुंबई (प्रतिनिधी) : भाजपतर्फे दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना १० लाख रुपयांचे विमा कवच देणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा भाजप उतरविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दहीहंडी उत्सव म्हणजे आनंद, उत्साहाला उधाण आणणारा. गोविंदांचे उंचच उंच थर आणि दिलेली सलामी तसेच फोडण्यात येणाऱ्या दहीहंडीचा क्षण हा डोळ्यांचे पारणे फिटविणारा असला तरी तो गोविंदांसाठी तितकाच जोखमीचा असलेला क्षण असतो. या सोहळ्यात जखमी झालेल्या गोविंदांकडे कानाडोळा करण्यात येतो. अपघातामुळे अनेक गोविंदांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटून जाते. कधीकधी जीवावरही बेतते.
दहीहंडी हा महाराष्ट्रासाठी आणि विशेष म्हणजे मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. मुंबईच्या दहीहंडीची चर्चा जगभरात होत असते. दही हंडीच्या थरावरून पडल्याने अनेक गोविंदांनी आपले प्राण गमविले तर अनेकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. या सर्व बाबी ध्यानात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने भाजपतर्फे उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना १० लाख रुपयांचे विमा कवच देणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा भाजप उतरविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दहीहंडीच्या उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदांना अपंगत्व आल्यास किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.