मेधा इनामदार
आता लग्न हा सार्वजनिक किंवा कौटुंबिक नव्हे वैयक्तिक प्रश्न झालाय. माझं लग्न कुणाशी, कधी आणि कसं करायचं हे मला ठरवू दे, असं आजच्या मुलांना वाटतं आणि तसं ते सांगतातही. अर्थात लग्नाच्या नात्यातला गोडवा टिकवण्यासाठी गरज असते ती केवळ एकमेकांना समजून घेण्याची. ते होतं तिथपर्यंत लग्न आणि लग्नसंस्था अबाधित रहाणार आहे. काळानुरूप बदल होत राहतील. पण लग्नसंस्था सामाजिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत राहील.
बदलत्या काळाचा स्पर्श जसा जगाच्या कानाकोपऱ्याला झालाय तसाच तो समाजमनालाही झालाय. गेल्या काही काळात, तर बदलांचं हे वारं खूप वेगाने आलं आणि अनेक संकल्पना व परंपरा बदलल्या. एकेकाळी लग्न हा एक सामाजिक इव्हेंट होता. देवब्राह्मण आणि आप्तेष्टांबरोबर साजरा करायचा आणि आयुष्यभर पाळायाचा तो एक विधिसंमत सोहळा होता. लग्न वेळच्या वेळी झालं पाहिजे आणि ते यशस्वीच झालं पाहिजे आणि त्यासाठी दोघांनी, विशेषत: स्त्रियांनी सर्व प्रकारच्या तडजोडी केल्या पाहिजेत, असे मानणाऱ्या तसेच जगणाऱ्या पिढ्यांचा काळ अजूनही संपलेला नाही. मुलं म्हणजे आपली म्हातारपणाचा आधार आहे आणि त्यासाठी आपण म्हणू तसेच त्यांनी वागलं पाहिजे, असं म्हणणारी आणि तसाच अट्टहास करणारी पिढीही आपण पाहतो आहोत आणि तरीही गेल्या काही वर्षांमध्ये लग्न या मूळ संकल्पनेतच घडत असलेला बदलही आपण अनुभवत आहोत. आता लग्न हा सार्वजनिक किंवा कौटुंबिक सोहळा नसून ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न झालाय. माझं लग्न कुणाशी, कधी आणि कसं करायचं? हे मला ठरवू दे, असं आजच्या मुलांना वाटतं आणि तसं ते सांगतातही. मैत्री, प्रेम आणि प्रसंगी त्यापुढच्या पायर्या चढताना किंवा उतरताना आजची मुलं बिनधास्त असतात. लग्न, घटस्फोट आणि पुन्हा लग्न यादेखील सहजपणे स्वीकारल्या जाणाऱ्या घटना ठरू पाहताहेत, तर कित्येकदा कायद्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी ‘लिव्ह इन’चा पर्यायही बिनदिक्कतपणे स्वीकारला जातोय. विशेष म्हणजे हळूहळू मुलांचे आई-वडीलही मनाविरुद्ध का होईना, हे सारं मान्य करताना दिसताहेत.
पण हे सारे बदल घडवून आणणारी आणि स्वीकारणारी ही युवा पिढी खरंच बेजबाबदार आहे का? भारतीय संस्कृतीचा आणि समाजाचा पाया म्हणजे भारतीय कुटुंबव्यवस्था आहे, असं आपण आजवर म्हणत आलो. मग हा पाया खरोखरीच ढासळतो आहे का? आजच्या काळात लग्नसंस्था आणि त्याबरोबरच कुटुंब संस्था डळमळीत होऊ पाहतेय का? या नव्या मुलांना नक्की हवंय तरी काय? लग्नापासून आणि आपल्या जोडीकडून त्यांना असणाऱ्या अपेक्षा आहेत तरी काय, या प्रश्नांची उत्तरं खरं तर आपल्याभोवतीच सहज सापडू शकतात. तसं पाहिलं, तर अजूनही लग्नसंस्था धोक्यात येण्याइतके मोठे बदल नक्कीच झालेले दिसत नाहीत. अजूनही लग्न आणि लग्न करण्याच्या पारंपरिक विधिवत पद्धतीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. रजिस्टर लग्नापेक्षा जुन्या पद्धतीने लग्न करणं त्यांना अजूनही आवडतंय. प्रेमविवाहांचं प्रमाण वाढलंय. पण त्याचबरोबर अरेंज मॅरेज करणाऱ्या मुलांची संख्या आजही खूप आहे. बघणं, दाखवणं या कार्यक्रमाला पर्याय म्हणून हॉटेलमध्ये भेटणं आणि मध्यस्थाने भेट घडवण्याऐवजी विवाहसंस्था महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. आज बहुतेक ठिकाणी मुलं आधी भेटतात आणि मग तो किंवा ती जोडीदार म्हणून योग्य वाटली, तरच घरातली ज्येष्ठ मंडळी त्या चित्रात येतात.
