Monday, June 30, 2025

हत्तीने दूरदृष्टी दिली

हत्तीने दूरदृष्टी दिली

विलास खानोलकर


पुण्याच्या जानकीबाईला नेत्ररोग होऊन तिला काहीही दिसेना. पुष्कळ औषधोपचार करूनही गुण नाही. अक्कलकोट स्वामींची कीर्ती ऐकून ती अक्कलकोटला आली. श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन त्यांच्या समोर उभी राहताच ते म्हणाले, 'अगं, हत्तीचे मूत डोळ्यांत घाल म्हणजे दिसेल.' त्यांच्या आज्ञेप्रमाणे तिने तसे करताच तिला स्वच्छ दिसू लागले. वर-वर विचार केला तर अंध जानकीबाईस श्री स्वामी समर्थ डोळ्यांत हत्तीचे मूत घालावयास सांगतात. तिने तसे करताच तिला स्पष्ट दिसू लागते. याचा भावार्थ आणि मतितार्थ शोधू गेल्यास जानकीबाई म्हणजे आंधळी भक्ती; परंतु कोणतीही मूळभक्ती कधीच आंधळी नसते. भक्ती करणारे अनेकदा सारा-सार विचार न करता, विवेकहीनतेने आंधळी भक्ती करीत असतात. सध्या अशा भक्तीचे उदंड सोहळे-उत्सव आदी आपण पाहतो, ऐकतो, वाचतो, भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, पारायण, नामस्मरण, जप, व्रत, अनुष्ठाने, उपवास, स्नान-दान, तीर्थाटने आदी सर्व चाललेली असतात. या सर्व फाफट पसाऱ्यात सन्माननीय अपवाद वगळता बहुतेकांचे या धार्मिक कृतीत अंधानुकरण असते. हे सर्व करीत असणाऱ्याचे प्रतीक म्हणजे या लीलेतील अंध जानकीबाई.

शेवटी ती सद्गुरू श्री स्वामी समर्थांकडे आली. या सर्व अंधविश्वातून बाहेर यायचे तर श्री स्वामींशिवाय दुसरे कोण? ते या अंधत्वावर हत्तीचे मूत घालण्याचा जगावेगळा उपाय सांगतात. त्या उपायासंबंधात याच ग्रंथात सांगितले आहे. तरीही संक्षिप्त स्वरूपात पुन्हा एकदा. हत्ती हे बुद्धीचे प्रतीक आहे. ही बुद्धी म्हणजे सारासार विचार करण्याची विवेक बुद्धी. या बुद्धीनेच टाकाऊ-टिकाऊ, इष्ट-अनिष्ट, योग्य-अयोग्य, मंगल-अमंगल, सत्य-असत्य, चांगले-वाईट आदी बाबींतला भेद समजू लागता अशी समज येणे म्हणजे एक प्रकारची दृष्टी प्रप्त होणे. थोडक्यात, 'हत्तीचे मूत डोळ्यांत' घातल्याचा मथितार्थ हाच बहुतेक व्यक्तींमध्ये देहबुद्धी किंवा भाग वासना असतात. या वासनांचे मूत्रासारखे विसर्जन करायचे असते म्हणजे स्वच्छ दिसू लागते, हा इथला अर्थबोध आहे. स्वामींचा शब्दच अमृत आहे.

Comments
Add Comment