Share

स्वाती पेशवे

बहरलेला निसर्ग, पावसाच्या आगमनामुळे उल्हसित झालेल्या वृत्ती, सणांच्या तयारीमध्ये बुडून जाणारे दिवस या सगळ्याला चातुर्मासची जोड मिळते आणि जणू हे कोंदण या दिवसांना अध्यात्मिकतेची डूब देऊन जातं. पौराणिक कथांचं वाचन, साधे-सोपे संकल्प सोडणं, नियमांचं पालन, व्रतवैकल्य, उपवास आदी मार्गाने हा मास वृत्ती शुद्ध करण्याचं काम करतो. थोडक्यात हे आजच्या काळातले डिटॉक्स करणारे दिवस आहेत!

आपली संस्कृती विविधांगी आहे. अनेक सण-उत्सव, त्यांचं साजरीकरण आणि त्यानिमित्तानं पुढील पिढीवर होणारे संस्कार हा त्याचा गाभा आहे. पूर्वीची सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचण्याची अत्यंत मर्यादित साधनं आणि संदेश पोहोचवण्यातली क्लिष्टता लक्षात घेता कथा-कीर्तनांच्या माध्यमातून संस्कारित करणं आणि प्रबोधनाचं काम हाती घेणं अधिक श्रेयस्कर असे. त्याचबरोबर कथांच्या माध्यमातून रंजकतेनं सांगितलेली प्रत्येक गोष्ट अधिक नेमकेपणाने आणि थेट लोकांपर्यंत पोहोचते हेदेखील तेव्हाचे सुज्ञ विचारवंत जाणून होते. म्हणूनच विज्ञानविषयक, निसर्गविषयक, समाजकार्यविषयक, कुटुंबविषयक, संचयविषयक आदी प्रकारचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं हे साधन अनेकांनी वापरलं आणि त्या माध्यमातून समाजाला आकार देण्याचा, सृजन आणि सर्जनाच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला. आजही सणांचं आणि विशेष दिवसांचं, काळाचं महत्त्व अबाधित राखून आपण ती चौकट पाळतो आहोत.

चातुर्मास्यारंभ ही अशीच एक पर्वणी आहे. हा काळ एक प्रसन्नता घेऊन येतो. आत्ताही आपण ही प्रसन्नता अनुभवत आहोत. या दिवसांमध्ये पाऊस स्थिरावलेला असतो. ढगातून बरसणारं अमृत प्राशन करून वृक्षवल्ली सुखावलेल्या, मोहरलेल्या असतात. शेताशिवारांमध्ये बीजांची रुजवण झालेली असते. पुढच्या कामांची लगबगही सुरू असते. सर्जनाचं हे पर्व अनुभवत असतानाच, सृष्टीचं दर दिवशी अधिकाधिक मोहक होत जाणारं रूप अनुभवताना वेगळाच आनंद मिळत असतो. पण त्याच वेळी बदलत्या ऋतूमध्ये आरोग्याचं रक्षण करण्याचा विचारही असतो. पचनशक्ती कमकूवत असण्याच्या या काळात तोंडावर ताबा ठेवणंही आत्यंतिक गरजेचं असतं. हे सर्व साधायचं तर केवळ उपदेश करुन उपयोग नाही; त्याला व्रत-वैकल्यांची जोड आणि आध्यात्मिक विचारांची बैठक देणं गरजेचं ठरतं. मागच्या पिढीतल्या लोकांनी हेच भान ठेवलं आणि संपूर्ण चातुर्मासाला अध्यात्माचं अधिष्ठान देऊ केलं. पूजापाठ, एक वेळ जेवणाचा नियम पाळणं, दैनंदिन कर्मकांड, कहाण्यांचं वाचन यात जनांना गुंतवून ठेवलं. त्यामुळेच आजच्या काळात याचा जबरदस्त पगडा दिसून येतो. मांसाहार वर्ज्य करणं, मद्यपान टाळणं, कांदा-लसणाचे पदार्थ वर्ज्य करणं हे नियम आजही न सांगता पाळले जातात. नकळत संस्कारांचा धाक जाणवतो आणि आपसूकच सन्मार्गाच्या दिशेनं मार्गक्रमणा सुरू होते. म्हणूनच काळ पुढे सरकला असला तरी चातुर्मासाचं महत्त्व अबाधित आहे.

