विलास खानोलकर
अक्कलकोटचे सापटणेकर हे श्री साईनाथांची दिगंत कीर्ती ऐकून शिर्डीस गेले. सन १९१२ ची हकीकत. त्यांना अक्कलकोटात वाडावजा घर बांधायचे होते. त्याविषयी प्रार्थना करण्यासाठी ते गेले असता ही मंडळी काही बोलण्याआधीच बाबा उद्गारले, ‘अरे, इथे कशासाठी आलास? तो कडक म्हातारा तिथे बसला आहे. अक्कलकोटमध्ये तुला काय पाहिजे ते त्यांच्याकडे माग. जे हवे ते तुला महाराज देऊ शकतात.’ यानंतर अल्पावधीतच सापटणेकर यांची वास्तू उभी राहिली.
साईबाबा म्हणाले, ‘मी अक्कलकोटला गेलो हेातो’ हरिभक्तपरायण रामगीर गोसावी यांना साई हे ‘बापूगीर’ या नावाने संबोधित. त्यांनी सांगितलेली हा सत्य घटना ‘एका पौष वद्य अमावास्येला आलेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशी मालेगावचे फकीर बडेबाबा द्वारकामाईत काही धान्य वाटीत होते. त्यांनी मला दीड रुपया दिला. बाबांनी मला विचारले,’काय दिले रे तुला बडेबाबांनी? दाखव मला.’ मी दाखविला. बाबांनी तो दीड रुपया मजकडून घेतला, पाहिला आणि मला परत दिला व म्हणाले की, ‘आपण की नाही माहूरला लहानाचे मोठे झालो. लोक लई तरास देऊ लागले. आपण कंटाळलो. मग मी गेलो गिरनारला. तिथे बी लोक लई तरास देऊ लागले. मग मी गेलो अबूच्या पहाडावर. तिथे बी लोकांनी लई सतावले. मग तिथून गेलो अक्कलकोटला. काही दिवसांनी मग तिथून गेलो दौलताबादला. तिथे एक आपल्याला जन्या भेटला. त्यांनी माझी लई सेवा केली.
मग मी गेलो पंढरपूरला. तिथे बी कंटाळा आला. मग मी आलो शिरडीस अन् तिथेच राहिलो.’ (दौलताबाद म्हणजेच देवगिरी किल्ला. या किल्ल्यावर जनार्दन स्वामींचे समाधी स्थान आहे.) बापूगीर महाराजांनी ही वाक्येच्या वाक्ये बाळकृष्ण विश्वनाथ देव, रा. ठाणे यांना २१ एप्रिल १९३६ला सांगितली साईनाथ हे अक्कलकोटास येऊन गेले असे म्हणतात.