कप आणि बशी

  401

माधवी घारपुरे


माझा मोठा भाऊ ज्याचं नाव शाम होतं, पण आम्ही सगळी भावंडं त्याला ‘तात्या’ म्हणून हाक मारीत असू. जॅक ऑफ ऑल बट मास्टर ऑफ नन. एक्सेप्ट फोटोग्राफी, कारण तो त्याचा पोटाचा व्यवसायच होता. तबला, व्हायोलीन, माऊथ ऑर्गन वाजविणे, उत्तम नकलाकार, सुवाच्चच नाही, तर रेखीव हस्ताक्षर, वाचनाची आवड, सूक्ष्म निरीक्षण, प्रसंगावधानी विनोदी बोलणं... किती म्हणून त्याचे अंगभूत गुण सांगू?


कितीतरी विनोद खुबीने पेश करणं हा तर हातखंडाच!


असेच एक दिवस पाहुणे आले होते. घरचेच होते. दुपारचा चहा पित होतो. शैला वहिनीने ट्रेमधून चहा आणला. चारजणांना कपबशा होत्या. ३ कप तसेच सुटे आणले होते. काकू म्हणाली, ‘अगं, शैला बाकीच्या बशा कुठे आहेत?’ शैला वहिनी काही बोलण्यापूर्वीच (श्याम) तात्या म्हणाला, ‘आमच्याकडचे तीनही कप विधुर आहेत.’ क्षणभर कुणाला काही कळलं नाही. पण मग ट्यूब पेटली आणि सगळेजण हास्यरसांत दंग झाले.


‘श्यामचं बोलणं म्हणजे ना... मावशीनं शेरा मारला ही गोष्ट घडून गेली. पण एका क्षणात तात्यानं विधुर कप-बशीशिवाय आणि विधवा बशी कपाशिवाय’ हे नातं जोडून टाकलं. त्यांना पती-पत्नी, नवरा बायको बनवून टाकलं. खरंच कप-बशीची जोडी वाखाणण्यासारखी. संपूर्ण जगात कप-बशी अजरामर आणि प्रिय आहे. कप - तो कप म्हणजे पुरुष आणि बशी - ती बशी म्हणजे स्त्री.


सगळ्या गरम आणि उकळत्या गोष्टी या कपातच ओतल्या जातात. त्याच्या यातना त्यालाच सहन कराव्या लागतात. बाप नावाच्या पुरुषाला बाहेरच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. अनेक अडचणी, संताप, अपमान, अनेक गोष्टींनी तो गरम होतो. अविवेकी होतो. पण अशा वेळी त्याला आधाराला बशीच लागते. त्याच्या उकळतेपणाची झळ कोणाला लागू नये, यासाठी बशी तत्पर राहते. काही वेळा कोणत्याही अतिगोष्टीने मग आनंद असेल, उत्साह असेल, काठोकाठ भरून जातो आणि हिंदकळायला लागतो तेव्हा बशी धावत येते. या बशीशिवाय कपाला शोभा नाही आणि कपाशिवाय बशीला सौंदर्य नाही. या कप-बशीलाही त्याचं त्याचं अध्यात्म आहे.


गंमत अशी की, घरात कपात आपण चहा-कॉफी-दूध याशिवाय काही घालत नाही. पण बशीचे उपयोग अनेक आहेत. अशी स्त्री पुरुषाला सांभाळण्याबरोबर इतरही करत असते. कोणी आलं, गेलं, तर बशीत आपण खायला देऊ शकतो. काही चिरलं, तर बशीतही ठेवू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे काही वस्तूंवर झाकण म्हणूनही वेळप्रसंगी वापरतो. कारण दुसऱ्याच्या पतीच्या चुकांवर वेळीच झाकण घालण्याचं काम दुसरं कोण करणार?


इतिहासात अशा किती बशांनी कपाला आधार दिलाय. लवंडू, सांडू दिलं नाही. आइनस्टाइनला जेव्हा विचारलं, ‘तू २२-२२ तास काम कसं करू शकतोस?’ तेव्हा त्याने उत्तर दिलं, ‘ती मला वेळेवर जेवण देते. स्वत: स्वच्छ आनंदी राहते. मला स्वच्छ आनंदी ठेवते. माझ्या जीवनाची पान विखरू देत नाही, असा पेपरवेट आहे.’ ती आइन्स्टाइनची बशी होती. पुराणात कैकयीने युद्धात दशरथाच्या रथाचा कणा मोडल्यावर ती स्वत: खांदा देऊन कणा बनली. कर्मवीर भाऊराव पाटील याच्या बायकोने स्वत:चं मंगळसूत्र विकून नवऱ्याने उभारलेल्या वसतिगृहातील मुलांना जेवू घातलं आणि कर्मवीरांचे विस्कटलेलं मन सावरलं.


सुनीताबाईंनी स्वत: आरोप सहन करून भाईंचं (पु. लं.) लिखाण उजळेल, याकडे लक्ष दिलं. राष्ट्रप्रेमाने उसळलेल्या, उकळलेल्या मनांचे सावरकर, टिळक, आगरकर सारख्या लोकांना माई, सत्यभामाबाई, यशोदाबाई यांनी बशा होऊनच सांभाळलं. महादेवशास्त्री जोशी आणि सुधाताई जोशी, अवंतिकाबाई गोखले आणि श्री गोखले, शास्त्रज्ञ कमलाबाई सोहोनी आणि मिस्टर सोहनी ही माणसे मात्र पूर्णपणे कप-बशीचा आदर्श होणारी. एकमेकांच्या कार्यात आणि घरांत पूर्णपणे आपापलं सौंदर्य वाढविणारी म्हणूनच सुधाताई स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात गेल्यावर महादेव शास्त्रींनी आई होऊन प्रपंच सांभाळला. अशा कित्येक गोष्टी सांगता येतील. शेवटी एकच सत्य की, संसार स्त्री - पुरुषाचा असो वा कप - बशीचा. एकमेकांनी एकमेकांना सांभाळणे महत्त्वाचे. जसे की, सरकी तो कापूस असलेल्या बोंडाला धरून ठेवते. ती पाकळी असलेली, तो पराग असलेल्या, फुलाची शोभा वाढवते आणि ती ‘वात’ तो ‘दिवा’च नुसतं उजळत नाही, तर अख्खं देवघर उजळते.

Comments
Add Comment

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा

कंतारा चैप्टर १’मधून गुलशन देवय्या यांचा दमदार लूक प्रदर्शित

‘कंतारा चैप्टर १’ या चित्रपटातून गुलशन देवय्या यांचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. ते या चित्रपटामध्ये