Monday, July 1, 2024
Homeमहत्वाची बातमीपर्यटक आणि प्रदूषणामुळे हिमालय देवभूमी त्रस्त

पर्यटक आणि प्रदूषणामुळे हिमालय देवभूमी त्रस्त

मधुरा कुलकर्णी

हिमालयाच्या कुशीत अनेक धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळं आहेत. हिमालयातलं सौंदर्य देशभरातल्या पर्यटकांना आपल्याकडे खेचून आणतं; परंतु वाढते पर्यटक आणि त्यांनी निर्माण केलेला कचरा हिमालयाला असुरक्षित बनवत आहे. वारंवार होणाऱ्या भूस्खलनालाही पर्यटकांची वाढती संख्याच कारणीभूत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. ही समस्या किती गंभीर आहे?, ती कशी दूर करता येणार?

हिमालयाच्या दुर्गम भागात अमरनाथ यात्रेचं आयोजन भारताची क्षमता आणि इच्छा दर्शवतं. या धोकादायक भूप्रदेशाची जाणीव यात्रेकरूंना करून देण्यासाठी आणि त्या उंचीवर चढण्यासाठी चांगल्या आरोग्याची गरज असूनही यात्रेकरूंची संख्या दर वर्षी वाढत आहे. यातून यात्रा सुरक्षित करण्यासाठी सरकारचे वाढते प्रयत्न तर दिसून येतातच; शिवाय सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या सुविधांबाबत लोकांचा विश्वासही दिसून येतो; पण यात्रेकरूंच्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर हिमालय असुरक्षित बनला आहे का, असा प्रश्न पर्यावरणतज्ज्ञांना पडला आहे. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुरामुळे किमान १६ जणांचा मृत्यू झाला, तर जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या १५ हजार यात्रेकरूंना सखल भागात असलेल्या पंजतरणी छावण्यांमध्ये हलवण्यात आलं. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी भागात पर्यटक आले नव्हते. पर्यटन व्यवसाय अडचणीत आला होता. कोरोनातून सावरत असताना आता पर्यटक दोन वर्षांचा बॅकलॉग भरून काढत आहेत, असं एकंदर चित्र आहे. अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी झालेल्या भाविकांच्या संख्येवरून आणि हिमाचल प्रदेशातल्या हॉटेलमधल्या रुम्सच्या आरक्षणावरून हे स्पष्ट झालं आहे.

३ हजार ८८० मीटर उंचीवर वसलेल्या अमरनाथच्या पवित्र गुहेचा ४३ दिवसांचा प्रवास ३० जूनपासून दोन मार्गांनी सुरू झाला. ४८ किलोमीटरचा पहिला मार्ग दक्षिण काश्मीरच्या पहलगाममध्ये आहे, तर दुसरा सुमारे ३४ किलोमीटरचा मार्ग मध्य काश्मीरमधल्या गंदरबलमधल्या बालटालमार्गे जातो. केंद्र सरकारने सांगितलं की, यंदाची अमरनाथ यात्रा ऐतिहासिक आणि आतापर्यंतची सर्वात मोठी असेल. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद यांनी सांगितलं की, यंदा सुमारे ७-८ लाख यात्रेकरू भेट देतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी, केंद्र सरकारने यात्रामार्गांवर पोलीस आणि लष्कराव्यतिरिक्त केंद्रीय राखीव दलाचे आणि इतर केंद्रीय दलांचे ४० हजारांहून अधिक जवान तैनात केले आहेत. यादरम्यान यूएव्हीद्वारे पाळत ठेवण्याबरोबरच, ड्रोन हल्ला रोखण्यासाठी काऊंटर-ड्रोन यंत्रणादेखील तैनात केली जाते. २०१२ च्या सरकारी आकडेवारीनुसार, २००९ मध्ये अमरनाथ यात्रींची संख्या सुमारे चार लाख होती. २०१२ मध्ये वाढून ती ६.२१ लाख झाली.

तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यसभेत यात्रेदरम्यान होणारी जीवितहानी वाढत असल्याचं सांगितलं होतं. २००९ मध्ये मृत्यूंची संख्या ४५ होती. २०१० मध्ये ती ७७ झाली, तर २०११ मध्ये १०६ पर्यंत वाढली. मात्र २०१२ मध्ये ही संख्या ९३ पर्यंत खाली आली. तरीही २००९ मध्ये मृतांची संख्या दुप्पट होती. २०१३ मध्ये अमरनाथला जाणाऱ्या रस्त्यावर २१४ अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. पण त्यानंतर असे मृत्यू कमी होत गेले आणि संख्या २५ ते ५० च्या दरम्यान होती. सर्वात वाईट दुर्घटना १९९६ मध्ये घडली. तेव्हा खराब हवामानामुळे २५० हून अधिक यात्रेकरू मरण पावले. या दुर्घटनेनंतर सरकारने एक समिती स्थापन केली. ३० दिवसांमध्ये अमरनाथला भेट देणाऱ्या एकूण लोकांची संख्या एक लाखांपर्यंत मर्यादित ठेवण्याची शिफारस केली होती. दररोज ३,४०० पेक्षा जास्त भाविकांना जाण्याची परवानगी नाही; परंतु त्यापेक्षा जास्त भाविक अमरनाथ यात्रेला येतात. त्यामुळे दुर्घटना वाढतात.