आषाढी एकादशीला शयनी एकादशी असं म्हटलं जातं. कारण या दिवसापासून भगवान विष्णूंचा शयनवास सुरू होतो. तो चार महिन्यांचा असतो. यालाच चातुर्मास असं म्हणतात. या काळात विविध मठ, मंदिरांमध्ये नित्य पुराण श्रवण, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या चार महिन्यांमध्ये आचार-विचारांचं पालन केल्यास माणसाला उत्तम आरोग्य प्राप्त होतं. शिवाय त्याची प्रगती होते. ज्ञानप्राप्ती होते आणि संयम, त्याग या गोष्टीही शिकायला मिळतात. या काळात देवधर्मापासून रोजच्या दैनंदिन आयुष्यातले व्यावहारिक नियमही पाळले जातात. यात रोज एखाद्या देवळात जाऊन देवदर्शन घेणं, प्रदक्षिणा घालणं या नियमाचाही समावेश असतो. हा रोजचा नियम ठरवून पालन केल्यास देवदर्शनासोबत व्यायामही होतो.

या काळात सामूहिक उपासनेलाही मोठं महत्त्व आहे. त्यामध्ये एकत्र येऊन नामजपासारखी साधी-सोपी उपासना करता येईल. या काळात अनेकजण रोज एक हजार, पाच हजार, दहा हजार ते एक लाखापर्यंत जपाचा संकल्प सोडतात. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीही इच्छा असल्यास आपला व्याप सांभाळून जप करू शकतात. आपल्या उपास्य दैवताचा जप केल्याने आत्मीक समाधान मिळतं, ताणतणाव दूर होतात आणि उद्भवणाऱ्या व्याधींपासूनही दूर राहता येतं. दोन अक्षरी, तीन अक्षरी, पाच अक्षरी, षडाक्षरी वा त्याहून अधिक अक्षरं असणाऱ्या मंत्रांपैकी आपल्याला जमेल त्या एका मंत्राचा जप करावा. हल्ली हाताच्या बोटात सहज बसणारी, जपसंख्या मोजणारी मशिन्सही उपलब्ध आहेत. त्याद्वारे चालताना, प्रवासात जप करणं सहजशक्य होतं. अर्थात, जप किती झाला यापेक्षा तो किती आत्मीयतेनं केला याला महत्त्व असतं. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही निती-नियमांशिवाय करता येण्याजोगी ही सोपी साधना आहे.

चातुर्मासाच्या कालावधीत भगवान श्री विष्णूंची उपासना महत्त्वाची ठरते.

‘शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं|
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम|
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्रानगम्यं|
वंदे विष्णुभवभयहरं सर्व लोकैकनाथम॥

या स्तोत्राद्वारे श्री विष्णूंना मनोभावे वंदन करावं. चातुर्मासाच्या काळात ‘ओम नमो नारायण’ किंवा ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा. नियमित विष्णू सहस्त्रनाम म्हणणंही फलदायी ठरतं. याशिवाय या काळात आणखीही काही संकल्प महत्त्वाचे ठरतात. चातुर्मासात सकाळी सूर्योदयापूर्वी उठावं आणि स्नान करून देवपूजा, जपजाप, स्तवन, वाचन आदी करावं. रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तीसमोर वा फोटोसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. घरासमोर वा छतावर पशू-पक्ष्यांसाठी पाणी तसंच चार्याची व्यवस्था करावी. गरीब, असहाय्य लोकांना यथाशक्ती दान द्यावं. या दिवसात विविध प्रकारच्या उपवासांचाही नियम केला जातो. अनेकजण एकभुक्त राहण्याचा म्हणजे दिवसातून केवळ एकदा जेवण्याचा संकल्प सोडतात. वैज्ञानिक दृष्टीनंही हे उपयुक्त ठरतं. या दिवसात जड पदार्थ पचत नाहीत. साहजिक पचनाच्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात आहार मर्यादित असणं गरजेचं ठरतं. या काळात दिवसाआड उपवासाचाही संकल्प केला जातो. म्हणजे एक दिवस उपवास आणि एक दिवस जेवण अशी पद्धत आचरणात आणली जाते. याशिवाय चार महिने एकाच प्रकारचं अन्न खाण्याचा नियमही आचरणात आणला जातो.

