Sunday, April 27, 2025
Homeक्रीडावेटलिफ्टर अचिंता शेउलीची सुवर्ण कमाई

वेटलिफ्टर अचिंता शेउलीची सुवर्ण कमाई

भारताला मिळवून दिले तिसरे सुवर्णपदक

बर्मिंगहॅम (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये पदक पटकावण्याचा भारतीय खेळाडूंचा धडाका रविवारी रात्री उशीरापर्यंत कायम होता. वेटलिफ्टर अचिंता शेउलीने सुवर्णपदकाला गवसणी घालत भारताला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले.

रविवारी रात्री उशीरा झालेल्या या सामन्यात स्नॅचमध्ये अचिंता शेउलीने पहिल्या लिफ्टमध्ये १३७ किलो वजन उचलले. तर दुसऱ्या लिफ्टमध्ये १३९ किलोचा वजन उचलले. यानंतर अचिंताने तिसऱ्या लिफ्टमध्ये १४३ किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. क्लीन अँड जर्कमध्ये अचिंता शेउलीने दुसऱ्या प्रयत्नात १७० किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने ३१३ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.

याआधी रविवारी जेरेमी लालरिनुंगाने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली. बर्मिंगहॅम २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. त्याचबरोबर अचिंता सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे.

अचिंता शेउलीचा खडतर प्रवास

एखाद्या चित्रपटाला शोभेल असा अंचिता शेउलीचा खडतर प्रवास आहे. अचिंता शेउलीचे वडील मजुरीचे काम करायचे. याशिवाय अंचिता रिक्षाही चालवत असे. एवढेच नाही तर यानंतर अचिंता शेउलीने जरीचे काम केले. जरीचे काम करण्याबरोबरच त्याने अनेक छोटी कामे केली. तसेच शिवणकामही केले.

पश्चिम बंगालमधील हावडा येथे जन्मलेल्या अचिंताचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षाचालक म्हणून काम करायचे. २०१३ मध्ये अचिंताच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर परिस्थिती बिकट झाली. वडिलांच्या निधनानंतर भाऊ आलोक हा कुटुंबातील एकमेव कमावता होता. त्याचवेळी अचिंताची आई पौर्णिमा यांनीही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटी-मोठी कामे केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -