बर्मिंगहॅम (वृत्तसंस्था) : एकीकडे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताकडून पदक जिंकण्याची मालिका सुरू असताना पाकिस्तानला मात्र पहिल्यावहिल्या सुवर्णपदकासाठी प्रचंड झगडावे लागले. त्यांची ही अपेक्षा अखेर गुरुवारी पूर्ण झाली. वेटलिफ्टर मुहम्मद नूह बटने ४०५ किलो वजन उचलून पाकिस्तानला पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकून दिले. राष्ट्रकुल २०२२ मधील पाकचे हे पहिले सुवर्ण पदक आहे.
नूह बटने पहिल्या स्नॅच राऊंडमध्ये १७३ किलो वजन उचलले आणि दुसऱ्या क्लिन एंड जर्क राऊंडमध्ये २३२ किलोचे वजन उचलत पहिले स्थान पटकावले.
पहिले सुवर्णपदक जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. पाकच्या पंतप्रधानांसह अनेकांनी बटवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
या ऐतिहासिक कामगिरीनंतर बटने आपले पदक वडिलांना समर्पित केले. त्यांच्या १२ वर्षांच्या मेहनीतीमुळे मी यश प्राप्त करू शकलोय, अशी भावना बटने व्यक्त केली.