नागपूर (हिं.स.) : सामान्य माणसाला मरण एकदा येते. मात्र आपल्या गुणांनी असामान्य काम करणाऱ्यांच्या स्मृती कायम स्मरणात राहतात. मो. रफी हे असेच असामान्य व्यक्ती. त्यामुळे कला गुणांवर प्रेम करणारा शेवटचा रसिक जोवर जिवंत आहे, तोवर मो. रफी यांना मरण नाही, असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी शनिवारी नागपुरात काढले.
मो. रफी फॅन्स कल्चरल ऑर्गनायझेशन आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित पद्मश्री मो. रफी सन्मान सोहळ्याचे. अभिनेते पिळगावकर आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी या दोघांचा नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याहस्ते पद्मश्री मो. रफी पुरस्काराने गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि ५० हजार रुपये रोख, असे या सन्मानाचे स्वरुप आहे. या सत्काराला उत्तर देताना पिळगावकर बोलत होते. व्यासपीठावर महालेखाकार प्रवीर कुमार, अभिनेते जयवंत वाडकर, वाघमारे मसाले समुहाचे संचालक प्रकाश वाघमारे, शिक्षक सहकारी बँकेचे संजय भेंडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजाभाऊ टाकसाळे, प्रगती पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविकातून भूमिका मांडताना मोहम्मद सलिम म्हणाले, कोरोनाच्या निर्बंधामुळे यापूर्वीचा सन्मान सोहळा घेता आला नाही. त्यामुळे दोन वर्षांचा सन्मान एकाच व्यासपीठावर होत आहे. मो. रफी सारख्या स्वच्छ, निर्मळ माणसाच्या आठवणी ताज्या रहाव्यात, इतकाच त्यामागचा मुख्य उद्देष आहे. गाणाऱ्यांचे आवाज पचनी पडत नाहीत, असा आजचा काळ असल्याचे नमूद करीत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले, कलाप्रिय शहर म्हणून नागपूरची महाराष्ट्रात ओळख आहे. त्यामुळे पिळगावकर आणि मोहन जोशी या दोघांना मिळालेला मो. रफी हा सन्मान म्हणजे राज्यात या दोघांचे सांस्कृतिक क्षेत्रातील मोल द्विगुणीत करणारा क्षण आहे.
त्यानंतर सत्काराला उत्तर देताना पिळगावर यांनी मो. रफी यांच्या आठवणींना उजाळा दिला. शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाहीत, असे बहुमोल क्षण मला त्यांच्या सहवासात घालविता आले. हे धन माझ्यासाठी आयुष्यात अनमोल आहे. कलाकाराचे आयुष्य हे कलेपेक्षा वेगळे असते. त्यामुळे कलावंतासोबत माणूस म्हणून स्वतःला सिद्ध करता आले पाहिजे. मो. रफी यांच्यात हा सच्चा माणूस होता. जन्माला येणारा सामान्य माणूस हा शरिराने एकदा मरतो. पण मो. रफी यांच्यासारख्या असामान्य माणसांना दोन वेळा हे भाग्य लाभते. कलेच्या बाबतीतच सांगायचे झाले तर जोवर त्यांच्या गळ्यावर प्रेम करणारा शेवटचा रसिक जीवंत असेल, तोवर मो. रफी यांना मरण नाही, हीच खरी त्यांना सुरसुमनांजली आहे.