Wednesday, October 9, 2024
Homeअध्यात्मसाक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही

साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही

देहबुद्धी आहे तोवर, म्हणजे ‘मी देही आहे’ ही भावना आहे, तोपर्यंत काळजी राहणारच. काळजी मनातून असते. जोवर संशय फिटत नाही, परमेश्वराचा आधार वाटत नाही, तोवर काळजीही मनाला सोडीत नाही. कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे. पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल, भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल, पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही. मनुष्यजन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही, तर जीवाचे फार नुकसान आहे. भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे. एकदा का अशी तळमळ लागली की, मनुष्य वेडा बनतो आणि कोणी संत भेटला की, निवांत होतो. संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाहीत, तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात. संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरवून सोडते. ‘आपल्याला जे कळले ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या,’ हा संतांचा एकच हेतू असतो. संत विषयावर मालकी गाजवितात. जगाला जिंकणे एक वेळ सोपे, पण स्वत:ला जिंकणे कठीण आहे. संत स्वत:ला जिंकून जगात वावरत असतात. संत साक्षित्वाने जगात राहतात आणि साक्षित्वाने राहणाऱ्याला दु:खाची बाधा होत नाही. संतांच्या संगतीत राहून, त्यांच्या आज्ञेत राहून, आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत. वास्तविक, संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो, त्याचे संशय आपोआप दूर होतात. जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे. समाधान हे आपले आपल्यालाच घ्यायचे असते. म्हणून, ज्याला समाधानी राहायचे आहे, त्याने फार धडपड करू नये; जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात राहावे.

कचेरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत; ते तिथेच ठेवावेत. घरातले वातावरण शुद्ध आणि नि:संशयाचे असावे. भोळेपण एकप्रकारे चांगले; ती भाग्याची गोष्ट आहे. जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळेपण असते. जसे कल्याण स्वामींच्या अंगी होते. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे, पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता, भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते. त्या वेळी शरीरसुद्धा बरे राहायला, आनंद हे फार मोठे औषध आहे. हसावे, खेळावे, लहान मुलांत मिसळावे, थट्टा-विनोद करावा; काहीही करावे, पण आनंदात राहावे. ज्याचा आनंद कायम टिकला, त्याच्याच जन्माचे सार्थक झाले.

– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

समाधान ही परमेश्वराची देणगी आहे. ती मिळविण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -