सुकृत खांडेकर
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी येथे एका चौकाच्या नामकरण समारंभात राज्यपालांनी गुजराती व राजस्थानी समाजाच्या उद्यमशिलतेचे कौतुक करताना जे वक्तव्य केले, त्यावरून राज्यात सत्ता गमावलेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला संताप प्रकट करायला आयते कोलीतच मिळाले. राज्यपाल म्हणाले, मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी व राजस्थानी लोक गेले, तर या भागात काहीच पैसा उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणार नाही. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून सर्व स्तरातून संताप प्रकट झाला. राज्यपालांनी महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा अवमान केला अशा तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राज्यपालांनी तत्काळ खुलासा करताना म्हटले की, राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी बोललो, त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा हेतू नव्हता. केवळ गुजराथी-राजस्थानी लोकांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अवमान नसतो. निदान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही….
१ ऑगस्ट रोजी राजभवनातून एक पत्रक काढून राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागितली. त्यांनी म्हटले की, काही समाजबांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. त्या दिवशीच्या भाषणातून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल, तर चुकीला महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल, ही कल्पनाही मला करवत नाही. राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंत:करणाचा पुनर्प्रत्यय देईल, असा विश्वास बाळगतो. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाला. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राने गुजरात राज्याच्या निर्मितीसाठी ६५ कोटी रुपये दिले याचीही सरकार दरबारी नोंद आहे. महामुंबई परिसरात जवळपास २ कोटी लोकसंख्या आहे. राज्यपालांनी मुंबईबाबत असे वक्तव्य करायला नको होतेच, पण त्यांच्यावर टीकेची झोड उठविणाऱ्यांनी राज्यात अडीच वर्षे सत्तेवर असताना आणि मुंबई महापालिकेत तीस वर्षे सत्ता उपभोगत असताना मराठी लोकांच्या भल्यासाठी काय केले? राज्यपालांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्यांनी सत्तेवर असताना किती मराठी लोकांना रोजगार, भांडवल आणि निवारा दिला? हे एकदा जाहीर करावे.
मुंबई मराठी माणसांचीच होती, आजही आहे आणि उद्याही राहणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मुंबईकरांमध्ये महाराष्ट्राची अस्मिता घट्ट भिनलेली आहे. पण याचा अर्थ मराठी लोकांनी केवळ नोकरी व कारकुनी करावी आणि मोठ-मोठे उद्योग, व्यवसाय अमराठी लोकांनी चालवावेत असे नव्हे. मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्व संध्येलाच राज्यपालांनी मुंबई संदर्भात गुजराथी-राजस्थानी असे भाष्य केले हे जास्त खटकणारे ठरले. भाजपचे आमदार नितेश राणे हे कट्टर मराठी अस्मितेचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या रोमारोमांत मराठी संस्कृती भिनलेली आहे. ते म्हणाले, महापालिकेची कंत्राटे देताना शहा-अग्रवाल, मॉल्ससाठी जैन, पैसे ठेवायला नंदकुमार चतुर्वेदी, कोविड सेंटर्स चालवायचा देतानाही अमराठी, धंदा-व्यवसायात पार्टनरही अमराठी… अशांना राज्यपालांवर टीका करायचा नैतिक अधिकार काय?
उद्योग, व्यवसायात मराठी जनांनी आपले स्थान निर्माण केले आहे. प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता हे मराठी उद्योजकांचे वैशिष्ट्य आहे. किर्लोस्कर, गरवारे, आबासाहेब कुलकर्णी, बाबा कल्याणी, बीव्हीजीचे हनुमंतराव गायकवाड, कॅम्लिनचे दांडेकर, बी. जी. शिर्के उद्योग समूह, केसरी टूर्सचे पाटील, दातार मसालेवाले, घाटगे-पाटील, चितळे बंधू, विठ्ठल कामत, सुरेश हावरे समूह, आयआरबीचे म्हैसकर, सारस्वत बँकेचे पारूळकर, निर्लेपचे नानासाहेब भोगले, बेडेकर मसालेवाले, पितांबरीचे प्रभुदेसाई, अॅपलॅबचे देवधर, पीएनजीचे गाडगीळ, तळवलकर जिम्स, सुलाचे राजीव सामंत अशी भली मोठी यादी सांगता येईल. आखाती देशात आणि युरोप-अमेरिकेत हजारो मराठी तरुण मोठ-मोठ्या पदांवर काम करीत आहेत. दिल्ली-गुडगावमध्ये काॅर्पोरेट समूहांमध्ये असंख्य ठिकाणी मराठी तरुण उच्च पदस्थ आहेत. आपल्या गुणांनी व बुद्धीमत्तेने मराठी लोकांनी नोकरी, व्यवसायात झेप घेतली आहे. पण त्याचा ते कधी गाजावाजा करीत नाहीत. सुशिक्षित मराठी लोकांच्या स्वभावात लुटमार नाही. सोशिकता, संयम व अध्यात्माची आवड हे गुण त्यांच्या अंगी मुरलेले आहेत.