जम्मू-काश्मीरमधल्या अशांततेमुळे जुलै २०१६ मध्ये अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. यंदा बद्रीनाथ यात्रेला जाणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते यात्रेकरूंची जास्त संख्या हे मृत्यूच्या मोठ्या संख्येमागील मुख्य कारण असू शकतं. उत्तराखंड पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार दररोज सुमारे ५५ ते ५८ हजार यात्रेकरू चारधाम तीर्थक्षेत्री पोहोचत आहेत. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत सुमारे १५ हजाराने जास्त आहे. चारधाम यात्रेत यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट दिली जाते. ही ठिकाणं हिमालयात आहेत. या प्रवासामुळे प्लास्टिक आणि इतर कचरा साचत असल्याची चिंता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. हिमालयीन प्रदेशात संशोधन करणाऱ्या गढवाल केंद्रीय विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख एम. एस. नेगी यांच्या मते केदारनाथमधला वाढता कचरा धोकादायक आहे. अमरनाथ यात्रा हंगामादरम्यान महानगरपालिकेच्या घनकचरा निर्मितीवरील अभ्यासात नमूद केलं आहे की, पहलगाममधली हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स एकूण कचऱ्यांपैकी ७४ टक्के कचरा निर्माण करतात. त्यामुळे यंदा आठशे ते एक हजार टन कचरा निर्माण होण्याचा अंदाज आहे. यात्रा सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत चारधाम रस्त्यावर यात्रेकरूंनी कचऱ्यांचे ढीग निर्माण केले आहेत. त्याच्या पर्यावरणीय परिणामांबाबत विविध विभाग चिंतेत आहेत.

या वर्षी यात्रेच्या सुरुवातीपासूनच आठ लाखांहून अधिक भाविक चारधामवर पोहोचले आहेत. सुमारे १० लाख लोक येणं बाकी आहे. पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक धोरण राबवणाऱ्या काठमांडूच्या ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटन डेव्हलपमेंट’चे महासंचालक डेव्हिड मोल्डन म्हणतात, नीती आणि नियम बनवण्यात सरकारची महत्त्वाची भूमिका असते. या नाजूक पर्यावरणातल्या पर्यटकांच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, शाश्वत ‘इको-टुरिझम’ तसंच स्थानिक व्यवसायाला चालना देण्यासाठी स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर धोरण तयार करण्याची गरज आहे. जम्मू विद्यापीठातल्या भूगोल विभागाचे माजी प्राध्यापक एम. एन. कौल म्हणतात की, या विषयावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून अधिक अभ्यास आवश्यक आहे. अमरनाथ इथल्या बर्फाच्या लिंगाच्या आकारात बदल होण्याला ‘लिंगम’कडे जाणाऱ्या जलमार्गातील बदल कारणीभूत असू शकतो. यात्रेकरूंच्या वाहतुकीव्यतिरिक्त, पर्वत मोहिमांमुळे हिमनद्यांचा, पर्यायाने पर्यावरणाचा र्हास होतो.

जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन वाढल्याने चारधाम यात्रेत केदारनाथच्या मार्गावर प्लास्टिक कचरा आणि त्याचे ढीग दिसू लागले आहेत. ‘हायर प्लांट हिमालयन रिसर्च इन्स्टिट्यूट’ (एचएपीआरईसी)चे संचालक प्रोफेसर एम. सी. नौटियाल म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून लोकांची केदारनाथकडे ये-जा वाढली आहे. त्याचबरोबर कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे केदारनाथ परिसरातल्या मौल्यवान वनौषधी नष्ट होत आहेत. जटामासी, आतिश, बरमाळा, काकोळी यासह काही प्रमुख औषधी वनस्पती नामशेष झाल्या आहेत. हे सर्व तीव्र हवामान बदलामुळे होत आहे. या प्रदेशात मानवी हस्तक्षेप वाढत आहे. जम्मू-काश्मीर सरकारने अमरनाथ यात्रेदरम्यान कचरा साफ करण्यासाठी इंदूर आयआयटीच्या ‘स्वाह’ या स्टार्टअपशी हातमिळवणी केली आहे. अहवालानुसार, या प्रवासादरम्यान एक हजार टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण होत असल्याचा अंदाज आहे. याबाबत तज्ज्ञ चिंतेत आहेत. ताज्या स्वच्छता अभियानात इंदूरमधल्या सुमारे ३५० लोकांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवला. अमरनाथ यात्रेदरम्यान प्लास्टिक आणि डिस्पोजेबल साहित्याचा वापर न करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. ‘स्वाहा’ने शून्य ‘लँडफिल इव्हेंट’ सादर केला आहे. या अंतर्गत इथे निर्माण होणारा सर्व कचरा पारंपरिक पद्धतीनं जमिनीखाली टाकण्याऐवजी पुनर्वापर केला जाणार आहे. त्यातून सेंद्रिय खतंही बनवली जाणार असून ती प्रवाशांना भेट म्हणून दिली जाणार आहेत.

‘स्वाह’च्या स्वयंसेवकांनी कचरा व्यवस्थापन यंत्रं आणि उपकरणं बसवण्यास सुरुवात केली आहे. तसंच शिबिरं, लंगर, दुकानं आणि इतर उपक्रमांमधून निर्माण होणारा कचरा गोळा करण्यासाठी ‘स्वाह’ची टीम यात्रेच्या समाप्तीपर्यंत म्हणजेच ११ ऑगस्टपर्यंत तैनात असेल. जम्मू-काश्मीरच्या ग्रामीण विकास विभागानेही कचरामुक्त तीर्थयात्रा मोहीम सुरू केली आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’च्या धर्तीवर या मोहिमेचं आयोजन करण्यात येत आहे. धार्मिक यात्रेत ‘शून्य कचरा’ कार्यक्रम बनवण्याचं काम देशात प्रथमच होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -