संजय भुवड
महाड : सावित्री नदी पात्रात केमिकलयुक्त सांडपाणी सोडले गेल्याने पात्राचे पाणी प्रदूषित झाले आहे. येथील महाड एमआयडीसीमधील कारखानदारांकडून रसायनमिश्रीत पाणी नदी पात्रामध्ये सोडण्यात येत आहे. याकडे मात्र प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
महाड एमआयडीसीतील कारखानदारांकडून केमिकलमिश्रीत सांडपाणी नाल्यावाटे नदीत सोडले गेल्याने काळ, सावित्री व गांधारी नद्यांमधील पाणी प्रदूषित झाले आहे. याचा फटका नदीतील माश्यांवर होत असल्याने येथील नदीपात्रामध्ये बारा महिने मासेमारी करून आपली उपजिविका चालवणाऱ्या आदिवासी व भोई समाजाचा रोजगार बुडाला आहे, तर गेल्या ८ दिवसात भोई घाट परिसरातील पाणी प्रदूषित झाल्याने पावसळ्यातील होणारा रोजगारही बुडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने भोई समाज बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महाड शहरातील भोई घाट परिसरात पावसाळ्यातील ३ ते ४ महिने भोई बांधव मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह चालवित असतात. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवदेखील सावित्री, गांधारी, काळ नदीत मोठ्या प्रमाणात मासेमारी करून आपली रोजीरोटी चालवितात. या वर्षी नदीच्या पाण्याची पातळी कमी असल्याने मच्छीमारांचा धंदा तेजीत सुरू आहे. मात्र गेल्या ७ ते ८ दिवसांपासून सावित्री नदीतील दादली पूल ते भोई घाट परिसरातील पाण्याला दुर्गंधी सुटली असून हे पाणी लालसर झाले आहे.
दर वर्षी पहिल्या पावसाचा फायदा घेऊन महाड एमआयडीसीतील काही कारखानदार आपल्या कंपनीत साठवून ठेवलेले केमिकलयुक्त सांडपाणी टेमघर नाल्यावाटे नदी पात्रात सोडून देत असतात. त्यानंतर दर वर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्याचा फायदा घेत काही कारखानदार आपल्या कंपनी आवारात साठवून ठेवलेली गटारगंगा या पाण्यात फेकून आपले काळे धंदे लपवीत असतात. या वर्षी नद्यांना मोठा प्रमाणात पूर आला नसल्याने कंपनीत साठवून ठेवलेले सांडपाणी बाहेर फेकणे ज्यांना शक्य झाले नाही, ते कारखानदार रात्रीच्या अंधारात सदर केमिकलयुक्त सांडपाणी नाल्यावाटे नदीत सोडत असल्याने सावित्री नदीतील पाणी प्रदूषित झाले आहे. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क साधला असता, सदर कंपनीचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मात्र दर वर्षी पावसाच्या सुरुवातीस व पुराच्या पाण्याचा फायदा घेत आपले काळे कृत्य लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारखानदारांकडे प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष होत असून अशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.