मुंबईत अनेक रस्त्यांना व चौकांना अमराठी नावे आहेत. महापालिकेतील नगरसेवकांच्या शिफारसीने हे फलक लागतात. मुंबई महापालिकेत गेली तीस वर्षे शिवसेना सत्तेवर आहे. नामकरण कसे होते, हे उघड गुपित आहे. तेव्हा मात्र मराठी अस्मिता कधी जागी होत नाही. अन्य कोणत्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर याव्यतिरिक्त अन्य कोणा मराठी माणसाचे नाव किती रस्त्यांना किंवा चौकाला दिसते?
मंत्रालय, तहसील कार्यालये, रेशनिंग ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, परिवहन कार्यालय, टपाल कचेऱ्या, बेस्ट-एसटी परिवहन सेवा सर्वत्र मराठी लोकच आहेत ना, तरीही अमराठी लोकांचे वैभव वाढते व मराठी माणूस लोकलमधील खचाखच गर्दीतून आयुष्यभर प्रवास करतो. यात बदल कधी होणार? मोठी दुकाने, मॉल्स, व्यापार, उद्योग, सलून-पार्लरसुद्धा अमराठी लोकांच्या हाती आणि मराठी तरुण रस्त्यावर वडा-पाव, भुर्जी-पाव आणि चायनिज विकताना दिसतो. हे चित्र कधी बदलणार? गणपती, दहीहंडी, शिमगा आदींच्या जल्लोशात मराठी तरुण मुले अग्रभागी दिसतात. राजकीय नेत्यांच्या पुढे-मागे, त्यांच्या मिरवणुकीत नि मोर्चात मराठी तरुणांचीच झुंबड दिसते. वडा-पाव खाऊन, घोषणा देत झेंडे फडकवताना दिसतात. राजकीय आंदोलनात सर्वाधिक गुन्हे हे मराठी तरुणांवर नोंदवले जातात. पोलीस स्टेशन व कोर्ट याच्या चकरा मारण्यात पंधरा वीस वर्षे जातात. मग मराठी तरुणांचे भविष्य पुढे कसे असणार?
टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांचे मोठे उद्योग समूह आहेत. रहेजा, रिझवी, रूस्तुमजी, रुणवाल, लोढा, हिरानंदानी, लोखंडवाला असे डझनावरी मोठ-मोठे विकासक आहेत. पण तेथे कर्मचारी म्हणून मराठीच मोठ्या संख्येने आहेत. कापड गिरण्या बंद पडल्या. अडीच लाख गिरणी कामगारांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्याच जागेवर उत्तुंग टॉवर्स उभे राहिले. तिथे फ्लॅट विकत घेणारे बहुतेक अमराठी आहेत. मुंबई-ठाण्यात मराठी लोकांच्या नावावर किती फ्लॅट आहेत, याची आकडेवारी सरकारने एकदा जाहीर करावी. एसआरएचे सर्व परवाने मराठी अधिकारी देतात, त्या जागेवर टॉवर्स झाल्यावर बहुसंख्य फ्लॅटमध्ये अमराठी लोकच दिसतात. मुंबईतील बहुतेक बार अॅण्ड रेस्टारंट्सचे मालक अमराठी आहेत. पण तेथे ग्राहक सर्वाधिक मराठी दिसून येतात.
मराठी कुटुंबाच्या मालकीची मोजकी वृत्तपत्रे सोडली, तर मोठ्या मीडिया हाऊसेसचे मालक अमराठी आहेत. बॉलिवूड ही मुंबईची शान आहे. चंदेरी पडद्यावर झळकणारे कलाकार व निर्माते दिग्दर्शक अमराठी पण सेट लावणारे मराठीच दिसतात. हे चित्र बदलण्यासाठी कोणत्या राजकीय पक्षांनी वा सरकारने प्रयत्न केले. आपण कष्टाने व कर्तृत्वाने श्रीमंत व्हावे अशी जिद्द मराठी तरुणांमधे निर्माण करण्याचे योजनाबद्ध प्रयत्न किती राजकीय पक्ष करतात? मराठी व्होट बँक हवी, मग मराठी वैभव संपन्न व्हावेत यासाठी किती नेते प्रयत्न करीत असतात? देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक मुंबईत पैसे कमावण्यासाठी येत असतात. कोणीही त्यांच्या राज्यातील जमीन व पैसा येथे घेऊन येत नाही. त्यांना साधनसामग्री, भांडवल, मनुष्यबळ याच मुंबई-ठाण्यात व महाराष्ट्रात मिळते. त्यावर ते अधिक संपत्ती कमवतात व मोठे होतात. मराठी माणूस नोकरीच्या मागे आणि तरुण वर्ग पुढाऱ्यांच्या मागे धावण्यात उमेदीची वर्षे घालवत असल्यामुळे तो मागे राहतो आणि अमराठी विविध क्षेत्रे काबीज करतात. मराठी म्हणजे पट्टेवाले, पाटीवाले आणि कारकून असे चित्र असता कामा नये. यासाठी मराठी माणूस आर्थिकदृष्ट्या सधन व संपन्न होणे महत्त्वाचे आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे, पण सर्वांना सामावून घेणारी व सर्वाधिक सेवा-सुविधा देणारी दुसरी मुंबई देशात निर्माण झालेली नाही, याचे श्रेय मराठी माणसाला व मराठी संस्कृतीलाच आहे.