जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूर शहरातील खाजगी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. या आगीत १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये बहुतांश रुग्णालयातील कर्मचारी आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्य प्रदेशातील दमोह नाका शिवनगर येथील न्यू लाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनाही बाहेर काढण्यात येत आहे.
आगीत अनेक रुग्ण जिवंत जळाले आहेत. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. आगीमुळे रुग्णालयात बराच वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालयातून सुमारे सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रुग्णालयात किती रुग्ण दाखल झाले याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.