पुणे (हिं.स.) : डीएचएफएल घोटाळ्यात सहभागाचा आरोप असलेले उद्योगपती अविनाश भोसले यांच्या मालकीचे हेलिकॉप्टर शनिवारी सीबीआयने जप्त केले. येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यात अविनाश भोसलेंना २६ मे २०२२ रोजी अटक करण्यात आली होती.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील १७ बँकांच्या कन्सोर्टियमला ३४ हजार ६१५ कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या डीएचएफएलच्या घोटाळ्यात त्याचा सहभाग असल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आहे. त्यांचे ऑगस्टा वेस्टलँडचे हेलिकॉप्टर आज सीबीआयकडून जप्त करण्यात आले. गेल्या २६ मे रोजी भोसलेंना अटक केल्यानंतर १० दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता त्यांचे खासगी हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे.
भोसले यांच्या घरावर एप्रिल महिन्यातच सीबीआयने छापे घातले होते. तर मागील वर्षी “सीबीआय’ने त्यांची तब्बल ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास “सीबीआय’कडून सुरु आहे. त्यांनी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे.दरम्यान, याच बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, “सीबीआय’कडून भोसले यांचा तपास सुरु होता. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिल महिन्यात सीबीआयने छापे टाकून मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती.