पुण्यक्षेत्री धार्मिक ग्रंथांचे पारायण करण्याची पूर्वापार पद्धत आहे. म्हणून बाबांच्या दर्शनास येणारा कोणी भक्त मशिदीत वा मुक्कामी ग्रंथाचे पारायण करीत असे. तो त्या ग्रंथाची प्रत विकत घेऊन माधवरावांच्या हस्ते बाबांना देई. श्रीबाबा तो ग्रंथ वरचेवर बघून परत देत. बाबांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेल्या त्या ग्रंथाच्या नित्यपठणाने व पारायणाने आपले कल्याण होईल, अशी त्या भक्ताची श्रद्धा असे. कधी कधी श्रीबाबा ग्रंथाची प्रत भक्ताला परत न देता माधवरावांना संग्रही ठेवण्यास सांगत. अर्थात कोणता ग्रंथ वाचला पाहिजे हे श्रीबाबा स्वतः ठरवीत.
काका महाजनी नित्यनेमाने एकनाथी भागवत वाचीत असत. त्यात खंड पडू नये म्हणून ते कुठेही गेले तरी तो ग्रंथ बरोबर नेत. एके दिवशी ते शिरडीत आले असता माधवराव त्यांना भेटायला गेले. त्यांनी तो ग्रंथ पाहिला व म्हणाले, ”काका, हा ग्रंथ मी घरी नेऊ का? वरचेवर बघून परत आणून देतो.” काकांच्या अनुमतीने त्यानी तो ग्रंथ घेतला. मग ते मशिदीत आले. तेव्हा बाबा माधवरावांना म्हणाले, ”शाम्या, हे पुस्तक कसले आहे.” माधवराव उत्तरले, ”काकांकडून नाथ भागवत आणले आहे.” बाबा म्हणाले, ”हा ग्रंथ संग्रही ठेव. पुढे आपल्याला उपयोगी पडेल.” माधवराव पुन्हा काकांकडे गेले. त्यांनी बाबांची अनुज्ञा सांगितली आणि तो ग्रंथ आपल्या संग्रही ठेवला.
काही दिवसांनी काका महाजनी पुन्हा शिरडीस आले. त्यांच्याकडे नाथ भागवताची दुसरी प्रत होती. ती त्यांनी बाबांच्या पुढे ठेवली. ती त्यांनी वरचेवर बघून काकांना प्रसाद म्हणून परत दिली व म्हणाले, ”हा ग्रंथ आपल्या कामी येणार नाही. कोणालाही देऊ नकोस.” ते ऐकून काकांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांनी भागवताची प्रत मस्तकी लावली आणि बिऱ्हाडी परतले.
एके दिवशी जोगांच्या नावे पार्सल आले. त्यात लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या गीतारहस्याची प्रत होती. त्यांनी पोस्टात जाऊन ते पार्सल घेतले आणि मशिदीत आले. बाबांनी विचारले, ”जोग, हे काय आहे.” तेव्हा त्यांनी तिथेच पार्सल फोडले व गीतारहस्य बाबांच्या हाती दिला. त्यांनी तो वरचेवर पाहिला. त्यावर एक रुपया ठेवून तो ग्रंथ जोगांना परत दिला व म्हणाले, ”याचे मनःपूर्वक वाचन करा. तुमचे कल्याण होईल.” ते ऐकून जोगांना खूप आनंद झाला. त्यांनी तो ग्रंथ आपल्या मस्तकी लावला
विलास खानोलकर