देवाचे स्मरण हे सर्वात मोठे सत्कर्म आहे, सर्वात मोठी उपासना आहे. म्हणून हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. असे म्हणून काही होते का, असे म्हणणारे लोक आहेत. अरे पण हे कोण सांगतो आहे ते बघ. संत जे सांगतात त्यामागे ते ज्ञान देतात. “गुरू तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्न. वटी सद्गुरूशिवाय तरुणोपाय नाही हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत असेच चालायचे. देवाबद्दलचे ज्ञान हे सर्व अहंकाराचा नाश करते, विकारांना जन्म देत नाही व जीवनात सुख-समाधान निर्माण करते. पैसा, प्रतिष्ठा हे सर्व कशासाठी पाहिजे? पैसा मिळाला की सुख-शांती-समाधान मिळते हे खरे आहे का? लोकांना सुख देण्याचा जे प्रयत्न करतील तेच सुखी होतील. मानवजात दुःखी का हा विषय पाहता जीवनविद्या ही काळाची गरज का आहे हे तुमच्या ध्यानांत येईल. हे जीवनविद्येचे तत्त्वज्ञान लोकांनी आत्मसात करावे. आपला संसार, प्रपंच सर्वार्थाने सुखी करावा हा जीवनविद्येचा उद्देश आहे. करावा ह्या शब्दाला underline करा. तो आपोआप होत नाही तर करावा लागतो. परमेश्वराकडे दुर्लक्ष करणे हे आम्हाला मान्य नाही. मनाकडे दुर्लक्ष करणे हेही आम्हाला मान्य नाही. जगापासून परमेश्वरापर्यंत सर्वांकडे लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. परमेश्वराला रिटायर्ड करण्यापेक्षा तुम्ही त्याला समजून घ्या. परमेश्वराला रिटायर्ड करणारे तुम्ही कोण? तोच तुम्हाला एक दिवस रिटायर्ड करील. परमेश्वराला रिटायर्ड करण्यापेक्षा परमेश्वराला समजून घेणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. परमेश्वर किती महत्त्वाचा आहे तर बाकीच्या सर्व गोष्टींचे मूळ परमेश्वर आहे. दुसऱ्या भाषेत बोलायचे तर परमेश्वर हा सर्वांचाच पाया आहे. पाया किती महत्त्वाचा आहे? पाया इतका महत्त्वाचा आहे की त्यावर संपूर्ण इमारत उभी राहाते. पाया डळमळीत झाला तर इमारत डळमळते. पाया मजबूत पाहिजे म्हणजे काय तर परमेश्वर मजबूत आहेच पण परमेश्वराबद्दलचे अज्ञान गेले पाहिजे व ज्ञान प्रस्थापित झाले पाहिजे म्हणजे पाया मजबूत झाला. परमेश्वराबद्दल उत्तम ज्ञान झाले पाहिजे. परमेश्वराबद्दल सर्वच ज्ञान होणार नाही कारण तो अपार आहे, अपरंपार आहे, असीम आहे, अनंत आहे. त्याचा थांगपत्ता अद्यापी कुणाला लागलेला नाही, यापुढे कुणाला लागणार नाही. पण परमेश्वराबद्दलचे जितके ज्ञान आपल्याला मिळत जाईल व आपण मिळवत जाऊ तितके आपण सुखी होऊ. कर्मकांडे करून काही होणार नाही हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. लोकांना वाईट वाटते, रागही येतो पण लोकांना काय वाटते ह्यापेक्षा त्यांच्या भल्याचे काय हे त्यांनी लक्षांत घेतले पाहिजे. कर्म चांगले केले तरच आपले जीवन सुखी होईल, पूर्णपणे सुखी होईल यासाठी परमेश्वर काय आहे हे मुळात समजले पाहिजे.
– सदगुरू वामनराव पै