Tuesday, April 29, 2025

कोलाज

रिमझिम रेशीमधारा...!

रिमझिम रेशीमधारा...!

श्रावणातील पाऊस काहीसा आविष्कृत भासून जातो. कधी तो वातावरणात माणसाला तल्लीन करतो, तर कधी कवी मनं जागवतो. कधी चित्रांतून चितारतो, तर गाण्यांतूनही उमलतो...

प्रियानी पाटील

श्रावणात ओघळणाऱ्या पावसाच्या रिमझिम धारा... ऊन-पावसाची उघडिप... अळवावरच्या पानावर मोत्यासारखे चमकणारे बिंदू... रंगीत अळवारची नक्षी... आणि शेवाळी रंगाची अंगणं न्याहाळताना हे रूप म्हणजे निसर्गाच्या कोंदणातील अद्भुत आविष्कारच भासून जातो.

श्रावण म्हटला की, सात्त्विकतेचा सूर जुळतो. बेलाची पाने, गोकर्णाची फुले, स्वस्तिक, अनंत, मोगरा आणि नावीन्य म्हणून हळदीचे वर डोकावलेले तुरे... केळीच्या पानावरचा नैवेद्य सणांचं महत्त्व सांगून जातो. श्रावणातील भक्तीचा परिपाठ नकळतच लहान-थोरांना नतमस्तक करणारा ठरतो. श्रावणी सोमवारी भगवान शंकराची मंदिरं गजबजतात. प्रदक्षिणा धन्य ठरते. उपवास पावन होतो. केळीच्या पानावरच्या नैवेद्याने मन समाधान पावते. श्रावणातलं रूप रेखाटताना... पावसाच्या रिमझिम रेशीमधारांचे रूप नजरेत साठवताना सात्त्विकतेचा अंश जपला जातो. अनेक सणांची आरास मांडताना श्रावण मनात दाटून राहतो. सण, भक्तीच्या रूपाने महत्त्वाचा ठरतो. ग्रंथांची पारायणं या महिन्यात केली जातात.

पूजा-पाठ मांडण्यासाठी श्रावण उपयुक्त मानला जातो. श्रावणातील हळदीकुंकू, पारायणातून उलगडणारा भक्तीचा महिमा सात्त्विकतेला गवसणी घालतो. श्रावणात मांसाहार वर्ज्य केला जातो. इंद्रधनूच्या रंगांचे नजराणे आभाळी उलगडतात. तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या नजरा या सप्तरंगांचा वेध घेताना दिसतात. आभाळी उमटणारे हे सप्तरंग अद्भुत आविष्कार भासून जातो. रंगांची ही किमया आषाढ-श्रावणातील निसर्गाचं अविरत रूप मानलं जातं.

हिरवळीचं एक रूप रानावनांत अंगणात स्वच्छंदी वातावरण जागतं. सर्वत्र पसरलेली हिरवळ श्रावणातील रंगाची किमया जागवते. श्रावणातील रेशमी धारांची आगळीकता भावते मनाला. पावसाची उग्रता या वेळी तितकीशी दिसून येत नाही. संयमी, शांत पावसाचं रूप उन्हात उलगडतं.

श्रावण म्हटला की, संपूर्ण महिनाभर जो तो स्वत:ला एक शिस्त लावून घेतल्यासारखा वावरत असतो. ‘श्रावण आहे... आमचा श्रावण आहे...’ असे अनेकदा ऐकण्यात येते. श्रावण आहे म्हणजे मांसाहार वर्ज्य असतो, उपवास केले जातात. श्रावणातील पूजा-पाठ महत्त्वाचे ठरतात. सणांची आखणी केली जाते. प्रत्येक सणाला गोडधोड केले जाते. घरात सात्त्विकता पाळली जाते. महिनाभर शुद्धतेचा वास दरवळतो. मंदिरांतून अभिषेक केले जातात. गर्दीने मंदिरे फुलतात. फुलांचे नवे रंग, नवे गंध दरवळतात. झाडेदेखील फुलारून येतात. रानातदेखील हिरवळींचा आविष्कार लुभावतो मनाला. वेलींची बुट्टी आणि त्याला येणारी नाजुक फुलं निसर्गाला शोभा आणतात. ग्रंथ पारायणातून पौराणिक कथा, युद्ध, देवांचे अवतार, त्यांचा महिमा आदी वर्णनांतून पूजेचे महात्म्य जागवले जाते.

श्रावणातल्या रिमझिम सरी जाग आणतात मनाला. कवी मनं जागतात आणि जगतात देखील. कविता, गाण्यांतून श्रावणाचं अप्रतिम वर्णन केलेले आजवर आपण पाहिले आहे. कोसळणाऱ्या जलधारा... रिमझिम ओघळणारा पाऊस... ऊन-पावसाचा खेळ... लपंडाव... दाटलेली हिरवळ... शांतपणे येणारे पावसाचे ओघळ... श्रावणातील वर्णने अनेकदा काव्यांतून प्रतीत झालेली दिसून येतात. प्राजक्ताच्या फुलांची टपटप... अवखळ वाऱ्याचा वेग... आसमंती धुंद वातावरण... उन्हात पाऊस... पावसात ऊन... चमकणाऱ्या समुद्राच्या लाटांवरील कांतीही श्रावणात अनुभवण्याजोगीच!

काव्याचे आविष्कार श्रावणात जपले जातात. काव्याची अनुभूती श्रावणात दिसून येते. कवी संमेलने... पाऊस विशेष समारंभ... श्रावणातील गीते अनुभवताना पाऊस बरसतो. पण तो संयमाने...पाऊस जसा उग्र, तसा तो संयमीही असतो. याचं उत्तम उदाहरण खरं तर श्रावणात पाहायला मिळते. श्रावणात पावसाची उग्रता कुठेतरी लोप पावली जाते. रेशमी लडींनी तो ओघळतो. सात्त्विकतेच्या गंधाने दरवळतो. माणसाच्या अंतरी संयमी, शांततेचे प्रतीक जागवतो. रंगांच्या नजराण्यातून आयुष्यामध्ये रंग वेचायला शिकवतो. रेशमी धारांनी जीवनात ताजेपणा आणतो. श्रावणातील पाऊस काहीसा आविष्कृत भासून जातो. कधी तो वातावरणात माणसाला तल्लीन करतो, तर कधी कवीमनं जागवतो. कधी चित्रातून चितारतो, तर गाण्यातून उमलतो.श्रावणसरींची उग्रता दिसून येत नाही, हेच खरे. रेशमी धारांनी सुखावणारा पाऊस श्रावणात शांततेचा वसा जपतो, सात्त्विकतेचा गंध त्यातून निश्चितच दरवळून उठतो.

Comments
Add Comment