Friday, July 19, 2024
Homeमहत्वाची बातमीकोकणाला वेध ‘श्रावणोत्सवाचे’

कोकणाला वेध ‘श्रावणोत्सवाचे’

‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे…’

अनघा निकम-मगदूम

अर्थातच आल्हाददायी अशा श्रावण मासाला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्याची सुरुवात अर्थात रिमझिम पावसानं झाली नसली तरीही गेले महिनाभर पडत असलेल्या पावसामुळे कोकणामधलं वातावरण अतिशय आल्हाददायक झालं आहे. छोटी-छोटी फुलणारी फुलं, हिरवागार झालेला निसर्ग, दुथडी भरून वाहणाऱ्या छोट्या-मोठ्या नद्या, ओहोळ यामुळे कोकणातला परिसर अतिशय सुंदर झालाय. त्यातच पेरणी आणि लावणी ही सगळी शेतीची कामं आता जवळपास आटोक्यात आल्याने ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग सुद्धा आता थोडासा उसंत घेऊ लागलाय. याच कालावधीमध्ये आलेल्या श्रावण महिन्यामध्ये वेध लागले आहेत, ते त्या श्रावणोत्सवाचे! अर्थात गावागावातील छोट्या छोट्या मंदिरांमध्ये होणाऱ्या नाम गजराचे, नाम सप्ताहाचे! कोकणातल्या विशेषतः रत्नागिरीतल्या अनेक मंदिरामध्ये हीच परंपरा वर्षानुवर्षे दिसून येते. मे महिन्यातला आंबा काढणीचा हंगाम संपला की, शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची लगबग सुरू होते ती आपल्या गावातल्या छोट्या-छोट्या दळ्यांमध्ये भातशेती करायची. पेरणी, काढणी, लावणी या पद्धतीने मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या सोबतीन भात लावला जातो. पश्चिम महाराष्ट्रसारखा कोकणातला शेतकरी मोठ्या जमिनीचा मालक नसला तरीसुद्धा त्याच्या गावात, घराच्या मागे अशा आकाराने छोट्या असलेल्या शेतांमध्ये तो भात लावणी करतो आणि आपल्या वर्षभराच्या भारताची साठवणूक करत असतो. यानंतर वेध लागतात ते श्रावण महिन्यात येणाऱ्या श्रावण उत्सवाचे! या कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी कोकणात हरिनामाचा गजर केला जातो. कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये अनेक छोटी-मोठी मंदिरे डोंगर कुशीतून डोकावत असतात. देवदेवतांना स्मरण करणारा, देवदेवतांना मानणारा कोकणी वर्ग या श्रावण महिन्यामध्ये या भक्ती उत्सवामध्ये हरवून जातो.

श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारला सर्वाधिक महत्त्व असतं. अनेक गावांमध्ये या कालावधीत शंकराच्या मंदिरात एक आठवड्याचा नामसप्ताह साजरा केला जातो. या कालावधीमध्ये त्या देवाच्या कीर्तनाचा, भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. संपूर्ण गावांमध्ये भक्तिमय वातावरण असतं. गावाची स्वच्छता, सडा रांगोळी, मंदिराच्या सुशोभीकरण याबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. अनेक गावांमध्ये तर या कालावधीत व्यसनांवरसुद्धा बंदी ठेवली जाते. मांसाहार वर्ज्य केला जातो. असा हा आवडणारा श्रावण महिना आहे.

या धार्मिक उत्सवामुळे यानिमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामस्थ एकत्र येतात. शेती करून किंवा काम करून थकलेला, भागलेला शेतकरी, कोकणी माणूस या नाम सप्ताहामध्ये परमेश्वराच्या गजरामध्ये दंगून जातो. महाराष्ट्रमध्ये आषाढी एकादशीची मोठी परंपरा आहे, खूप मोठे महत्त्व आहे. राज्याच्या विविध भागांतील वारकरी, शेतकरी मोठ्या प्रमाणात या आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात; परंतु तशी खूप मोठी परंपरा कोकणामध्ये दिसून येत नाही. मोठ्या प्रमाणावर कोकणातून वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात, असं फारसं दिसून आलेलं नाही. अर्थात गेल्या काही वर्षांमध्ये वारीची प्रथा सुरू होते आहेच, पण तरीही कोकणात स्थानिक पातळीवर श्रावणात होणाऱ्या या उत्सवांना अधिक महत्त्व आहे. ही अनेक वर्षांची परंपरा आहे. यातूनच समाज एकत्र येतो, गावाचे एकीकरण अधिक मजबूत होते, हे यावरून दिसून आले आहे. त्यामुळे श्रावण हा महिना ग्राम सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा मानला जातो. आता याच परमेश्वराच्या कीर्तनात, भजनात कोकणी माणूस रंगून जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -