Thursday, July 18, 2024
Homeमनोरंजन‘इमर्जन्सी’त झळकणार श्रेयस तळपदे

‘इमर्जन्सी’त झळकणार श्रेयस तळपदे

दीपक परब

स्वतंत्र भारतातील एक काळाकुट्ट काळ म्हणजे आणीबाणीचा काळ. याबाबत सतत वाद-विवाद, चर्चा होत असतात. याच विषयावर अभिनेत्री कंगना राणावत हिच्या ‘इमर्जन्सी’ (आणीबाणी) या बहुचर्चित चित्रपटाचे लवकरच आगमन होणार असून प्रेक्षक त्याची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये कंगना स्वत: दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे, तर काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांचा विशेष लूक रिलीज करण्यात आला होता. अनुपम हे या चित्रपटात जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहेत.

आता या चित्रपटामधील श्रेयस तळपदे याचा लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात तो अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारत आहे. श्रेयस तळपदेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याचा इमर्जन्सी चित्रपटामधील लूक दिसत आहे. ‘दूरदर्शी, खरे देशभक्त आणि जनसामान्यांचा माणूस अशी ओळख असणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. या गोष्टीचा मला आनंद आणि अभिमान वाटत आहे. मला आशा आहे की, मी लोकांची अपेक्षा पूर्ण करेन’, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.

पुढे श्रेयसने कंगनाबाबत पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘मला ही भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मी कंगनाचे आभार मानतो. तू आपल्या देशातील टॅलेंटेड अभिनेत्री आहेस. तसेच तू एक चांगली दिग्दर्शिकादेखील आहेस’. श्रेयसने अटलबिहारी वाजपेयी यांची एक कवितादेखील पोस्टमध्ये लिहिली आहे. श्रेयसच्या या पोस्टला नेटकऱ्यांची खूप पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडिया अकाऊंवर शेअर केला होता. या टीझरने अनेकांचे लक्ष वेधले. इमर्जन्सीच्या टीझरच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डी. सी. १९७१ असे लिहिलेले दिसत आहे. इमर्जन्सी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मितीदेखील कंगनाने केली आहे. चित्रपटाचा स्क्रीन प्ले आणि संवाद लेखन हे रितेश शहा यांनी केले आहे. कंगनाच्या चाहत्यांनी या टीझरला कमेंट करून तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -