संतोष वायंगणकर
महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पावसाने ‘कहर’ केला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात नागरिकांना घरात रहाणं मुश्कील झालं आहे. राज्यातील कोणत्याच भागाला पावसाने सोडलेलं नाही. माध्यमांमध्ये पावसात कुटुंबाच्या कुटुंब कशी घराबाहेर आली आहेत, याच विदारक चित्र महाराष्ट्रासमोर आहे. गेल्या वर्षीही पावसाने असाच ‘कहर’ केला होता. या पावसाने कोकणासह महाराष्ट्रातील जनतेला अक्षरश: रस्त्यावर आणले होते. अनेक भागांत डोंगर कोसळून किंवा महापुराने कुटुंब उघड्यावर आली होती. कोकणातील जनतेलाही गत वर्षीच्या पावसाळ्यात बसलेल्या फटक्याने आजही कोकणवासीय सावरलेले नाहीत. कोरोना त्यानंतरचा गत वर्षीचा पहिला पावसाळा ‘दुष्काळात तेरावा महिना’ ठरावा अशा स्थितीत होता. गत वर्षीच्या पावसाळ्यातील जखमा ताज्या असताना या वर्षीही गेले आठ-पंधरा दिवस पाऊस काही थांबायला तयार नाही. आजवर हवामान खात्याचे अंदाज अचूक असायचे; परंतु गेल्या दोन महिन्यांत हवामान खात्याचेही अंदाज चुकू लागले आहेत.
पावसाने तर अनेक वेळा हवामान खात्याला खोटे ठरवण्याचे ठरवले आहे. यामुळेच हवामान खात्याचे अंदाज चुकत असावेत. काही ठिकाणी चोहीकडे पाणी; परंतु पिण्याला थेंबही नाही, अशी काहीशी विचित्र स्थिती आहे. अतिपावसाने जनजीवन विस्कळीत आहे. त्याचप्रमाणे शेतीच काय होणार, अशा संभ्रमावस्थेत शेतकरी असलेला दिसतो. भातलावणी करतानाही शेतीत पाणी अधिक वाढल्याने लावलेली भातशेती कुजून जाईल की काय? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. निसर्गचक्र जसे फिरत जाईल, तसे ते फिरत राहणार आहे. निसर्गापुढे कोणाचेही शहाणपण चालणारे नाही. पावसाच्या या तुफान फटक्यांसमोर आपण सारे हतबल आहोत. महाराष्ट्रातील काही दुष्काळग्रस्त भागात लोक पावसाची वाट पाहत असतात. थोडसे आभाळात काळे ढग दिसले तरीही दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्याचे डोळे त्या आकाशाकडे लागलेले असतात. काळोख केलेले ढग तसेच पुढे सरकले, तर पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे मात्र पाणावतात. कारण दोन-दोन वर्षे दुष्काळग्रस्त भागातील ग्रामस्थ पाण्यावाचून तडफडत असतात, असे हे विदारक दृश्य अनेक वेळा महाराष्ट्र पाहत आणि अनुभवत आला आहे. एकीकडे पावसाचा हा महाराष्ट्रात ‘कहर’ सुरू असताना राजकारणातील घडामोडीही वेगवानरीत्या सुरू आहेत. शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. साहजिकच याची चर्चा आणि परिणाम कोकणातही आहे. ४५ आमदार आणि १२ खासदार यांनी शिवसेनेचा वेगळा गट निर्माण केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या या बंडात कोकणही मागे राहिलेला नाही. शिवसेनेची एकनिष्ठता सांगणारे माजी राज्यमंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला, तर दुसरीकडे रामदास कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी केली. या आ. दीपक केसरकर, आ. योगेश कदम, आ. उदय सामंत यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत गेले आहेत.
माजी राज्यमंत्री रामदास कदम व माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील सुप्त संघर्ष शिवसेनेला आणि कोकणाला नवीन नव्हता. त्यामुळे रामदास कदम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होतील, असे वाटलेच होते. तसेच घडले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात फार मोठ्या घडामोडी घडत आहेत. यातच सत्तापालटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिल्यानंतर पुणे, बारामतीला २३० कोटींचा विकासनिधी दिला गेल्याचे पुढे आले आहे. विकासनिधी वाटपातील तफावत पाहिल्यावर महाराष्ट्रात फक्त बारामतीच आहे का? उर्वरित महाराष्ट्राचा विकास बारामतीपेक्षाही अधिक झाला आहे की काय? असा प्रश्न पडावा, असे हे विकासनिधीचे तफावत चित्र आहे. सगळ्यात जास्तीचा विकासनिधी बारामतीला नेण्यात आल्याचे ‘ऑन रेकॉर्ड’ आले आहे. बारामतीचा विकास झाला हा विकास बहुधा अशाच प्रकारे झाला असावा. उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय करायचा आणि एकट्या बारामतीचा विकास अशाच धोरणातून विकासनिधी वळविला आहे. महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांचा विकासनिधी पुणे जिल्ह्यात वळविण्यात आला होता. महाराष्ट्रातील इतर भागावर अन्याय करूनच अर्थमंत्र्यांनी फार चलाखीने हे नियोजन केले आहे. मुख्यमंत्री बदलानंतरच हे सारे समोर आले आहे. कोकणावरही आघाडी सरकारकडून कसा अन्याय करण्यात आला होता, हे देखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.