या काळात एखाद्या वस्तूचा त्याग करण्याचाही संकल्प अमलात आणता येतो. या काळात काही लोक नखं तसंच केस काढत नाहीत. या काळातल्या विविध उपायांची फलप्राप्तीही शास्त्रात वर्णन करण्यात आली आहे. त्यानुसार स्तुतीपाठ करत विष्णूला १०० प्रदक्षिणा घालणाऱ्यास सुखप्राप्ती होते. अशाच स्वरूपाची अन्य फलंही प्राप्त होतात. चातुर्मासात मौनव्रत धारण करण्यालाही वेगळं महत्त्व आहे. हा काळ आत्मपरीक्षणाचा, झालेल्या चुकांबाबत विचार करण्याचा आणि परिमार्जनाचा असतो. त्यासाठी मौनव्रत धारण करणं महत्त्वाचं ठरतं. याद्वारे होणाऱ्या आत्मपरीक्षणातून स्वत:मधले दुर्गुण नाहीसे होऊन सद्गुण वाढीस लागण्यास मदत होते. त्याचबरोबर उर्वरित आयुष्यात कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याचा संकल्प केला जातो. चातुर्मासातल्या उपासनेमुळे माणसात अंतर्बाह्य बदल होण्यास मदत होते. या काळात मनात चांगले विचार आणावेत, कोणाविषयी असूया, शत्रुत्व धरू नये, असं सांगण्यात आलं आहे. अशा पद्धतीने चातुर्मासात विविध नियमांच्या पालनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वात बदल होतो. कष्ट करण्याची आणि शिस्तीची सवय लागते. आत्मविश्वास वाढून प्रगती होते. चातुर्मासात कोणत्याही नियमाचं पालन करण्याचं ठरवल्यास तसा संकल्प सोडला जातो. त्यानुसार भगवान श्री विष्णूला प्रार्थना केली जाते आणि ‘वार्षिक चातुर्मास्यात प्रबोधिनी एकादशीपर्यंत मी हा संकल्प करत आहे. तो निर्विघ्न पार पाडण्यासाठी शक्ती द्यावी, तसंच आपली कृपादृष्टी मजवर राहावी’ अशी प्रार्थना श्री विष्णूकडे केली जाते.

असं असलं तरी बदलत्या काळाचा विचार करून चातुर्मासात काही नवे संकल्पही केले जाऊ शकतात. त्यानुसार वृक्षसंवर्धन, वृद्धाश्रमातल्या वृद्धांची सेवा, अनाथांना मदत, रक्तदान अशा काही संकल्पांबाबतही अवश्य विचार व्हायला हवा. याशिवाय विविध अन्नछत्रांसाठी यथाशक्ती अन्नदान करता येऊ शकतं. गरजूंना योग्य आर्थिक मदत, अनाथांचं दत्तक पालकत्व स्वीकारणं असेही मार्ग पुण्यप्रद ठरणारे आहेत. जैन धर्मातही चातुर्मासाचं मोठं महत्त्व आहे. या काळात जैनधर्मियांकडून विविध धार्मिक उत्सवांचं आयोजन केलं जातं. आचार्यांद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केलं जातं. एकंदरीत, या काळात सर्वत्र धार्मिकतेचं वातावरण पाहायला मिळतं. त्याद्वारे अाध्यात्मिक सुखाचा आनंद घेता येतो.

Recent Posts

Prakash Bhende : कलाविश्वात शोककळा! प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते, अभिनेते प्रकाश भेंडे यांनी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून (Marathi) दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश…

15 minutes ago

‘पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातलगांना ५० लाखांची मदत देणार’

मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख…

35 minutes ago

पॉवरफुल कलाकारांची लवकरच ‘आतली बातमी फुटणार’

मुंबई : प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनासाठी चटपटीत मसालेदार कंटेन्ट हवा असतो. या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी सगळ्याच…

44 minutes ago

Jammu Kashmir Tourism : पर्यटकांनो ‘इथे’ फिरण्याचे नियोजन असेल तर आजच रद्द करा!

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये…

59 minutes ago

पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला करणारा पाकिस्तानच्या लष्करात होता SSG कमांडो

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन…

1 hour ago

Blouse Bow-Note Designs : ब्लाऊजसाठी ‘या’ बॅक बो-नॉट डिझाइन्स नक्की ट्राय करा!

महिलांना किंवा मुलींना ब्लाऊजचे नवीन नवीन पॅटर्न शिवण्याची खूप आवड असते. कोणत्याही समारंभात साडी नवीन…

1 hour ago