विरार (प्रतिनिधी) : विरार – वसईसह पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर गेली अनेक वर्षे सातत्याने मासळीचा मोठा दुष्काळ जाणवत आहे. शेवंड, घोळ, दाढे यांसारखी मासळी जाळ्यात फारशी येतच नसल्याने मच्छिमारांनी चिंता व्यक्त केली आहे. पावसाळी मासेमारी बंदीमुळे दोन महिने किना-यावर विसावलेल्या बोटी खोल पाण्यात नेण्यासाठी रविवारीपासून मच्छिमार पाण्यात उतरले आहेत.
त्यामुळे वसई पाचूबंदर जेट्टीवर ऐन दुपारी रणरणत्या उन्हात मच्छिमारांची लगबग सुरू आहे. नव्या मासेमारी हंगामासाठी वसईतील मच्छिमार सज्ज झाले असले तरी यंदा पुरेशी मासळी जाळ्यात येणार का? याची मच्छिमारांना चिंता भेडसावत आहे. जागतिक तापमानवाढीच्या संकटात किनारपट्ट्या नष्ट होत असतानाच आता वसईच्या किना-याला अनिर्बंध रेती उत्खननाचे ग्रहण लागले आहे. अनेक वर्षे सुरू राहिलेल्या बेजबाबदार रेती उत्खननामुळे किनारे अक्षरश: ओरबाडून काढले आहेत. एकेकाळी दीडशे बोटी पाचूबंदर-किल्लाबंदरच्या किना-यावर पावसाळ्याच्या काळात सुरक्षित ठेवता येत होत्या. आता रेतीमाफियांनी किनारे उद्ध्वस्त केल्यामुळे या किनार्यावर दोन बोटी ठेवण्यासाठीदेखील जागा राहिलेली नाही.
किनारपट्टीवरचे वाढते प्रदूषण, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ओएनजीसी) मासेमारी क्षेत्रातील वाढत्या तेलविहिरी, तेलसंशोधनासाठी खोल समुद्रात होणारे सेस्मिक पद्धतीचे सर्वेक्षण, तारापूर प्रकल्पातून समुद्रात सोडले जाणारे उष्ण पाणी या सर्वच बाबी मत्स्योत्पादनाच्या मुळावर उठल्या आहेत. याशिवाय एलईडी पद्धतीनेही दर्याची दौलत लुटण्याचे प्रकार सुरू असल्यामुळे पारंपरिक मच्छिमारांची जाळी रिकामी राहत आहेत. या सगळ्या अडचणी, आव्हाने सोबत घेऊन मच्छिमार नव्या हंगामासाठी सज्ज झाले आहेत. किमान या हंगामात तरी ‘भरपूर म्हावरं मिलू दे’ अशी प्रार्थना करत मच्छिमार बांधवांनी दर्याराजाला नारळ वाहिला आहे.
अर्नाळा किनाराही खचतोय!
पाचूबंदर-किल्लाबंदरच्या किनार्याची जी स्थिती आहे, तशीच स्थिती आता अर्नाळ्याच्या किनार्याचीही होऊ लागली आहे. इथला किनाराही वेगाने खचत चालला आहे. परिणामी अर्नाळ्याच्या किनार्यावरही आता बोटी नांगरायला जागा राहिलेली नाही.
महिलांवर आर्थिक अरिष्ट !
किना-याची प्रचंड धूप झाल्यामुळे मासळी सुकविण्यासाठी असलेली जागा समुद्राने गिळंकृत केली आहे. त्यामुळे महिलांचा उदरनिर्वाहाचा मोठा आधार असलेल्या सुक्या मासळीचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आहे. सन २००० पर्यंत गावातील मच्छिमार महिला या किना-यावर मासळी सुकवत असत. त्यातून वर्षभर खर्चाची बेगमी होई. विशेषत: पावसाळ्यात मासेमारी बंद असताना सुक्या मासळीच्या व्यवसायातून संसाराला हातभार लागत असाते. आता हा व्यवसाय बंद झाल्याने महिलांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे.
कर्जाचे ओझे!
गेली दोन वर्षे करोनाकाळात मासेमारीवर बंदी नव्हती, पण मासळीबाजार बंद होते. बाजारात मासे विकायचा प्रयत्न केला तर पोलिसांच्या काठ्या पडत, टोपलीतली मासळी फेकली जात असे. या काळात कर्ज काढून घर चालवण्याशिवाय पर्याय नव्हता. बसीन कॅथलिक को-ऑप बँक ही इथली स्थानिक सहकारी बँक. गावातले बहुतेकजण बँकेचे सभासद आहेत. आजच्या घडीला या बँकेचे तब्बल ९० टक्के कुटुंबांवर कर्ज आहे. मत्स्यदुष्काळामुळे आर्थिक आवक घटल्याने ब-याच मच्छिमारांची कर्जखाती ही ‘एनपीए’ मध्ये गेली आहेत. त्यामुळे नव्याने मदतीचा मार्गही बंद झाला आहे, अशी माहिती बँकेचे संचालक असलेले संजय कोळी यांनी दिली.
वसई पट्ट्यातील मच्छिमारांनी शाश्वत मासेमारीला अनुरूप अशी पारंपरिक ‘कव’ या पद्धतीनेच मासेमारी कायम ठेवली आहे. तर दुसरीकडे पर्ससीन ट्रॉलर्सनी समुद्रात दिवस-रात्र लूट चालवली आहे. पर्ससीने होणारी मासेमारी म्हणजे समुद्रातील मत्स्यसंपदेवर दिवसाढवळ्या धनदांडग्यांनी टाकलेला दरोडा आहे.
-मिल्टन सौदिया, अध्यक्ष, कोळी युवाशक्ती संघटना