तसं पहायला गेलं, तर मुलांच्या लग्नामध्ये आता पालकांच्या मताला काहीही महत्त्व उरलेलं नाही. ‘मला आता नाही लग्न करायचं’, असं मुलगा आणि मुलगी तेवढ्याच ठामपणे आपल्या आई-वडिलांना सांगू शकतात. म्हणजेच एकीकडे मुलांच्या जोडीदाराच्या पसंतीमधला पालकांचा सहभाग खूपच मर्यादित झालाय आणि त्याचबरोबर विवाहाच्या बाबतीत पूर्वीपेक्षा मुलं अधिक प्रॅक्टिकल झाली आहेत. त्यांना लग्न हवं आहे. पण स्वत:चं स्वातंत्र्यही हवं आहे. माझी स्पेस असं गोड नाव देऊनही मुलं ते जपतातही. काही वर्षांपूर्वीपर्यंत मुलींना फारसा चॉइस नसायचा. पत्रिका जमली आणि मुलाकडची पसंती आली की, तिचा होकार गृहीत धरला जायचा. पण आता मुली आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत. शिक्षण आणि विचारांनी स्वतंत्र आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या जोडीदारकडून असणाऱ्या अपेक्षा अधिक स्पष्ट आणि ठाम आहेत. आमच्या लग्नाचा निर्णय आम्हाला घेऊ द्या, असं या युवा पिढीचं म्हणणं आहे. लग्नाचं वय वाढतंय. शिक्षण, नोकरी आणि त्याभोवतीने आजच्या नव्या पिढीला आपोआपच मिळत गेलेलं आणि काही प्रमाणात त्यांनी मिळवलेलं स्वातंत्र्य या गोष्टी या बदलांना कारण आहेत. लग्नापूर्वी मुलाने सेटल्ड असायला हवं म्हणजे त्याला एक सुरक्षित नोकरी हवी, त्याचं स्वत:चं घर हवं, अशी अपेक्षा असते तसेच आज मुलींनाही लग्नापूर्वीच स्वत:ची सेटलमेंट झालेली हवी असते. लग्नाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या तरुणांच्या डोळ्यांसमोर भविष्यातल्या खर्चांचा विचारही थोड्या-फार प्रमाणात असतोच. शाळा आणि शिक्षणाचे वाढत चाललेले खर्च, डोनेशन या सर्वांचा विचार त्यांना या आर्थिक सेटलमेंटकडे घेऊन जातो यात शंका नाही.
संसारात दोघांचं स्थान बरोबरीचं असलं पाहिजे, हा आजच्या मुलींचा रास्त हट्ट असतो. जोडीदाराची आर्थिक परिस्थिती आणि त्याचा सामाजिक स्तर किमान आपल्याबरोबरीचा हवा, असा त्यांचा आग्रह असतो. लग्नानंतर मुलं कधी आणि किती होऊ द्यावीत, याबद्दलही मुलींची स्वत:ची मतं असतात. माझे मित्र-मैत्रिणी, माझे कपडे इतकंच नव्हे, तर बऱ्याच ठिकाणी माझं उत्पन्न हे माझं आहे; ते लग्ननंतरही तसंच असायला हवं अशी मुलींची अपेक्षा असते आणि ती मान्य करणाऱ्या मुलाशीच लग्न करायला आज मुली तयार होतात. स्वत:ला मिळणारा पैसा कसा जपायचा आणि कसा वापरायचा या निर्णयाचं स्वातंत्र्यही दोघांना हवं असतं. आपल्या आई-वडिलांची काळजी जोडीदाराने घ्यावी, असं मुलांना वाटतं. तेवढंच मुलींनाही ठामपणे वाटतं. एकुलती एक मुलगी असणं किंवा भाऊ वा बहीण परदेशी असणं अशी कारणंही त्यामागे असतात आणि त्या तसा आग्रह करतातही. त्याचबरोबर जोडीदाराने आपल्याला समजून घ्यायला हवं, असं दोघांनाही वाटतं. यात करिअरला पाठिंबा देणारा आणि आपलंं स्वातंत्र्य जपणारा जोडीदार अपेक्षित आहे, हे नक्की.
गावातल्या मुलींनाही शेती करणारा नवरा नको आहे. या मुलींची खेड्यात राहायची तयारी नाही. विशेषत: पुण्या-मुंबईसारख्या शहरी जीवनाचं आणि तिथल्या मुक्त स्वातंत्र्याचं आकर्षण यामागे आहे, हे नक्कीच. नातेसंबधातला गोडवा वाढवण्यापेक्षा तिखट-मीठ टाकून बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि दिवसभर सुरू राहणाऱ्या सिरियल्स किंवा सिनेमे या नात्याला वेगळीच कडवट चव आणते. क्वचित मुलांच्या संसारात नको एवढं लक्ष घालणारे पालकही या घटनांना जबाबदार असतात. मात्र एक नक्की की जग कितीही बदललं, संकल्पना कितीही बदलल्या, तरी लग्नाच्या नात्यातला गोडवा टिकवण्यासाठी गरज असते ती केवळ एकमेकांना समजून घेण्याची. ते होतं, तिथपर्यंत लग्न आणि लग्नसंस्था अबाधित रहाणार आहे.