Saturday, July 20, 2024
Homeकोकणरत्नागिरीदापोलीतील पाच गावांत इंडो-इस्रायल प्रकल्प

दापोलीतील पाच गावांत इंडो-इस्रायल प्रकल्प

रत्नागिरी (प्रतिनिधी) : एकात्मिक फलोत्पादन योजनेंतर्गत इंडो-इस्रायल प्रकल्प राबविण्यासाठी दापोली तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे. यासाठी १ कोटी ८२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या प्रकल्पात ४०२ हेक्टरवर घनपध्दतीने लागवड आणि काही बागायतदारांकडील जुन्या बागांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून इस्रायल तंत्रज्ञानाचा हापूसमध्ये वापर करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. मागील काही वर्षांमध्ये इंडो-इस्रायल तंत्र वापरण्याकडे आंबा बागायतदारांचा कल वाढलेला आहे. कोकणात उंचच उंच हापूसची झाडे आहेत. त्यामधून अपेक्षित उत्पादनही मिळत नाही. उंच झाडांवरुन आंबे काढण्यासाठी मजुरांची कमतरता आहेच आणि धोकाही तेवढाच आहे. हापूसचे उत्पादन वाढविण्यासाठी कमी उंचीची झाडे आणि घन पध्दतीने रोपांची लागवड करण्यावर बागायतदार भर देत आहेत. याचा विचार करुन कृषी विभागाकडून इंडो-इस्रायल प्रकल्प राबविण्यासाठी दापोली तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

त्यामध्ये आंजर्ले, केळशी, कुडावळे, ओणनवसे, कोळथरे या पाच गावांचा समावेश आहे. यामध्ये घन पद्धतीने आंबा लागवडीसाठी ४०२ हेक्टरचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्याचबरोबर जुन्या बागांमधील झाडांची उंची कमी करुन ती दहा फुटांपर्यंत केली जाणार आहे. बागायतदारांना अनुदानावर पॅकहाऊस दिली जाणार असून शेततळं, नवीन यंत्र सामग्रीही अनुदानावर देण्यात येणार आहे. घन पध्दतीने लागवड केलेल्या बागांमध्ये आंतरपिक म्हणून मिरची लागवडीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. सुरुवातीला १ कोटी ६२ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. त्यात दुरुस्ती करुन तो १ कोटी ८२ लाखांचा केला आहे. या योजनेतून ११ लाख रुपये पॅकहाऊसवर खर्च केले आहेत. त्यातून १ पॅकहाऊस उभारले आहे. ११३ बागायतदारांना यांत्रिकीकरणातून २६ लाख रुपये खर्च केले आहेत. शेडनेटवर दीड लाख रुपये तर ५ शेततळ्यांसाठी ५३ लाख रुपये खर्ची केले आहेत. पुढील वर्षभरात या पाच गावांमध्ये योजनेतून निधी खर्ची टाकण्यात येणार आहे.

इंडो-इस्त्रायल प्रकल्पाचा लाभ आंबा बागायतदारांना होणार असून प्रायोगिक तत्त्वावर दापोली तालुक्यातील आंजर्ले, केळशी, कुडावळे, ओणनवसे, कोळथरे या पाच गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये योजनेचे लाभ देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. – सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -